कथा भारतरत्नाची....
कथा ही भारतरत्नाची ।
बंग देशीच्या पवित्र भू च्या गंगापुत्राची ।।
अध्यात्माच्या वेलीवरली ज्ञानभक्तीची फुले उमलली ।
वेदांमधल्या सहिष्णुतेची ,सहानुभावाची ।।
भुवनेश्वरीच्या उदरामधले संस्कारांचे बीज प्रकटले ।
चला गाऊया जीवनगाथा नरेंद्रदत्ताची ।।
चला गाऊया जीवनगाथा नरेंद्रदत्ताची....
तुमचा देश आणि तुमच्या देशबांधवांची सेवा हिच तुमची देवपुजा असे सांगणारे स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन !
विश्वनाथ व भुवनेश्वरी देवी या दांपत्याच्या पोटी नरेनने जन्म घेतला. बालवयात लडिवाळपणे “ बिल्ले “ म्हणून घरच्या माणसांना परिचित असणारा हाच नरेन पुढे स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्धीसआला , नावारूपास आला आणि सर्वश्रेष्ठ माणूस म्हणून संपूर्ण जग व्यापून राहिला. आपल्या असामान्य व अद्वितीय कर्तृत्वाने स्वतःचा ठसा उमटविला !
असा कार्य लौकिक असलेले विवेकानंद यांचा जन्म ७ शके कृष्ण १७८४ रोजी , म्हणजेच १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. १२ जानेवारी १८६३ हा दिवस नवव्या बंगाली महिन्याची पौष सप्तमी होती आणि विशेष म्हणजे समस्त हिंदू त्या दिवशी आपला मकरसंक्रांतीचा सण साजरा करत होते. संपूर्ण देशातील हिंदू धर्मियांच्या ध्यानीमनीही नसेल की आज हा पवित्र सण साजरा करत असताना आपण एका महापुरुषाच्या जन्मघटीकेचे स्वागत करत आहोत. आज जन्मलेला हा युगपुरुष आपल्या देशाला राष्ट्रीय जाणिवांची जाणीव करून देणारा आहे.
त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते |
उत्तिष्ठत जाग्रत ! बंधुंनो उत्तिष्ठत जाग्रत ||
त्या डोळ्यांनी अनागतांचा थेट वेध घेऊनी |
भारतभूच्याभवितव्याचे स्वप्न भव्य पाहिले ||
आत्म्यांचे संगीत ऐकून जडवादी दुनियेला |
भारत विश्वगुरू करण्याचे कार्य अजुनी राहिले ||
त्या कार्याचा वसा घेऊया तोच ध्यास ध्येय ते ||
त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते....
स्वामी विवेकानंदांनी आपल्या दैदिप्यमान कार्यकर्तृत्वाने भारतीयांच्या मनात अढळ स्थान मिळवले त्यातीलच एक प्रसंग असा....
शिकागो येथे धर्ममहासभेचे अधिवेशन बोलावले होते. १८९३ मध्ये सप्टेंबर ११ ते २३ तेवीस या काळात त्यांचे कामकाज चालले. धर्म महासभेने पाश्चिमात्य जगाला एक नवी जाणीव करून दिली. त्या जाणिवेच्या लाटा सर्वत्र उसळल्या !
११ सप्टेंबर १८९३ रोजी ऐतिहासिक , तशीच अभूतपूर्व धर्ममहासभा शिकागोतील नव्यानेच बांधलेल्या मिशिगन अव्हेन्यूवरील आर्ट इन्स्टिट्यूटच्या भव्य इमारतीत भरली होती. तेथे अनेकांची भाषणे झाली. विवेकानंदांकडे लिहून ठेवलेले भाषणही नव्हते. मुद्द्यांचे टिपणही नव्हते. देवी सरस्वतीची प्रार्थना करत ते व्यासपीठाच्या पायऱ्या चढून वर गेले. स्वामीजींनी आपले चित्त एकाग्र केले , क्षणभर डोळे मिटून आपल्या गुरुदेवांचे स्मरण केले आणि संबोधनाचे फक्त पाचच शब्द उच्चारले आणि नंतर जे काही घडले त्याने अक्षरशः इतिहासच घडवला. “ सिस्टर्स एन्ड ब्रदर्स ऑफ अमेरिका ” माझ्या अमेरिकन बंधू-भगिनींनो.... त्यांच्या मुखातून हे शब्द उमटले , श्रोत्यांच्या कानावर पडले आणि क्षणार्धात सगळे जण आपापल्या जागेवर उभे राहिले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. श्रोत्यांनी खचाखच भरलेला तो भव्य प्रशस्त हॉल दणाणून गेला. त्या टाळ्या नव्हत्या अक्षरशः मेघगर्जनाच होती. जणू सलग दोन मिनिटे पूर्ण झाल्यानंतरच टाळ्या थांबल्या. प्रथमदर्शनीच स्वामीजींचे स्वागत अमेरिकनांनी अशा अभूतपूर्व उत्स्फूर्त पद्धतीने केले. कारण स्वामीजींनी सर्वांना बंधू भगिनींच्या नात्याने जोडून घेतले होते. विश्वबंधुत्वावर नुसते भाषण न करता आपल्या शब्दातून-भावनेतून-कृतीतून ते साकार केले. स्वामीजींचे ते छोटेसे भाषण हा भारताच्या भविष्यकाळाला कलाटणी देणारा क्षण होता. ते भाषण संपताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. हजारो लोक त्यांचे शिष्य झाले.
जाज्वल्य राष्ट्राभिमान , मायभूमीवर अंतकरणातून जीवापाड प्रेम करणाऱ्या विवेकानंदांनी युवाशक्तीला सुंदर मौलिक विचार यांची देणगी दिली. विवेकानंद म्हणतात ,” युवकांनो तुम्ही महान कार्य करण्यासाठी जन्मला आहात , तेव्हा उठा आणि कार्य करा. राष्ट्रप्रेमाची ज्योत नसानसांत जागवा. नव्या सामर्थ्याची भारत देशाला गरज आहे. उठा जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.” अशी सिंहगर्जना करून निद्रिस्त भारताला जागे केले. स्वामी विवेकानंद म्हणतात , “ तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. सर्व शक्ती आपल्यामध्येच विद्यमान आहेत , स्वतःच्या प्रगतीसाठी इतरांवर अवलंबून न राहता , स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे. “
आज समाजाला आणि काळाला याच विचारांची आणि कृतीचीच गरज आहे...!
लेखन : श्रीम. कल्पना चव्हाण , नाशिक
( संदर्भ : छात्र प्रबोधन , आधुनिक भारताचे प्रेषित स्वामी विवेकानंद )
संकलन : गिरीष दारुंटे , मनमाड