भाऊबीज व महत्व | दिवाळी सणाची माहिती | Diwali Bhaubij Information | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

भाऊबीज महत्व

 

DOWNLOAD PDF HERE

भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.

१) तिथी : कार्तिक शुद्ध द्वितीया

२) इतिहास : या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला ; म्हणून या दिवसाला 'यमद्वितीया' असे नाव मिळाले.

३) महत्त्व : यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यातील सत्त्व गुण वृद्धींगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो. यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारी धारिणी अन् पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते.

या दिवशी यमाचे रूप सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ व बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्त्विक भेट प्रथम भूलोकात (पृथ्वीवर) होते अन् त्यानंतर ते माता-पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या सूर्याच्या सत्त्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते.

◆ अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता यमधर्म' हिचे पूजन करतात.

◆ कार्तिक मासात १२ आदित्यांपैकी पूषा हा आदित्य कार्यरत असतो. याचे तत्त्व आणि चैतन्य ग्रहण करता यावे यासाठी आदित्याचे सगुण रूप असणाऱ्या सूर्याचे पूजन करणे योग्य आहे. यम हा सूर्यपुत्र असल्याने सूर्याचा प्रतिनिधी आणि धर्माचे प्रतीक म्हणून या दिवशी यमधर्माचे पूजन केले जाते. यमदेव प्रसन्न झाल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट दूर होते.

या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.

४) आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी यमाचे तारक रूप कार्यरत झाल्यामुळे त्याच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या लयकारी तमप्रधान लहरींचे प्रक्षेपण उणावते. त्यामुळे नरकात पिचत पडलेल्या पापी जिवांना या दिवशी अत्यल्प प्रमाणात नरकयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे यमद्वितीया हा नरकातील पापी जिवांसाठी आनंदाचा दिवस असतो.

◆ हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.

◆ या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.

या दिवशी स्त्री जिवात असलेले देवीतत्त्व जागृत होते आणि त्याचा भावाला लाभ होतो. भाऊ पूर्णवेळ साधना करणारा असेल, तर त्याला आध्यात्मिक लाभ होतो आणि तो साधना करणारा नसेल, तर त्याला व्यावहारिक लाभ होतो. भाऊ व्यवहार सांभाळून साधना करत असेल, तर त्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ ५०-५० टक्के होतो.

५) बहिणीने भावाला ओवाळल्याने भावावर होणारा परिणाम :

भाऊ संत पातळीचा असेल तर त्याच्या चेहऱ्याभोवती औक्षण केल्यास त्याचे आज्ञाचक्र जागृत होते. भाऊ चांगला साधक असेल, तर त्याला छातीपासून डोक्यापर्यंत ओवाळल्यास त्याच्या पातळीप्रमाणे त्याच्या षड्चक्रांतील एक चक्र जागृत होते.

६) सण साजरा करण्याची पद्धत :

यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे : अपमृत्यू निवारणार्थ 'श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।' असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. 'याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे. 'प्रत्येक माणसाला मरण आहे', ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य वा धनाचा अपव्यय होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे, 'हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे, प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत, त्याचा स्वीकार कर तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहीत नाही; म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतो, ज्यामुळे अर्धवट राहिलेल्याची चिंता करण्याची वेळ येत नाही; कारण आम्हाला माहीत आहे की, तू अचानक कधीही येऊ शकतोस.'

◆ यमतर्पण : या दिवशी धर्मराज, पितृपति, समवर्ति, प्रेतराज, कृतान्त, यमुनाभ्राता, शमन, काल, दण्डधर, श्राद्धदेव, वैवस्वत, अन्तक, यमधर्म आणि औदुंबर या १४ नावांचे (टीप १) उच्चारण करून यमतर्पण केल्यामुळे यमाच्या आधीन असणाऱ्या अतृप्त पितरांना आणि मृतात्म्यांना गती मिळते. यमतर्पण करणाऱ्या जिवाला यमाची कृपा लाभल्यामुळे त्याला भूत, प्रेत आणि पिशाच यांची बाधा होत नाही.

◆ यमदीपदान : यमाला दीपरूपी अग्नीचा अंश अर्पण केल्याने त्याच्यातील तेजतत्त्व आणि सूर्याचा अंश जागृत होतात. त्यामुळे यमाची उग्रता उणावून सौम्यता, म्हणजेच सात्त्विकता होतो. वाढू • लागते. त्यामुळे त्याची उपासना करणाऱ्या जिवावर तो लवकर कृपावंत होतो.

◆ यमाला प्रार्थना : धर्माचरणी आणि साधनारत असणाऱ्या जिवांनी यमाला केलेल्या प्रार्थनेने तो प्रसन्न होतो आणि जिवाला यमपाश अन् यमदंड यांपासून अभय प्राप्त होते. यमधर्माच्या कृपाशीर्वादामुळे यमतर्पण, यमदीपदान आणि यमाला प्रार्थना केल्यामुळे उपासकाला आयुष्य, आरोग्य अन् धर्मज्ञान यांची प्राप्ती होते.

७) बहिणीने भावाला ओवाळणे :

या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे अन् तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे. 

आध्यात्मिक महत्त्व :

या दिवशी धर्मशास्त्राने भावा-बहिणीचे नाते जोपासण्यावर विशेष भर दिलेला आहे. पुरुषाच्या मनात स्त्रीप्रती शुद्धभाव निर्माण होऊन चित्तावरील कामवासनेचा विकार न्यून व्हावा, हाच या मागील उद्देश आहे. ज्याप्रमाणे आईचे मुलावर असणारे प्रेम निर्मळ असते, तसेच बहिणीचेही भावावरील प्रेम पवित्र असते. या प्रेमाची देवाण - घेवाण होऊन एकमेकांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण भाऊबीज साजरी करतात.

८) भाऊबीजेला भगिनींना स्वसंरक्षणार्थ समर्थ करूया :

कित्येक भगिनींवर आज बलात्कार होतो, कित्येकींचे संसार उद्ध्वस्त होतात. एकतर्फी प्रेमातून कित्येकींची उघड उघड हत्याही होते. समाजाच्या प्रेतवत्, म्हणजे क्षात्रधर्महीन मानसिकतेचे हे प्रतीक आहे. स्वतः मध्ये क्षात्रतेज जागवून शारीरिक अन् मानसिक दृष्ट्या सबळ होऊन आपण आपल्या भगिनींचे रक्षण केले पाहिजे. याचबरोबर भगिनींनाही स्वसंरक्षणार्थ सिद्ध होण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. हीच त्यांच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट ठरेल. दीपावलीच्या निमित्ताने समाज, राष्ट्र अन् धर्म यासाठी काहीतरी करण्यासाठी यथाशक्ती पाऊल उचलले, तरच हा सण खऱ्या अर्थाने साजरा होईल. '

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Previous Post Next Post