चक्कर का येते ?

चक्कर येण्याची कारणे एवढी आहेत की नुसती वाचतानाच आपल्याला चक्कर येईल ! 'चक्कर येणे' म्हणजे गरगरणे. अर्थात त्या व्यक्तीस स्वत: किंवा आजुबाजुचे जग गरगर फिरते आहे, अशी भावना होणे. काही रोगांमध्ये गरगरणे वा चक्कर येणे एवढाच त्रास होतो. काही आजारांमध्ये मात्र यानंतर डोळ्यांपुढे अंधारी येणे, उभे असल्यास खाली पडणे, बेशुद्ध होणे आदी घटनाही घडतात. नुसते गरगरणे वा चक्कर येणे हा त्रास अंतकर्ण किंवा त्याच्याशी संबंधित मेंदुचा भाग यांच्या आजारांमुळे होतो. बस लागण्याचा प्रकारही अंतकर्णाच्या संवेदनशीलतेमुळेच होतो.

अति रक्तदाब असताना अचानक उभे राहणे, अल्प रक्तदाब, पोटातील चलनवलन एकदम बदलल्यास किंवा अतिवेदनेमुळे मज्जासंस्थेवर होणारा तात्पुरता परिणाम इत्यादी कारणांमुळे मेंदुला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो व चक्कर अाल्यानंतर व्यक्ती खाली पडते किंवा जागच्या जागी बेशुद्ध होते. खाली पडल्यानंतर जेव्हा मेंदुचा रक्तपुरवठा सुधारतो तेव्हा व्यक्ती शुद्धीवर येते.

रक्तस्त्राव, ह्रदयविकार, खूप जुलाब उलट्या यांमुळे झालेले निर्जलिकरण, मेंदुतील रक्तस्त्राव इत्यादीमध्ये मेंदुचा रक्तपुरवठा लवकर नीट होऊ शकत नाही; त्यामुळे बेशुद्धी जास्त वेळ राहते. रक्तपांढरी, खूप ताप, दृष्टिदोष, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे इत्यादींमुळे चक्कर येते किंवा तशी भावना होते.

यावरून लक्षात येईल की चक्कर येण्याची काही कारणे सौम्य रोग्यांची तर काही अत्यंत गंभीर रोगांची लक्षणे आहेत. त्यामुळे चक्कर येणार्‍या व्यक्तीस तात्काळ डाॅक्टरांना दाखवावे, हेच योग्य. घरगुती उपायांमुळे मौल्यवान वेळ वाया जाऊ शकेल व प्रसंगी रुग्ण दगावण्याची किंवा त्याला कायमचे अपंगत्व येण्याची वेळ येऊ शकेल.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...    

Previous Post Next Post