जलमेव जीवनम... पाणी हेच जीवन !!

प्राचीन काळापासून विद्वानांनी सिद्धांत मांडला की सर्व सृष्टीची संरचना आकाश, वायू, अग्नि, जल, पृथ्वी या पाच तत्त्वांनी तयार झाली आहे. मानवी शरीर सुद्धा ह्याच पाच तत्त्वांनी बनलेले आहे. मानवी शरीराचा बराचसा भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाच तत्वे मानवाच्या ज्ञानेंद्रिया मध्ये म्हणजेच जीभ, नाक, त्वचा, डोळे या माध्यमात कार्यरत असतात. सृष्टीमध्ये ह्या पंचतत्वाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये संतुलन असणे देखील तितकेच गरजेचे आहे. ह्या पाच तत्वांपैकी जल आणि वायू ही दोन तत्व इतकी महत्त्वाची आहेत की, सजीवांच्या जीवनाची कल्पना एका क्षणासाठी सुद्धा आपण करू शकत नाही.

पाणी हा घटक पृथ्वीवर घन, द्रव व वायू या तीनही स्वरूपात आपल्याला दिसून येतो. पाण्याचे अवस्थांतर होत असते. पाणी हा अनवीकरणीय स्त्रोत आहे. जलचक्रामुळे पाण्याची नवनिर्मिती होत नाही परंतु पुनर्निर्मिती होते. पाणी कमी होत नाही, अथवा वाढत नाही पाण्याची अवस्था फक्त चक्रीय पद्धतीने बदलते. या गुणधर्मामुळे त्याचे महत्त्व द्विगुणीत होते. हिमालय पर्वतांचे सौंदर्य बर्फामुळे वाढते, हवेत पाण्यात बाष्प सामावते म्हणून तर पर्जन्यधारा बरसतात. तापलेल्या ग्रीष्माला जलधारा शांत करतात. पहाटेला झाडांच्या पानांवर, फुलांवर कविता रचल्या जातात. सृष्टीच्या चराचरात सौंदर्य समावले आहे, ते केवळ पाण्यामुळेच! प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक सजीव पाण्याचाच बनलेला आहे. आपल्या शरीरात देखील दोन तृतीयांश पाणी आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीची निर्मितीही प्रथमतः समुद्राच्या म्हणजेच खाऱ्या पाण्यात झाली असावी यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे. पाणी जसे वातावरणात आहे, जमिनीवर आहे, तसेच ते भूगर्भातही आहे. परंतु पाण्याच्या अतिवापरामुळे भूगार्भाची जलपातळी खाली खाली चालली आहे. आपण सर्वजण हे जाणतो की, पृथ्वीवर पाणी सर्वत्र आहे. पृथ्वीचा 71 टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी आहे, पण त्यातले 97% खारे पाणी सागरात आहे. मानवाला वापरासाठी 3% टक्के पाणी मिळू शकते. यापैकी 2% हिमनग, हिमशिखरे, गोठलेल्या स्वरूपात आहे. नद्या, झरे, तलाव यातून पाणी साठवले जाते. त्यामुळे आपल्या वाट्याला केवळ 1% इतके पाणी येते. या 1% तील 99 टक्के पाणी जमिनीखाली आहे. उरलेले 1% पाणी नद्या सरोवरे यात आहे. भारतात वापरण्यात येणाऱ्या पाण्यापैकी सुमारे 92 टक्के पाणी शेतीसाठी, 5% पाणी उद्योगधंद्यांसाठी, 3% पाणी दैनंदिन गरजांसाठी वापरले जाते. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार एकूण जलसाठ्यापैकी प्रत्येकी 10 हजार मिलीलीटर मागे फक्त 35 मिलीलिटर पाणी पेयजल म्हणून उपलब्ध आहे. म्हणून पाणी ही एक मौल्यवान नैसर्गिक संपत्ती आहे.

पाणी हे संयुग आहे. रंगहीन, गंधहीन, रूचिहीन, पारदर्शक असून सामान्य तापमानावर द्रवरूपात आढळते. या गुणधर्मामुळेच स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाण्यात जवळजवळ सर्वच पदार्थ विरघळत असल्याने ते वैश्विक द्रावकही आहे. पाण्याच्या असंगत वर्तनामुळे सुद्धा एखाद्या जलाशयाचा पृष्ठभाग गोठलेला असतानाही त्याखालील जलचर जिवंत राहतात. सकाळी उठल्यापासून पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी व इतर सर्वच कामांसाठी आपण पाणी वापरत असतो. त्या ऐवजी अन्य कुठल्याही पदार्थाचा वापर करता येत नाही. म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले आहे.

