मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य | Voting - National Duty

शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एन.सी.सी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या लोकशाही राज्यपद्धतीने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा हा हक्क बजाविण्यासाठी मतदान करावे. आपल्या घरी गडी ठेवायचा असेल तरी आपण त्याची चौकशी करतो, माहिती घेतो आणि त्यानंतरच त्याची निवड करतो. मग लोकप्रतिनिधी म्हणून पुढील पाच वर्षांसाठी ज्याची निवड करायची आहे, ती व्यक्ती कशी आहे ते पाहून आणि सारासार विचार करून प्रत्येकाने मतदान करावे. जो कोणी उमेदवार निवडणुकीला उभा आहे, त्याच्याबद्दलची माहिती, प्रसारमाध्यमातून आलेल्या त्याच्या संदर्भात आलेल्या बातम्या, प्रचारसभा या सगळ्यातून सर्वसामान्य माणूस विचार करतो आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांमध्ये त्याला जो उमेदवार योग्य वाटतो, त्याला तो मतदान करतो. आपल्याला पाहिजे आहे अशी व्यक्ती निवडून देणे हे मतदारांच्याच हातात असते. मतदानाच्या माध्यमातून ही संधी सर्वसामान्य नागरिकांना मिळत असते. ही संधी वाया न घालविता प्रत्येकाने त्याचा फायदा करून घ्यावा. मतदारांचे मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि अन्य असे कोणतेही वर्गीकरण न करता या देशाचा नागरिक आणि जागरूक मतदार म्हणून प्रत्येकाने मतदान करावेच

मतदानाचे महत्व :

मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया कुठेतरी सहल काढुया !!! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी सही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. तद्वतच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना चेतविण्याची नितांत गरज आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस ' राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. देशभर या विशेष दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन जिल्हयातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी मतदान करणे का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, निबंध स्पर्धा, शाहीरांच्या पोवाड्यातून जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येतात. विशेषत: 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरुणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जात असतो.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला मतदान करण्याच्या किंवा त्यांनी मतदानाचा हक्क बजवावा या प्रक्रीयेत शंभर टक्के सहभागी करण्याचे निर्देश दिले जात असतात. यानुसार निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या सर्वांना टपाल मत पत्रिका निवडणूक कार्य प्रमाणपत्र यांच्या सहाय्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जात असते. यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत गुंतल्यामुळे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहात असायचे पण आता निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावत असतात.

तरूण मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी इंटरनेटच्या फेसबूक व व्हॉटस्अप सारख्या सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे निवडणूक विभाग नियोजन करतच असते. मतदारांनी होणाऱ्या प्रत्येक निवडणूकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपले मतदानाच्या स्वरूपात सहकार्य लाभावे हीच छोटीशी अपेक्षा.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Previous Post Next Post