रक्ताचा कर्करोग (Leukemia ) म्हणजे काय?
शरीर पेशींचे बनलेले असते. या पेशींच्या संख्येत गरजेपेक्षा जास्त वाढ झाली, तर त्याला कर्करोग असे म्हणतातः रक्ताच्या कर्करोगाला 'ल्युकेमिया' असे म्हणतात. रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या १० × १०" प्रति लिटरपेक्षा जास्त झाली, तर पांढऱ्या पेशींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे; असे म्हणता येते. रक्तातील पांढऱ्या पेशींचे ग्रॅन्युलोसाईट, लिम्फोसाईट व मोनोसाईट हे तीन उपप्रकार असतात. रक्ताच्या कर्करोगामध्ये रक्तातील या पेशींचे प्रमाण लक्षणीयपणे वाढते. कर्करोगामध्ये कोणत्या पेशींवर परिणाम झाला आहे, त्यानुसार कर्करोगाचे लिंफॅटीक व मायालॉईड असे प्रकार पडतात. कर्करोगात आढळणाऱ्या पेशी किती विकसित आहेत, त्यावरून अॅक्यूट व क्रोनिक असेही प्रकार पडतात. अॅक्यूट प्रकारच्या कर्करोगावर जर उपचार केले नाही, तर रुग्ण तीन महिन्यात मृत्यू पावतो. किरणोत्सर्ग, बेझॉलसारखे रासायनिक पदार्थ, काही आनुवंशिक कारणे व विषाणू अशा अनेक गोष्टी ल्युकेमिया होण्यास कारणीभूत ठरतात. ल्युकेमियाच्या रुग्णामध्ये अशक्तपणा, रक्तक्षय, ताप व रक्तस्त्राव होण्याची प्रवृत्ती आढळून येते.
अॅक्यूट लिम्फॅटीक प्रकारच्या ल्यूकेमियात औषधोपचारांचा चांगला परिणाम होतो. प्रेडनीसोन व व्हीन्क्रीस्टीन ही औषधे वापरली जातात. मायलोब्लास्टीक प्रकारात अरॅबिनोसील सायटोसीन, सायक्लो फॉस्फॉमाईड आदी औषधे वापरली जातात. यामुळे रुग्णाचे आयुष्य वाढू शकते. काही प्रमाणात कर्करोगाची वाढ नियंत्रित करता येते. तथापि, बहुतांश कर्करोगाप्रमाणेच रक्ताच्या कर्करोगावरही खात्रीशीर असे उपचार उपलब्ध नाहीत.
डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन