उकळलेले पाणी बेचव का लागते ?
सर्दी झाली वा पोट खराब असेल तर उकळून गार केलेले कोमट पाणी तुम्ही प्यायला असाल. असे आणि बेचव लागते हे तुमच्या लक्षात आले असेल ! असे का बरे होत असावे ?
पाण्याला त्याची चव त्यात विरघळलेल्या नायट्रोजनमुळे व क्षारांमुळे असते. त्यामुळे हापशाच्या पाण्याची चव, विहिरीच्या पाण्याची चव किंवा नदी, तळे, झरे, समुद्र यांच्या पाण्याची चव वेगवेगळी लागते. पाणी गरम केल्याने त्यातील विरघळलेले वायू वातावरणात निघून जातात व क्षार तळाशी गोळा होतात. अशा प्रकारे पाण्याला चव देणारे दोन्ही घटक नाहीसे झाल्याने पाणी बेचव लागते.
त्यामुळेच असे पाणी प्यावे लागू नये, असेच सर्वांना वाटत असते. असे असले तरी वारंवार अामांश होणाऱ्या व्यक्तींनी उकळून गार केलेले पाणीच प्यावे. म्हणजे त्यांना आमांशाचा त्रास होणार नाही. हगवण लागलेल्या व्यक्तींनीही उकळलेले पाणी प्यावे. चवीपेक्षा सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते, हे आपण समजून घ्यायला हवे.
साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून (मनोविकास प्रकाशन)