नाव : वसंतराव नारायणराव नाईक
जन्म : 21 नोव्हेंबर १९१2
मृत्यू : १४ डिसेंबर १९६८, भुसावळ
राजकीय पक्ष : काँग्रेस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव
मतदारसंघ : नाशिक
धर्म : हिंदू (वंजारी)
स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग :
वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात 21 नोव्हेंबर १९१2 रोजी झाला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सायमन कमिशनला विरोध करीत महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.
१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्तकेली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही.
शैक्षणिक जीवनातच स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले होते. सधन घरात जन्मल्यानंतर क्रांतिवीर नाईक यांनी शिक्षण सुरू असताना ब्रिटीशकालीन राजवटीतील सायमन कमिशनला त्यांनी विरोध दर्शविला. मीठाच्या सत्याग्रहातील सहभाग, ब्रिटीशांविरोधात तरुणांचे संघटीकरण, चलेजाव घोषणांमधील सहभाग अशा देशकार्यातील सहभागांमुळे ब्रिटिशांनी त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही ब्रिटीशांनी त्यांना सरकारी खजिना लुटल्याच्या आरोपावरून शोध सुरू केला होता. त्यावेळी क्रांतिवीरांनी महात्मा गांधींना पत्र लिहून या खटल्यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर महात्मा गांधी यांनी बॅ. मुन्शी, बॅ. धीरूभाई देसाई यांच्यावर खटल्याची जबाबदारी सोपविली. नाशिकमध्येच चालविण्यात आलेल्या या खटल्यातून पुढे क्रांतिवीर नाईक निर्दोष सुटले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात मनमाडच्या नगराध्यक्ष पदापासून तर कायदेमंडळावर आमदार पदापर्यंत जाऊनही राजकीय चढाओढीत त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली होती.
आईचे निधन :
याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दु:खद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले.
निवडणुकीतील कारकीर्द :
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते विजयी झाले. पुढे १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते.
मृत्यू :
१४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दु:खद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला.
चिरंतन स्मृती :
आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दु:ख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली गेली आहे.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचे देशकार्यातील योगदान अतिशय मोठे आहे. सरकारने आजवर त्यांच्या कार्याची नोंद शासकीय दप्तरात करणे आवश्यक होते. मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील नागरीकांनी जशा त्यांची स्मृती जपली आहे तशीच शासनानेही त्यांच्या कार्याची नोंद करून स्मृती जपावी, अशी सर्वांनाच कळकळीची अपेक्षा !!