“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत “घरोघरी तिरंगा" हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्याबाबत | Har Ghar Tiranga

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत “घरोघरी तिरंगा" हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्याबाबत | Har Ghar Tiranga
महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८२/आस्था-२

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०००३२

दिनांक : २२ जुलै, २०२२

शासन निर्णय डाऊनलोड करा

प्रस्तावना : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनांनुसार हर घर तिरंगा " हा उपक्रम राबविण्याबाबतच्या सविस्तर सूचना उपरोक्त वाचामधील शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरुन उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय / निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, निवासस्थाने, इ. इमारतींवर "हर घर तिरंगा " या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविण्यासंदर्भात त्यानुसार पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार "हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात यावा. सदर उपक्रम उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय/ निमशासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, वसतिगृहे, निवासस्थाने, इ. इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविला जाईल याची खातरजमा सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. सदर उपक्रम राबविताना त्यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश करावा...

१) प्रत्येक विभाग / उप विभाग, विद्यापीठ / महाविद्यालय, कार्यालय यांच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर "घरोघरी तिरंगा " ही टॅगलाईन तसेच तिरंग्याचे चित्र प्रदर्शित करावे.

२) सर्व शासकीय / निम शासकीय अधिकारी/कर्मचारी/शिक्षक / शिक्षेतर कर्मचारी / विद्यार्थी/पालक यांनी समाज माध्यामांद्वारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप, इ.) तिरंग्याविषयक चित्र, संदेश प्रदर्शित करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी आवाहन करावे.

३) उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरीचे आयोजन करुन या उपक्रमाबाबत पालक व नागरिकांमध्ये प्रचार, प्रसार व जाणीव जागृती करावी. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा समावेश करुन मोठ्या प्रमाणावर आयोजन करता येईल.

४) शासकीय / निम शासकीय इमारतींबरोबरच खाजगी इमारतींवर अथवा राहत्या घरावर तिरंगा फडकविण्याबाबत सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरुन इतर नागरिकांमध्ये या उपक्रमाची जागृती निर्माण होण्यास मदत होईल.

५) सांस्कृतिक कार्य विभागाने सदर उपक्रमाच्या जागृती मोहिमेसाठी जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित, इ. ची निर्मिती केली आहे. त्याबाबतची माहिती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर जिंगल्स, गीते, पोस्टर्स, इ. चा वापर शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच सर्वसाधारण नागरिकांनी देखील सदर उपक्रमाच्या प्रचार, प्रसारासाठी करावा.

६) सदर उपक्रमाकरिता राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागांमार्फत देखील तालुका/गांव पातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच शासन स्तरावरुन देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील.

७) "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबतचे फोटो, चित्रफिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याची कार्यवाही राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांचेमार्फत सुरु आहे. त्याचप्रमाणे "घरोघरी तिरंगा " कार्यक्रमाचे फोटो, चित्रफिती, इ. मोठ्या प्रमाणावर वेबसाईटवर अपलोड होण्यासाठी राज्य संपर्क अधिकारी, रा.से.यो. यांनी विशेष पथक तयार करुन त्यांचेमार्फत अपलोड करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरुन राज्यातील उपक्रमाची जास्तीत जास्त माहिती देश पातळीवर पोहचेल.

८) वरील सर्व उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत देखील जाणीव जागृती करण्यात यावी.

सर्व विद्यापीठाच्या कुलसचिवांनी त्यांच्या विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयांना सदर उपक्रमाबाबत सूचना द्याव्यात. सदर उपक्रमासाठी विभागांतर्गत सर्व संचालक, विभागीय सह संचालक, उपसंचालक/सहायक संचालक, जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम समन्वयक या शिवाय विद्यापीठ स्तरावरील कुलसचिव, उप कुलसचिव, सहायक कुलसचिव, महाविद्यालय स्तरावरील प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, इ. सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असून सदर उपक्रम यशस्वी होण्याकरिता सर्वांनी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि. १६ ऑगस्ट, २०२२ नंतर तातडीने सर्व संचालकांमार्फत शासनास सादर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharshtra.go.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२२०७२२११३६२२८२०८ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने...

प्रताप लुबाळ

उपसचिव, महाराष्ट्र शासन

----------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