कवयित्री बहिणाबाई नथुजी चौधरी परिचय | बहिणाबाई चौधरी मराठी माहिती | Kavayitri Bahinabai Chaudhari

खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,

आधी हाताले चटके तवा मियते भाकर.

बहिणाबाई चौधरी यांच्या या ओळी महाराष्ट्रातील रसिकांपैकी कुणी ऐकल्या, वाचल्या नसतील असं होणार नाही. तसं कुणी असेलही तरी या दोन ओळींमध्ये संसाराचा नेमका अर्थ जो किती सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितला आहे, तो मात्र संसारात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लागू होतांना आपल्याला दिसतो.

बहिणाबाई नथुजी चौधरी मराठी कवयित्री होत्या. बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी ११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा.

वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.  नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.

बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे “लेवा गणबोली” तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा (ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्‌माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर संग्रहालयात झालेल आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, “अहो हे तर बावनकशी सोनं आहे.

हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे”,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.

बहिणाबाईंच्या कविता खान्देशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.

लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. खानदेशातील आसोदे हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल' असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

Previous Post Next Post