भाषाशुद्धी आणि कहाणी शब्दांची

बहुविध संस्कृतीला एकत्र जोडणारा एकमेव दुवा म्हणजे भाषण. भाषा संस्कृती जिवंत ठेवते. आदिम काळापासून मानवी संस्कृतीत भर पडत गेली आहे ती ज्ञात म्हणायचे आणि पुढे चालत राहण्याचे प्रमुख कारण भाषा आहे. भाषा ही अनेक शब्दांचे भांडार आहे, आता आपली मराठी भाषाचं पहा मराठी भाषा ही वळवेल तशी वळते हे वेगळे सांगायची गरज नाही. मराठी भाषेवर अनेक संकटे आली आणि त्या संकटांना त्या आक्रमणांना त्या त्या वेळी प्रतिकार केला गेला. थोडे आपण  इतिहासात डोकावले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली त्यातील अधिक काळ जे देशात राहिले त्यात मुसलमान आणि ब्रिटीशांचा यांचा समावेश होतो. त्यांच्या टोळ्या व सैन्य जेव्हा हिंदुस्तानात स्थिर होऊ लागले व राज्य स्थापून लागले. तेव्हा तेथील लोकांची भाषा ही येतं नव्हती. कोणत्याही राष्ट्रांस जीत राष्ट्रात राज्य चालवण्यासाठी आवश्यक असणारे विचारांचे दळणवळण दोन रीतीने करता येते. तर "जीत राष्ट्रावर आपली भाषा लादून किंवा आपण त्यांची भाषा शिकून" मुसलमानांनी अगदी तेच केले हिंदू लोकांची ते भाषा शिकून ते राज्यकर्ते बनले. त्यामुळे आपल्या भाषेत त्यांच्या शब्दांची घुसखोरी झाली अरेबियन आणि पर्शियन भाषेतील शब्दांनी तहिंदी भाषेत जागा करून घेतली आणि तेथे ते रुजले अशी ही भाषा मुसलमानांची झाली. म्हणजे काय तरी हिंदी भाषेच्या बुडाशी हे अरेबियन रेतीचे खत घातले.

मराठीवर जेव्हा या संकटाचे सावट आले तेव्हा श्री शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांनी जे हिंदू जनतेत नवजीवनाची लाट उत्पन्न झाली आणि मराठीवरची मराठी वरचे पहिले संकट टळले. महाराजांनी रघुनाथराव पंडितकरावी राज्यव्यवहार कोश  तयार करून घेतला. मराठी भाषेवर मुसलमानी हल्ल्यानंतर परकीय भाषांचा हल्ला म्हणजेच इंग्रजी भाषेचा हल्ला झाला. पहिला हल्ला परतावून याचे श्रेय जसे शिवाजी महाराज व त्यांचे उत्तराधिकारी यांनी संपादन केले. तसेच मराठी भाषेवरील हा हल्ला परतवण्याचे श्रेय निबंध माला करांनी घेतले परंतु परके शब्दांची स्वकीय भाषेवर होत असलेली कुरघोड्या चालूच होत्या आणि आहेतच. मराठी भाषेच्या शुद्धीची चिकटपट्टी कशासाठी? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी या पुस्तकांत सांगताना मराठी भाषेचे शुद्धीकरण हे विशेषतः या मुसलमानी शब्दांपासून करायचे होय.  हे मुसलमानी शब्द आपल्या घरात दारात चोरासारखे शिरून धन्यासारखे शिरजोर होऊन बसले आहेत. परंतु काळानुरूप भाषेची मूलतत्वे सांगताना' ते म्हणतात जगातील कोणाच्या ही परकीय भाषेत जर एखादी शैली व प्रयोग वा मोड ही  चटकदार वाटली तर तीही आत्मसात करण्यास आडकाठी नसावी. भाषाशुद्धी - शब्दकोष परकीय शब्दांना वीर वि.दा. सावरकरांनी स्वतः नवीन पाडलेले आणि जुनेच; पण नव्याने प्रचारात आणलेले काही स्वकीय प्रतिशब्द.

