जिजामातांचा जन्म सिंदखेड येथे फसली सन १००७ च्या पौषी पौर्णिमेला सूर्योदय समयी, म्हणजे गुरुवार दिनांक १२ जानेवारी १५९८ रोजी सकाळी झाला त्या दिवशी पुष्यनक्षत्र होते म्हणजे गुरुपुष्याचेर सुमुहूर्तावर जिजाऊ जन्मल्या.

सिंदखेडकर राजे लखुजी जाधवराव यांचे कुळात महाळसा राणी साहेब यांच्या पोटी जन्मलेले हे कन्यारत्न म्हणजे जिजाऊ साहेब. सन १६०५ मध्ये फर्जंद शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला. जो पर्यंत जिजाऊ सिंदखेडला होत्या तोपर्यंत उंबरठ्याच्या आतच त्यांचे जग लग्न झाल्यावर त्या दौलताबादला आल्या तेव्हा त्यांना चौफेर माजलेली बादशाही मनमानी समजली, सुलतानशाही चा हैदोस त्यांना समजला.

कत्तली, आगीचे प्रलय, देवळांचे पतन ह्या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले त्यातच फर्जंद शहाजी राजांनी आदिलशाही विरुद्ध बंड करून स्वराज्याचा मार्ग धरला आणि जिजाऊंच्या मनात स्वराज्यच बहरू लागले. त्यावेळी शिवबा राजे आऊसाहेबांच्या पोटात होते आणि जणू स्वराज्याचेच गर्भ संस्कार त्यांवर झाले.

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत : घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप प्यावा कड्यावर उभे राहून खालची माळवद डोळे भरून पहावीत. असे डोहाळे आई साहेबांना होते आणि ते नियतीने पुरविले देखील.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार् याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.

मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या.

रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून, १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती ह्याच मातेने घडविले ह्या मातेस कोटी कोटी प्रणाम !!

संकलन : गिरीष दारुंटे सर, मनमाड-नाशिक

Previous Post Next Post