आयुष्याची समिधा करणारे नायक...

मनमाडचे भुमीपुत्र.... क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नाशिक जिल्ह्यातील सोनेरी पान म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे नाव म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक. त्यांचा जन्म 21 नोव्हेंबर १९१२ रोजी वेहेळगाव (ता. नांदगाव , जि. नाशिक) येथे एका सधन कुटुंबात झाला. परंतु वडिलांच्या सावकारीच्या कर्जवह्या फाडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत देशासाठी आजन्म अविवाहित राहत देशसेवेला वाहून घेणा-या या थोर क्रांतिकारकाचे चरित्र तसे उपेक्षितच राहिले.

अवघ्या पंधराव्या वर्षी गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन या क्रांतिकारकाने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. मिठाच्या सत्याग्रह चळवळीतील सहभागाबद्दल त्यांनी १८ व्यावर्षी सक्तमजुरीची शिक्षा भोगली. यानंतर त्यांनी १९३२, १९३९, १९४२ आणि १९४४ मध्येही तुरुंगवास भोगला. बिहारमध्ये झालेल्या भूकंपानंतर नगराध्यक्षपदाचा त्यांनी त्याग केला आणि मदत कार्यासाठी बिहारकडे धाव घेतली होती. बिहारमधून परतताच मनमाडकरांनी त्यांना बिनविरोध नगराध्यक्ष बनविले.

१९३७ मध्ये ते सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून मुंबई असेंब्लीत निवडून गेले. १९४२ च्या चळवळीतही त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. इंग्रजांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लिलावात कोणीही सहभागी झाले नाही. यावरूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते. अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी, एस. एम. जोशी आदींसोबत त्यांनी देशसेवा केली. वसंतरावांनी जिल्ह्यात सुमारे सात वर्षे कॉँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीसपद आणि अखिल भारतीय कॉँग्रेसचे सभासद होण्याचाही बहुमान त्यांना मिळाला. नाशिकला १९५० मध्ये झालेले अखिल भारतीय कॉँग्रेसचे ५६ वे अधिवेशन यशस्वी करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता.

नाशिक मतदारसंघातून ते पाचवेळा विधानसभेवर निवडूनही गेले. तत्कालीन सिन्नर-निफाड या विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व त्यांनी केले. १४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांसमोर भाषण करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वसंतरावांची प्राणज्योत मालविली.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड (नाशिक) 

Previous Post Next Post