मानवी जीवनात मोलाचे महत्त्व असणाऱ्या पाणी या घटकाचे समाजाच्या विकासामध्ये देखील महत्त्वाची भूमिका आहे. जगातील प्राचीन संस्कृती इजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यात, भारतातील सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या खोऱ्यात उदयास आली. इथेच मानवाने उत्क्रांती केली. विविध शोध लावून आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. परंतु मानवाचा हा स्वभाव धर्म आहे की तोज्या वस्तूंचा, पदार्थांचा किंवा घटकांचा आपल्या जीवनात उपयोग करतो तो त्यांना दुषित करतो. ह्यामुळे पाणी इतिहासकारांच्या मते मेसोपोटेमिया मधील समेरीअन संस्कृतीचे पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नष्ट झाली. असे अनेक उदाहरणे देता येतील.

पाण्याचा व्यवस्थित वापर हे पूर्वीच्या काळाप्रमाणे आजही तेवढेच महत्त्वाचे आव्हान आहे. पण आजच्या जगात उद्योगधंदे लोकसंख्या याप्रमाणातही पाण्याच्या उपलब्धतेचे आव्हान अधिकच गंभीर झाले आहे. सजीवांचा उदय आणि विकास हा निसर्गात झाला आहे, म्हणून आपण म्हणतो निसर्ग आपला मित्र! या वचनाप्रमाणे खरोखरच मानवाने निसर्गाचे मित्र व्हावयास हवे होते, स्वतःची प्रगती होतांना निसर्गाची प्रगती होत आहे का हे पाहायला हवे होते. परंतु असे न झाल्याने परिणामी पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या! त्यातील प्रमुख म्हणजे जलसंकट! जलतुटवडा व जलप्रदूषण! संयुक्त राष्ट्रसंघ या जागतिक संस्थेने दरडोई 50 लिटर एवढी पाण्याची गरज असल्याचे सुचवले आहे. परंतु एवढे पाणी सहज उपलब्ध होत नाही त्यामुळेपाणीटंचाईजगभरातील चिंतेचा विषय आहे.

मानवाने स्वतःच्या विकासासाठी, भौतिक सुविधांसाठी, निसर्गाचा अमर्याद वापर केला त्यामानाने त्याचे संरक्षण झाले नाही. त्याचे परिणाम आपण जाणतोच, ते पुन्हा नव्याने सांगणे नको! जलसंकट हा केवळ स्थानिक किंवा विशिष्ट प्रदेशाचा प्रश्न नाही तर तो जागतिक प्रश्न आहे. पाण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आज देशादेशांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची पहिलीच परिषद ही 1977 मध्ये भरवली गेली, या परिषदेत पाण्याचा सुयोग्य वापर आणि पाण्याचे संरक्षण या संबंधीच्या योजना आखण्यात आल्या. 1980 ते 1990 हे दशकपिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि आरोग्यया नावाने ओळखले गेले. आपल्या देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने पुढाकार घेऊनमहाराष्ट्र जलप्रदूषण नियंत्रणकायदा तयार केला, ह्याच धर्तीवर 1976 साली भारत सरकारचा जल प्रदूषण नियंत्रण कायदा अमलात आला. या कायद्यानुसार खाजगी संस्थांनी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण केल्याच्या योजना आखल्या आहेत. पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व स्तरावर संशोधन व वेगवेगळे प्रयोग उपायोजना चालू आहेत. अशुद्ध पाण्यावर संस्कार करण्याचे प्रयत्न होत आहेत परंतु अजूनही समस्या गंभीर आहे. कारण विकास या शब्दांच्या मागे जाता-जाता आपण आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र बदलले आहे. पावसाची वेळ, प्रमाण यातील अनियमितता वाढली आहे. मला वाटतं आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला जाणवत असलेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे त्याच्या थेंबा थेंबा ची खरी किंमत आता कळू लागली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने 9 एप्रिल जलसंधारण दिन, 22 मार्च जागतिक जल दिन, 18 मार्च ते 24 मार्च जागतिक सप्ताह साजरी करण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

पाण्यामुळे होणारे तिसरे महायुद्ध आपल्याला टाळायचे आहे. त्यासाठी निसर्गाने मानवाला दिलेली देणगी म्हणजेच पाणी! ह्या पाण्याच्या थेंबाथेंबाचा विचारपूर्वक वापर होणे गरजेचे आहे.