१. शिक्षणविषयक :

स्कूल - शाळा

हायस्कूल - प्रशाळा

कॉलेज - महाशाला, महाविद्यालय

अकॅडेमी - प्रबोधिका

हेडमास्टर - मुख्याध्यापक

सुप्रीटेन्न्डेट - आचार्य

प्रिन्सिपॉल - प्राचार्य

प्रोफेसर - प्राध्यापक

लेक्चरर - प्रवाचक

रीडर - प्रपाठक

२. धंदेविषयक :

वॉचमेकर - घड्याळजी

वॉशिंग कंपनी ( लॉनड्री ) - धुलाई केंद्र, धवल केंद्र, निर्मल केंद्र, परीटगृह

हेअरकटिंग सलून - केशकर्तनालय

डीस्पेन्सरी, दवाखाना - औषधालय

कन्सल्टिंग रूम - चिकित्सालय

वकील - विधीज्ञ

वकिली - विधीज्ञकी

स्टेशनरी स्टोअर्स -  लेखन साहित्य भांडार

टेलरिंग शॉप - शिवणकला गृह, शिवण गृह

लॉजिंग बोर्डिंग - भोजन निवास गृह

३. युद्धविषयक :

वॉर - युद्ध

आर्मीस्टी - शस्त्रसंधी

टूस - उपसंधी

पीस : तह - संधी

बफर स्टेट - कीलकराष्ट्र

मोहीम - अभियान

कॅम्पेन - उपयुद्ध

फौज, लष्कर - सेना, सैन्य

पलटन - पुथना

स्करमिश - चकमक

कॅम्प - शिबीर, छावणी

वॉरशिप - रणतरी, युद्धनौका

सबमरीन - पाणबुडी

हवाई दल, एअर फोर्स - वायूदल, आकाशदल, नभोदल

नेव्ही, आरमार - नौदल, सिंधुदल, जलसेना

४. मुद्रणविषयक :

टाईप फौंड्री - टंक शाळा

पंच - नर

मेट्रेस - मातृका

लेड - शिसपट्टी

कंपोझीटर - जुळारी

प्रुफ - उपमुद्रित

प्रुफ करेक्टर - मुद्रित निरीक्षक

स्टोपप्रेस - छापता छापता, छापबंद

बाईंडिंग - बांधणी

मोनो टाईप - एक टंकक

लीनो टाईप - पंक्ती टंकक

टाईप रायटर - टंकलेखक, टंकयंत्र

डिग्री - पूरण, अंश

५. टपालविषयक :

पोस्ट - टपाल

बुकपोस्ट - ग्रंथटपाल

मनीऑर्डर - धनटपाल

पार्सल पोस्ट - वस्तूटपाल, गठ्ठाटपाल

रजिस्टर - पटांकण

रजिस्टर्ड  - पटांकित

फोन - ध्वनी

ट्रंक टेलिफोन ( ट्रंक कॉल ) - परस्थ ध्वनी

टेलिप्रिंटर - दूरमुद्रक

६. सभाविषयक :

जाहीर - प्रकट

सर्क्युलर - परिपत्रक

वॉलपोस्टर - भिंतीपत्रक

लाउड स्पीकर - ध्वनी निर्देशक

मेगाफोन - ध्वनीवर्धक

शेम - धिक्कार

रिपोर्ट - अहवाल, प्रतिवृत्त, इतिवृत्त

रिपोर्टर - प्रतिवेदक

मुर्दाबाद - नष्ट होवो, नाश हो

झिंदाबाद - की जय, जय हो, अमर हो

७. निर्बंधविषयक :

लॉ - निर्बंध, विधी, दंडक

लेजीस्लेटर - विधिमंडळ

उमेदवार - इच्छुक, स्पर्धक

बजेट ( अंदाजपत्रक ) - अर्थसंकल्प

खाते - विभाग

रेव्हिन्यू महसूल - राजस्व

रेव्हेन्यू मिनिस्टर - राजस्व मंत्री

लॉ मिनिस्टर - निर्बंधमंत्री, विधीमंत्री

लेजिस्लेटीव्ह डिपार्टमेंट - विधीविभाग, निर्बंधविभाग

एक्सिकयुटीव्ह डिपार्टमेंट - निर्वाह विभाग, कार्यवाहन विभाग

ज्युडीशियल - न्यायविभाग

अंमलबजावणी - वर्ताव, कार्यवाही

८. भौगोलिकविषयक :

अहमदाबाद - कर्णावती

अरबी समुद्र - पश्चिमसमुद्र, सिंधुसागर

हैद्राबाद ( द. ) - भाग्यनगर

हैद्राबाद ( सिंध ) - नगरकोट

अलाहाबाद - प्रयाग

९. चित्रपटविषयक :

सिनेमाहाउस - पटगृह, चित्रगृह, चित्रपटगृह

फिल्म - पट्टी, चित्रावली, चित्रपट्टिका

मुव्ही - मूकपट

टॉकीज - बोलपट

इंटरव्हल - मध्यंतर

स्टुडियो - कलामंदिर, कलागृह

आउट डोर शूटिंग - बाह्यचित्रण

थ्री डायमेनशन - त्रिमितीपट

कॅमेरा - छात्रिक

सिनेरिओ - पटकथा, चित्रकथा

ग्रामोफोन रेकोर्ड - नादांकन

ट्रेलर - परिचयपट

एडिटर - संकलक

मराठी भाषेची सद्यस्थिती पाहता भाषाशुद्धीसाठी प्रयत्न करणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके ही लोक नाहीत. परंतु आपले पारंपारिक शब्द भाषेतून लुप्त होत चालले आहेत हे मात्र खरे.

