सुस्वागतम.... सुस्वागतम.... सुस्वागतम....!!
विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
- महात्मा जोतीराव फुले
विद्येच्या अथांग ज्ञानसागराची महती आपल्या शब्दांत बंदिस्त करणारे थोर विचारवंत, लेखक, समाजसुधारक आणि स्त्री-शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच विशेषकरून ज्यांच्या जन्मदिनानिमित्ताने आजचा ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन अवघ्या भारतात उत्साहाने साजरा होतोय असे महान शिक्षक व शिक्षकांप्रती निस्सीम प्रेम हृदयी जपणारे भारताचे मा. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.... या सर्व महान विभूतींना आदरपूर्वक वंदन करून मी श्री. / सौ. ................... आजच्या आपल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमास / सुत्रसंचलनास सुरुवात करतो / करते.
रंगीबेरंगी मनामनांनी
अशी शाळा ही भरली
जणू शब्द फुलपाखरे ही
चोहीकडे उडाली
शब्द, शब्द कविता झाल्या
अंक, अंक झाले पाढे
गुरुजनांच्या मायेने
हृदय ज्ञानमंदिर झाले.
• अध्यक्षीय निवड :
विद्यार्थी मित्रांनो योजिलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. म्हणूनच आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेले / असलेल्या व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या श्री. / सौ. .............................. यांना मी विनंती करतो / करते. यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना
(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे)
• प्रतिमा पूजन / दीपप्रज्वलन :
सुमंगल वातावरणात
समईच्या उजळल्या वाती
मान्यवरांनी शुभहस्ते
प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती
- गिरीष दारुंटे
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.
तनंतर सर्व मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे.... धन्यवाद !
• मान्यवर परिचय :
(व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या शैक्षणिक / सामाजिक / राजकीय कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा.)
अध्यक्ष : श्री / सौ. ..............................
प्रमुख पाहुणे : श्री. / सौ. ..............................
• मान्यवर स्वागत :
(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन आपल्यास्तरावर करून ठेवावे.)
• प्रास्ताविक :
सुख दुःखाच्या छायेतून कळते
जसे सार अवघ्या जीवनाचे
आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते
तसे हे महत्व प्रास्ताविकाचे
- गिरीष दारुंटे
आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेचे मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका श्री. / सौ. यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित मान्यवरांना नमस्कार....
डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन' शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
डॉ. राधाकृष्णन् यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रासजवळील तिरुत्ताणी येथे झाला. ते ब्राम्हन कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केला जात असे. त्या धार्मिक वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. 'तत्त्वज्ञान' हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी 'वेदांतातील नीतिशास्त्र' या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची साऱ्या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे परदेशात त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते 'नीतिशास्त्र' या विषयाचे प्राध्यापक होते.
शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतके बोलून मी श्री. / सौ. .............................. माझ्या प्रस्ताविकास पूर्णविराम देतो / देते.
• विद्यार्थी व शिक्षक भाषणे :
(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत, हे नियोजन आपल्या स्तरावर अगोदरच करून ठेवावे.)
• अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :
तेज तुमचे आहे
सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवनाचे संपूर्ण शास्त्र
ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून
कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठीच तर मान आहे
अध्यक्षीय मार्गदर्शनाचा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व यशप्राप्तीसाठी आजच अध्यक्ष श्री. / सौ. .............................. आजच्या कार्यक्रमाचे यांनी यथायोग्य मार्गदर्शन करून त्यांच्या अनुभावाच्या व ज्ञानाच्या कुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी व भरभराटीसाठी मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत. धन्यवाद !
• मान्यवरांचे आभार :
ज्ञानकुंभ रिता करुनी
राष्ट्रहिताचे ज्ञान दिले
बोधामृत पाजून ज्ञानाचे
आम्हा उपकृत केले
तुम्ही पाठीराखे आमुचे
सदा तुमचाच आधार
आशीर्वाद असू द्यावे शिरी
स्विकारुनी हे आभार
- गिरीष दारुंटे
आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण, समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.
• आभार प्रदर्शन :
कार्यक्रम झाला बहारदार
भाषणेही झाली जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार
आतिथींच्या येण्याने
कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला नवी दिशा मिळाली
अन शेवटी आता........
आभारप्रदर्शनाची वेळ आली.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ आमच्या विद्यार्थ्यासाठी देऊन व विद्यार्थ्यांप्रती प्रेम व स्नेहरुपात अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
तसेच आजच्या शिक्षकदिनाच्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत
या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार
आपल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल.
सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो.
!! जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र !!
(सूत्रसंचालनातील काही चारोळ्या / भाग संकलीत असल्याने ज्ञात / अज्ञात कवींचे / लेखकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)
शब्दांकन / निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.