खरं तर ज्या ज्या गावातून नदी वाहते. त्या त्या गावाचे सौंदर्य वाढवून गावाचे देखील भूषण वाढते. परंतु प्रदूषणामुळे नदीतील पाणी पिणे तर सोडाच त्यात पाय सुद्धा घालावासा वाटत नाही. इतकी नदीची गंभीर परिस्थिती आपणच केली आहे. आजही नर्मदा, गोदावरी यासारख्या नद्यांना येणाऱ्या पुराच्या परिस्थितीवर, स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना करण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत. आजही भारतात 70% क्षेत्राचे पाणी दूषित आहे. ह्या 70 टक्के भागात देशाच्या 14 मुख्य नद्या आहेत. नद्यांचे किंबहुना पाण्याचे प्रदूषण होण्याची अनेक कारणे व दुष्परिणामांची जाणीव आपल्याला आता होत आहे. त्याचे परिणाम गंभीर स्वरुपात आपल्या समोर येत आहेत. त्यातूनच पाण्याची उपलब्धता व गरज यातील तफावत वाढत चालली आहे. उशिरा का होईना पण समस्त मानव जातीचे डोळे चांगलेच उघडले आहे, असे मला वाटते. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सर्वांचे हात सरसावले आहेत असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जाताना दिसत आहे. पावसाच्या पाण्याची साठवण, जलसंवर्धन, जलव्यवस्थापनपुनर्भरण यासाठी समाजात हात पुढे सरसावले आहे. पाण्याची कमतरता ही इस्राइल देशाची पर्यावरणीय समस्या परंतु या देशातील लोकांनी जलसंवर्धनाच्या परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणी करून कृत्रिम पाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यातून शेती विकसित केली. अनेक जलवाहिन्या कालवे, बोगदे यांच्या सहाय्याने दक्षिणेकडील नेगेव्हच्या वाळवंटात सुद्धा पाणीपुरवठा करण्यात हा देश यशस्वी झाला आहे. जलतज्ञ, जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी राजस्थानमधील जहाजवली, अखरी, रुपारेन, सरसा, भागनी या पाच नद्यांचे पुनरुज्जीवन केले. जलसंरक्षण व जलसंस्कृती रुजविण्याचे कार्य हाती घेतले आहे. सुजाण नागरिक हे त्यांच्या या कार्यात मोलाचे योगदान देत आहेत.

सजीवांच्या, मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या काळात सर्वच गरजांच्या पूर्ततेसाठी पाणी आवश्यक घटक आहे. श्वसनासाठी आवश्यक असलेल्या हवेच्या खालोखाल सजीवांच्या जीवनात पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. पाणी स्वतः नष्ट होते पण सजीवांना जगवते म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले जाते. पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवन जगणे अशक्य आहे. वेदांमध्ये ऋषी म्हणतात की, ‘आपः पुनन्तु पृथिविमम्हणजे पाणी पृथ्वीला पवित्र करते, पाण्यामुळे पृथ्वीला पावित्र्य प्राप्त होते. त्यामुळेच पृथ्वीला सौंदर्य प्राप्त होते. पाणी हे अमर असून इंद्राच्या हातात असलेला पाणी हा वरुणाचा मुलगा सजीव सृष्टीवर जीवनाचा वर्षाव करून आनंदाची निर्मिती करणारा आहे. पाण्याची यात्रा पवित्र तर आहेत पण जगण्याचा उत्सव म्हणजे पाणी! जीवन म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन असं म्हटलं जातं ते केवळ यामुळेच...

जल जिवित, जल पूजित

जल संचित, जल सुकृत

करुणा घन, जल देवदूत

जल जीवन, जल जीवन

लेखन : सौ. कल्पना बाळासाहेब चव्हाण

डे केअर सेंटर शाळा, नाशिक

Previous Post Next Post