“हगवणीवर बहुगुणी, मीठ-साखर-पाणी” किंवा “जुलाबावर वापरा जलसंजीवनी" अशी वाक्ये तुम्ही अनेकदा ऐकली असतील किंवा वाचली असतील. हगवणीसारख्या सामान्य वाटणाऱ्या आजारामुळे आपल्या देशात दरवर्षी ५ वर्षाखालची ५ लाख मुले मरतात; हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेलच, पण वाईटही वाटेल. मुख्य म्हणजे हे मृत्यू सहज टाळता येणारे असतात. हगवणीची अनेक कारणे असली निर्जलीकरण हेच असते. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे ६३% तर शिशूंच्या शरीरात ७०% पाणीच असते. मृत्यू येण्याचे कारण हगवणीमध्ये शरीरातील पाणी व क्षार शरीरातून बाहेर गेल्यामुळे जीभ कोरडी पडते, टाळू खोल जाते, खूप तहान लागते, लघवी होत नाही, वजन कमी होते, नाडीचे ठोके वाढतात, डोळे खोल जातात व उपचार न झाल्यास मृत्यूही ओढवतो.
निर्जलीकरणावर उपचार केल्यास हे मृत्यू सहज टाळता येतील. यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हगवण झालेल्या मुलाला दूध, पाणी, सरबत, खीर, चहा, कॉफी असे पदार्थ देत राहावे. हगवण झाली आहे म्हणून वरचे पदार्थ वा पाणी द्यायचे नाही, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे व प्रसंगी ती जीवघेणी ठरू शकते. शरीरातील पाण्याचे व क्षाराचे प्रमाण सामान्य पातळीवर आणण्यासाठी बाजारात जलसंजीवनीची पाकीटे मिळतात. यात ३.५ ग्रॅम सोडियम क्लोराईड (मीठ), २.५ ग्रॅम सोडियम बायकार्बोनेट (खायचा सोडा), १.५ ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड व २० ग्रॅम ग्लुकोज असते. हे पाकीट उकळून गार केलेल्या १ लिटर पाण्यामध्ये मिसळून बाळाला पाजावे. जितक्या वेळा बालक प्यायला मागेल तितक्या वेळा व पाहिजे तितके प्यायला द्यावे. बाजारातून हे पाकीट न आणता घरच्या घरीही हे बनवता येते. यात १ लिटर उकळून गार केलेल्या पाण्यात मूठभर साखर व तीन बोटांच्या चिमटीइतके मीठ टाकावे. असल्यास चिमूटभर खायचा सोडा व चवीसाठी लिंबाचा रस टाकावा. हे द्रावण हगवण झालेल्या बाळास वारंवार पाजल्यास ते बरे होते व त्याचा मृत्यू टाळता येतो. मीठ-साखर पाण्यामुळे लाखो मुलांचे प्राण वाचत आहेत. गरज आहे ती फक्त सजलीकरणाचे महत्त्व समजून घेण्याची व इतरांपर्यंत ते पोहोचवण्याची.
डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन