पलंगावर पडलेला रुग्ण. त्याला हातपाय हलवता येत अंथरुणातच मलमूत्र विसर्जन करतोय. स्वतःचे जेवण स्वत: करता येत नाही. सर्वस्वी परावलंबी असलेली अशी व्यक्ती पाहून कोणालाही दया येईल. 'काय हे भोग आहेत दैवाचे-', 'मुले-सुना अगदी हाल करताहेत', 'मरण येईल तर बरे-', 'देवा, वैयावरही अशी वेळ आणू नकोस', असे अनेक उद्गारही ऐकू येतात. खरेच काही लोकांना अशा परावलंबी जीवनापेक्षा मरणाला मिठी मारावी असे वाटते; परंतु आत्महत्या करणे हा भारतीय संविधानात गुन्हा मानला गेल्यामुळे असे करणे शक्य नसायचे. असाध्य रोग झालेले लोक त्या रोगाला व स्वतःच्या देवाला दोष देत तिळातिळाने मृत्यूकडे जायचे.
मागच्या वर्षी भारत सरकारने आत्महत्या हा गुन्हा नाही' असे विधेयक संसदेसमोर आणले होते. त्यावर बरीच साधकबाधक चर्चा झाली. काही लोकांच्या मते आत्महत्या झाली असे भासवून समाजकंटक दुसऱ्याचा खून करतील; परंतु इच्छामरणासाठी लढा देणाऱ्या लोकांच्या मते हे काही खरे नाही. काही रुग्ण तर चारचौघांच्या समक्ष व औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या समक्षही हे सांगतात की, ते मरणाला मिठी मारायला उत्सुक आहेत. त्यांना जगावेसे वाटत नाही. संसदेने आत्महत्या हा गुन्हा नाही हे मान्य केल्याने जगायला विटलेल्या लोकांना आत्महत्येचा, स्वाभिमानाने मरण्याचा वा 'इच्छामरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन