डॉक्टरांच्या वेगवेगळ्या पदव्या कोणत्या?

तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे जायचे हे कसे ठरवता ? अशावेळी तुम्ही डॉक्टरांची पदवी काय आहे याचा नक्कीच विचार करत असाल. अॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेद या वैद्यकशास्त्राच्या तीन प्रमुख शाखांमधील डॉक्टरांच्या पदव्यांविषयी आता माहिती घेऊ.

होमिओपॅथी डी.एच.एम.एस. (पदविका) एल.सी.इ.एच., बी.एच.एम.एस. आदी पदव्या असतात. आयुर्वेदामध्ये सध्या बी.ए.एम.एस., एम.डी. (आयुर्वेद), आयुर्वेदाचार्य आदी पदव्या आहेत. आयुर्वेदात पदव्युत्तर अभ्यासक्रमात कायचिकित्सा (मेडिसिन), शल्यतंत्र (सर्जरी), शालाक्यतंत्र (इएनटी व अॅप्थॅलमाॅलाॅजी), प्रसूती व स्त्रीरोग (गायनॅक) असे विविध अभ्यासक्रम असतात.

आधुनिक वैद्यकशास्त्रात पदविका अभ्यासक्रम नाहीत. १९७८ मध्ये डिप्लोमा इन मेडिसिन अँड सर्जरी (डी.एम.एस.) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. सध्या तो अस्तित्वात नाही. एमबीबीएस हा पदवी अभ्यासक्रम आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात एम.डी./एम.एस. तसेच डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत. एम.डी. अभ्यासक्रम जनरल मेडिसिन, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, बालरोग, त्वचा व गुप्तरोग, क्षयरोग, बधिरीकरण शास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, औषधी निर्माण, सामाजिक व रोगप्रतिबंधक औषधशास्त्र आदींसाठी उपलब्ध आहे. एम.एस. अभ्यासक्रम जनरल सर्जरी, नाक कान घसा, नेत्र रोग, अस्थिरोग आदींसाठी उपलब्ध आहे. एम.डी. नंतर डी.एम. हा पुढचा अभ्यासक्रम आहे, तर एम.एस. नंतर एम.सी.एच. हा पुढचा अभ्यासक्रम आहे. काही डॉक्टर्स पीएचडी ही पदवीही मिळवतात.

अशा या डॉक्टरांच्या पदव्या. काही गोष्टी रुग्णांनी लक्षात ठेवाव्या. महत्त्वाचे म्हणजे ज्या पद्धतीचे उपचार त्या पद्धतीच्या तज्ज्ञांकडूनच घ्यावे, कारण डॉक्टर हा सर्वज्ञ नसतो. अॅलोपॅथीचा डॉक्टरांकडून आयुर्वेद व होमिओपॅथीच्या डॉक्टरकडून अॅलोपॅथीचे उपचार घेणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळणे होय. आपल्या रोगाच्या प्रकारानुसार त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडे जाणे केव्हाही चांगले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रोपॅथी, इलेक्ट्रो होमिओपॅथी यांना सरकारची मान्यता नाही. त्यामुळे असे डॉक्टर हे भोंदू वैदूसारखेच असतात. त्यांच्यापासून चार हात दूर राहावे.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...  

Previous Post Next Post