माझी माय...!!
माय भेटली तू मला,
मोठ देवाचं गं दान.
जन्म एक गं अपुरा,
किती गाऊ मी गुण-गान.
माय राबते-राबते,
माय तू कष्टते-कष्टते.
अग तुझ्या पिल्लासाठी,
साऱ्या जगाशी झटते.
सदा झटता झटता,
तू न पाही उन्ह-ताण
जन्म एक गं अपुरा...
सदा माझ्या मना ओढी,
तुझ्या प्रेमाची ती गोडी.
किती सहज सोडवीशी,
अवघड घरातली कोडी.
चार भिंतीत घराच्या,
आला तुझ्यामुळे प्राण
जन्म एक गं अपुरा...
तुझी सदाची चिड -चिड,
घरासाठीची धडपड.
राब-राबुनी शिणता,
तुझ्या डोळा येई रड.
रडू विसरुनी सार,
लढशी पुन्हा आनंदान
जन्म एक गं अपुरा...
माय माझी तू माऊली,
साऱ्या घराची सावली.
सामोर संकटाला जाया,
सदा पुढ तू धावली.
डोळा भरून तुला पाहता,
सारा हरतो शीण-ताण
जन्म एक गं अपुरा...
ताई रोजच म्हणते,
लई गोड माझी माय.
करी मधाचे संस्कार,
जशी दुधावरची साय.
सदा विनविशी मला,
का रे देतो मला ताण
जन्म एक गं अपुरा...
माय बोललो न मी तुला,
वेळ ती कालची दुपार.
बाप बोलला ग मला,
त्याला तुझा मोठा ग आधार.
लाभली माया तुझी मला,
झालं आयुष्याचं सोन
जन्म एक गं अपुरा, तुझं गाण्या गुण-गान...
लेखन : गिरीष दारुंटे, मनमाड