1 में सूत्रसंचालन | महाराष्ट्र दिन सूत्रसंचालन | कामगार दिन सूत्रसंचालन | Maharastra Din Sutrasanchalan | Maharastra Din Anchoring

आगतम...  स्वागतम... सुस्वागतम...!!

राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने व चैतन्याने उगवलेल्या आजच्या या मंगलप्रभाती मी श्री. / सौ. ______  सर्वप्रथम आपणा सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा देतो / देते आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा,

प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा |

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ||

महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास फार प्राचीन आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र बनलेला आहे. आज महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक उद्योगधंदे असलेले आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि सोबतच मुंबई भारताची आर्थिक राजधानी देखील आहे. त्यामुळे भारताच्या नकाशा मध्ये महाराष्ट्र राज्याला खूप टोकाचे आणि महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. महा आणि राष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, जहाल मताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या सारख्या ज्ञानी संतांनी सुद्धा इथेच जन्म घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याने महाराष्ट्र सजला आहे राज्याच्या नकाशावर हे किल्ले जणु माणिकमोत्यांप्रमाणे आजही दिमाखात लखलखतायेत!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमादित्य सुनील गावस्कर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी व अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगात अजरामर केले. अशाप्रकारे आपुल्या महाराष्ट्राचे वर्णावे तितके गुणगान कमीच आहे.

आपला महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, शिवबाच्या गड-किल्ल्यांनी सजला आहे. गोदावरी सारख्या मोठ्या नद्या अजिंठा-वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी, विद्येचे माहेरघर पुणे, अमाप निसर्गसौंदर्याने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी तर नागपुर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर उंच आहे.

1 मे महाराष्ट्र दिनासोबतच आजच्या या दिवसाला कष्टकऱ्यांच्या जागतिक पातळीवरील  इतिहासात देखील अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. कारण जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा हा एक विशेष दिवस आहे.  म्हणूनच    १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस कामगार दिवस म्हणून पाळला जातो. 

अध्यक्षीय निवड :

असं म्हणतात कि आपली काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं...

अगदी या ओळींप्रमाणेच... सामान्यांचे तसेच सतत आपल्या शाळेचे हित जपणारे / जपणाऱ्या, तसेच कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे श्री. / सौ. ____________________ यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

( सहकारी शिक्षक / शिक्षिकेने अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन द्यावे. )

तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सन्मानीय श्री. / सौ. _________ यांचेही मी या ठिकाणी स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

दीपप्रज्वलन / ध्वजारोहण  :

उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो / करते कि त्यांनी दीपप्रज्वलन करावे.

सुमंगल या वातावरणात

संचारुनी आली देशभक्ती

मान्यवरांनी शुभहस्ते

प्रज्वलीत कराव्या ज्योती

                                                                                                                     - गिरीश दारुंटे

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ||

संताजी - तानाजी धनाजी, शिवरायांची धरती

कधी न झुकली जुलमापुरती अशी मराठी माती

लोकशाहीचा युगकर्ता हा राजांचा राजा ॥१॥

इथे नांदती संत, महंत, पंत आणि पंडीत

कृष्णा, कोयना, गायत्री, वेण्णा किर्ती गाती वहात

इथेच आमुच्या ज्ञानेश्वरीचा ज्ञानीयांचा राजा ॥२॥

रायगड अन् प्रतापगड हे, सिंहगड गर्जती

पराक्रमाचे गाती पोवाडे अभिमानाचे झुलती

संकटी असता भारत माता राखीतसे लज्जा ॥३॥

शौर्य त्याग अन् स्वातंत्र्याची इथे चालते पुजा

अन्यायाला तुडवीत पायी, घेऊनी तिरंगी ध्वजा

शूर विरांच्या शिरोमणी हा भारत भू चा कलिजा ॥४॥

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ||

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ____________ यांनी  ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

(मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी, ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने / एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर देण्यात यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी व तद्नंतर राज्यगीताचे गायन घेण्यात यावे.)

मान्यवर परिचय / स्वागत :

व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा.

अध्यक्ष : श्री / सौ. ________

प्रमुख पाहुणे : श्री. / सौ. ________

( पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करावे. )

प्रास्ताविक :

मान्यवरांचा आशिर्वाद घेवून

साथ द्यावी सर्वांनी मिळून

आजच्या कार्यक्रमाचा उद्देश

जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून

ज्या कार्यक्रमासाठी आज आपण सर्व येथे उपस्थित राहिलो आहोत, या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून समजून सांगण्यासाठी मी श्री. / सौ. ____________________  यांना विनंती करतो / करते कि त्यांनी मंचावर यावे व आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे.

        नमस्कार...

        मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या विद्यार्थी मित्रांनो...

बहु असोत सुंदर संपन्न की महा|

प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा ||

आपल्या या महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट् या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात राष्ट्रिक आणि नंतर महाराष्ट्र या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएनत्संग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्री या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. 

विद्यार्थी मित्रांनो भारताला इ.स. १९४७ साली स्वातंत्र्य लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी जनात क्षोभ उसळला. अखेर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे.

महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकत्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही.

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचे संवर्धन, पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले.

देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतांनाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस. एम. जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.

आजच्या याच दिवसाची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी देखील आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो.  १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन आहे. प्रत्येक वर्षी १ मे रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव घेतला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली आणि त्यानंतर १८९१ पासून ' १ मे' हा कामगारदिन पाळण्यास सुरुवात झाली.

'आठ तास काम, आठ तास आराम व आठ तास मुक्त जगण्यासाठी'... असे गीतही तयार करण्यात आले होते. भारतातील पहिला कामगार दिन भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता. आंतरराष्ट्रीय कामगार दिन देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरवही या दिवशी करण्यात येतो.

देशहिताचे विचार अंगी बाळगण्याची व देशभक्ती , राष्ट्रहित प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या हृदयी जोपासण्यासाठी वचनबद्ध होऊयात. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो / देते. धन्यवाद !!

विद्यार्थी व शिक्षक भाषणे :

( प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत. आपल्या नियोजनानुसार सांस्कृतिक कार्यक्रम / देशभक्ती गीत गायन घेण्यात यावे )

अध्यक्षीय भाषण / मनोगत :

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त

तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे

जीवणाचे संपूर्ण शास्त्र

ज्ञानरूपी मार्गाच्या

पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा

त्यासाठी मान आहे

अध्यक्षीय मार्गदर्शनाचा

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. ______________________________ यांनी  त्यांच्या अनुभावाच्या व ज्ञानाच्या कुंभातील काही मौलिक विचार मांडावे , जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत.... धन्यवाद !!

ज्ञानकुंभ रिता करुनी

राष्ट्रहिताचे ज्ञान दिले

बोधामृत पाजून देशभक्तीचे

आम्हा उपकृत केले

                                                                                                         - गिरीष दारुंटे

आभार :

आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन श्री. / सौ. __________________ हे / या करतील.

कार्यक्रम झाला बहारदार

भाषणेही झाली जोरदार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली

आपल्या मार्गदशर्नाने

आम्हाला दिशा मिळाली

शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

आजच्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

सर्व मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची निश्चितच प्रगती साधली जाईल.

सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल मी _________  विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो / मानते.

अध्यक्षांच्या परवानगीने महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो / करते.

!!  जय हिंद - जय महाराष्ट्र  !!

( सूत्रसंचालनातील हिंदी शायरी व काही चारोळ्या या संकलीत असल्याने ज्ञात / अज्ञात कवींचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता. )

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━••━━━━━━┅┉

Previous Post Next Post