आदिवासी म्हणजे सुदृढ व संपन्न सांस्कृतिक वारसा होय. आदिवासी म्हणजे गौरवशाली इतिहास होय. भाषा-साहित्य- कलेने श्रीमंत असणारा समाज म्हणजे आदिवासी होय. गीरीकुहार, जंगलजाजीव्हार, पशुपक्षी यांनी गजबजलेला समाज म्हणजे आदिवासी. एकांत धारण करून निसर्गसौंदर्याची पूजा करणारा आणि आपल्या जीवनात निसर्गाला सर्वोच्च स्थान देणारा समाज म्हणजे आदिवासी.
आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर डोंगर दऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहऱ्याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही.
आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्या रानमेवाव्यावर करीत आहे. आजही गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, किनवट, आदिलाबाद (आ.प्र.) या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. 'आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी' असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना 'इंडिजिनस ' अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघट जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तेव्हापासून ९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
आदिवासी समाज येत्या काळात फक्त म्युझिअम मध्ये पाहायला मिळेल कि काय ? त्याची संस्कृती लयास चाललेली आहे हा धोका वेळीच ओळखून संयुक्त राष्ट्र संघाने घेतलेलं हे पाउल अत्यंत महत्त्वाचे आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही.
आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६९ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२००५ हे आदिवासी दशक म्हणून साजरा करण्यात आले होते. भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात.
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त, कोकणा- कोकणी वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान कोलाम, कोरकू माडिया गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते होऊन गेले क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे, बख्त बुलंद शहा , दलपतशहा रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा या प्रत्येकाची शासनाने पाठयपुस्तक मंडळाने दखल घेतली पहिजे.
रावणाचे वंशज आजही आदिवासी म्हणूनच श्रीलंकेत ओळखले जातात अन त्यांना श्रीलंका शासनाकडून तशी वंशज म्हणून रक्कम अदा केली जाते.
आदिवासींचे महत्व व महात्म्य खालील कवितेतून आपणास समजू शकेल...
वेगळी तुझी बोलीभाषा, धर्म तुझा आगळा लाकडाचा केला नांगर, अन स्वता बैल झाला ओबड-धोबड जमीन कसत, मैलो मैल चालला सर्वांआधी जन्मला तरी मागं कसा राहिला ?
होतास भोळा अंगात नाना कला
अफाट कल्पनाशक्तीने फुलवलास मळा
देवा तुझा हा हिरवा निसर्ग
तू जन्मापासून पुजला
सर्वांआधी जन्मला तरी
मागं कसा राहिला ?
इतिहास रचला गेला, लिहिला गेला
पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला
गड जिंकले गेले,
तुझा इतिहास मात्र गाडला
सर्वांआधी जन्मला तरी
मागं कसा राहिला ?
एकलव्याच्या कालापासून आदिवासी समाज अन्याय सहन करत आला आहे. अगदी इतिहासकारांनी देखील अन्याय करण्याचे सोडले नाही. इतिहासाच्या बाबतीत आदिवासी समाजावर झालेला अन्याय खालील कवितेतून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे...
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?
जंगलात बहरलेला संसार सोडूनी
केला समाजाचा उध्दार
ते आदिम संस्कृतीसाठी जगले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?
आजचा इतिहासही रडेल
जेव्हा आदिवासी बलिदान बोलेल
ते मानवतेसाठी फासावर चढले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले?
आदिवासी मुलांनी आपल्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी व आकाशात उंच भरारी घ्यावी म्हणून एक कविता...
आदिवासी बांधवा उठ !
घे मोकळा श्वास
पसरव तुझे बाहू
आणि लुट तू
जीवनाची सारी संपत्ती
पण उठ...
आदिवासी बांधवा उठ !
कुडाची झोपडी सोड
जंगलातून बाहेर बघ
आत्ता वेळ आलीय
ओळख, बहुमोल हि वेळ
अरे तू म्हणशील
तसाच होवू शकेल
तुझ्या जन्माचा प्रवास
पण तू उठ
आदिवासी बांधवा उठ !
होऊ दे रे जाण
कसा सोकावलाय काळ
तू आहेस रे विजेता
म्हणून तू उठ
आदिवासी बांधवा उठ !
आत्ता एक लक्षात ठेव
सुंदर तुझे स्वच्छंदी जीवन
अडचण वाटतेय
जंगलाच्या ठेकेदारांना
म्हणून तू उठ
आदिवासी बांधवा उठ !
निसर्गातील पक्षांगत
घे भरारी
पण विकास करील कोणी
दुख सारील कोणी
यावर विश्वास ठेवू नकोस
तू आहेस निर्मळ झरा
पण तू उठ
आदिवासी बांधवा उठ !
सुंदर... संपन्न संस्कृती सवे
तू उठ
आदिवासी बांधवा उठ !
अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिवस कुठे तरी आदिवासी विचारांनी साजरा होवो. हा सर्व सोपस्कार इथे मांडण्यापाठीमागे एकच उद्दिष्ट कि असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर झाले पाहिजे.
आदिवासी क्रांतिकारकांचा शोध घेतल्यास आपणास चंद्रपूरची महाराणी हिराई बाबुराव , दलपतशहा, रघुनाथशहा शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे, बख्त बुलन्दशहा, वीरांगना राणी दुर्गावती मडावी कुमरा भीमा, तंट्या भिल्ल खाज्या नाईक, बिरसा मुंडा, 1 भागोजी नाईक खेमा नाईक, ताना भगत अशी अनेक मौल्यवान रत्ने होण्या केंगले सापडतील. आज या सर्वांचा इतिहास जगासमोर आणण्याची आणि या सर्वांचे स्मारक बनविण्याची गरज आहे.
आदिवासी समाजाला आपले अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल, आपली संस्कृती जपायची असेल तर प्रत्येकात स्वत्वाची जाणीव निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासी साहित्य हे आदिवासी विचारांतून पुढे येणे गरजेचे आहे. सध्या उपलब्ध साहित्य आपल्या मुलांनी वाचणे अत्यावश्यक आहे.
आदिवासींचा प्राचीन इतिहास गौरव शाली आसताना आज समाजाची अवस्था खालावलेली आहे त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आदिवासी समाजाला कुठेतरी आपला इतिहास आणि संस्कृती यांचा विसर पडलेला आहे. म्हणून तमाम आदिवासी बांधवांनी स्वनिर्णय, स्वस्थान या बाबी जपून आपला इतिहास व संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारला शरण जावून आरक्षनाच्या कुबड्या घेवून मिरवत बसण्यापेक्षा निसर्ग देवतेची पूजा करून या सरकारला आदिवासी ताकद दाखविण्यास आपण सज्ज झाले पाहिजे. आदिवासींनी आपली निष्ठा, संघर्षाची उर्मी, आत्मसन्मानाचे मापदंड यांचे वैभव जपण्याची गरज आहे. शिक्षणाने फक्त आदिवासी साक्षर होईल, पण त्याची संस्कृती जपली जाईल काय? हा विचार करून त्यादृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.
कुणीही कुणाचे दुख हलके करत नाही. आदिवासींचे दुख तर कोण दूर करणार ? म्हणून आज तरुणांनी साहित्य आणि चळवळ या दोन्हीन्द्वारे हे दुख दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. धरणात जमीन गेली तर माणसे विस्थापित होतात पण आपले विचार, आपली संस्कृती हिसकावून घेतली तर संपूर्ण समाज विस्थापित होईल. म्हणून संस्कृती हिसकावू पाहणा-या या प्रवृत्ती उखडून टाकण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित लढ्याची गरज आहे.
आजच्या युगात आदिवासी समाज पुढारलेला व्हावा आदिवासी समाजातील मुले खूप शिकावीत. जगाच्या बाजारपेठेत त्यांनी भारताचे नेतृत्व करावे असा अभिमान प्रत्येक आदिवासी बांधवाच्या मनात आहे. परंतु असे असले तरी जो शिकलाय, जो आदिवासी बांधव नोकरीला लागलाय आज त्यापैकी काहींना आदिवासी या शब्दाची लाज वाटता कामा नये. त्यांनी जगासमोर जाताना आपली आदिवासी ओळख लपवण्याची आवश्यकता नाही. आपण जे आहात ते काही आपल्या प्रयत्नांनी आणि काही आपल्या समाजाच्या अस्तित्वामुळे, म्हणून आपण ताठ मानेने आपली खरी ओळख जगाला पटवून देणे गरजेचे आहे. आपल्या बोलण्यातून वागण्यातून आपले आदिवासीपण जगाला डोळे फाडून पाहू देनेहही गरजेचे आहे. आपल्या मुलांना मराठी, हिंदी इंग्रजी भाषा बोलायला लावणारे पालक आदिवासी बोली विसरत चालले आहेत याची खंत मनाला अधिक त्रासदायक ठरते. " माय मरो आणि मावशी जगो " अशीच संस्कृती आपण आपली मायबोली विसरून जपत आहात. आपल्या मायबोलीच्या पाठीत खंजीर खुपसून काय आपण जगाचे आणि आपल्या कुटुंबाचे नेतृत्व करायला लायक आहात का याचा विचार करावा.
मान्य आहे कि काळाच्या ओघात बदल होत आहेत. तसेही बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून आदिवासी जीवनशैलीत बदल व विकास व्हावा हे वाटणे गैर नाही, परंतु आपली संस्कृती विसरायला लावणारा हा विकास आपण पचणार तरी कसे ? हा विचार सर्व आदिवासी बांधवांनी केला पाहिजे.
--------------------------------
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
--------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