बस का लागते ?
बसमध्ये प्रवास करण्यातला आनंद तुम्ही घेत असाल. काही जणांच्या नशिबात मात्र हे सुख नसते. गाडीत बसण्यापूर्वी 'एवोमीन' सारखी गोळी घेणे, प्रवासापूर्वी व प्रवासात काही न खाणे, जेवण केल्यावर प्रवास टाळणे, गाडीत सर्वात मागच्या सीटवर वा दारापाशी बसणे असे अनेक सोपस्कार त्यांना करावे लागतात. वारंवार तोंडाला रुमाल लावून बसणे आणि काही वेळा सारख्या उलटय़ा करणे, हे तुम्ही केव्हा ना केव्हा बघितलेच असेल. त्यामुळे बसमध्ये बसताना आपल्या शेजारी अशी 'संशयास्पद' व्यक्ती नाही, याची खात्री करूनच एखाद्या सीटवर आपण बसतो.
अंतर्कर्णामध्ये लॅबीरींथ नावाचा एक भाग असतो. चालताना, हालचाल करताना, दिशा बदलताना शरीराचा तोल सांभाळणे हे याचे कार्य असते. बसमध्ये सारख्या हादर्यांनी शरीर थरथरत असते, हलत असते. त्यामुळे या भागाला वारंवार संवेदना पोहोचतात व जास्तीचे काम करावे लागते. सामान्यपणे बऱ्याचशा लोकांचे लॅबीरींथ अशा बदलांशी जुळवून घेते; पण काही व्यक्तींमध्ये मात्र हादऱ्यामुळे व सततच्या वेड्यावाकड्या हालचालींमुळे लॅबीरींथच्या कार्य करण्यावर परिणाम होतो. त्यामुळे अप्रिय संवेदना मेंदूपर्यंत जातात. मेंदूतील उलटीचे नियंत्रण करणाऱ्या केंद्रावर या संवेदनांचा परिणाम होऊन व्यक्तीला उलटी होते. नंतर मानसिक ताण व आपल्याला उलटी होईल या भावनेनेही उलटी करण्याची प्रवृत्ती वाढते व जास्त उलट्या होतात. बोटीत देखील याच कारणामुळे काही जणांना उलट्या होतात.
एवोमीनसारख्या औषधात उलटी थांबवणारा व झोप येणारा असा घटक असल्याने उलट्या थांबतात. अशा व्यक्तींनी गोळ्या जवळ बाळगाव्यात. प्रवासात खाद्यपदार्थ घेणे टाळावे. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अर्धा तास आधी एवोमीनची गोळी घ्यावी.
साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...