मराठी भाषेच्या जडणघडणीमध्ये इतर भाषांचा वाटा आहे फारशी भाषा जरा जास्तच आपल्या पूर्वजांना भावली असावी फारसी शब्दांना मराठीचे वळण देऊन आजही आपण वापरतो अगदी मराठी समजून. आपल्याला कुठला शब्द संस्कृत, प्राकृत फारसी आणि कुठला अरेबियन हेही समजत नाही. मग हे शब्द मराठी भाषेत कसे रुळले ते आपल्याकडे कसे आले आपण त्यांचा कधीच शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. चला तर लेखाच्या निमित्ताने "कहाणी शब्दांची"…

 अबीर…

अबीर वारकऱ्यांचा अत्यंत आवडता शब्द म्हणजे अबीर गुलाल यातला गुलाल तर सर्वांच्या परिचयाचा असा आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी तो वाडी-वस्ती पर्यंत पोहचवला आहे.परंतु अबीर एक सुगंधी मिश्रणाचे नाव आहे हा मूळचा अरबी भाषेतील शब्द असून सर्व मानव जात एकच अशी शिकवण देणार्‍या वारकऱ्यांनी तो जसाच्या तसा स्वीकारला आहे चंदन, केशर, कापूर आणि कस्तुरी यांच्या मिश्रणातून तयार झालेली भुकटी म्हणजेचं अबीर यालाच अबीर गुलालाचा टिळा लावून वारकरी आनंदाने गात असतात.

आदरांजली... श्रद्धांजली 

अंजली म्हणजे ओंजळ. ओंजळीत फुले घेऊन वाहिली हीच होते पुष्पांजली पण आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोन शब्द वापरताना जरा काळजी घ्यायलाच हवी. हे शब्द वापरताना अनेकांची गल्लत होते श्रद्धेने अर्पण करतात ती असते श्रद्धांजली तर आदरपूर्वक अर्पण करतात ती असते आदरांजली श्रद्धा आणि आदर यात सूक्ष्म फरक आहेच. आदर हा ज्ञात गोष्टींशी संबंधित असतो तर श्रद्धा ही अज्ञात गोष्टींशी दोन्ही शब्दातल्या अर्थामध्ये हा फरक ध्यानी घेतला तर शब्दांच्या वापराला चूक होणार नाही. ज्यांच्याबद्दल आदर वाटतो त्यांना द्यायची ती आदरांजली तर दिवंगत व्यक्तींना बाहीची असते ती असते श्रद्धांजली.

आमंत्रण... निमंत्रण

मराठी सतत वापरले जाणारे दोन शब्द म्हणजे आमंत्रण आणि निमंत्रण. आपण ते एकाच अर्थाने अर्थाचे म्हणून वापरतो परंतु त्यांच्या अर्थात मात्र सूक्ष्म फरक आहे म्हणूनच त्यांचा वापर जाणीवपूर्वकच करायला हवा. जाहीर निमंत्रण असते असे आपण वाचतो त्या कार्यक्रमाला यावं असं सूचित केलं असतं पण आग्रह नसतो. आपण गेलो नाही तर फारसे बिघडणार नसतं.आमंत्रण हे मात्र आग्रह पूर्वक दिलं जातं ते घरी येऊन दिलं जातं आणि आपण यावच अशी यजमानांची  मनःपूर्वक इच्छा असते.  निमंत्रण चुकलं जातं परंतु आमंत्रण सहसा चुकलंच जात नाही.

इन मीन तीन 

आम्ही काय इन मीन तीन माणसं किती लागत आम्हाला. बाई बोलत होत्या आमच्या सर्वांच्याच बोलण्यात येणारा हा शब्द पण इन मीन तीन किंवा इन मीन साडे तीन म्हणजे नेमके काय हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. तर यातलं म्हणजे ही बायको म्हणजे आणि आणि मी म्हणजे मी स्वतः म्हणजे आणि साडे म्हणजे अर्धा अर्थातच माझा मुलगा किंवा मुलगी अशीच तीन माणसं हे सांगण्यासाठी हा शब्द आपण वापरतो.

उंबरठा... उंबरा 

उंबरठ्याच्या माप ओलांडून प्रवेश करणारी नववधु आपण नेहमीच पाहतो. पूर्वीच्या काळी लाकडी चौकटीतला खाली पट्टी असायची. ती होती  उंबराच्या लाकडाची पूर्वकाळापासूनच उंबराचे लाकूड पवित्र मानलं गेलेलं हे उंबराचे लाकूड टणक आणि टीकाऊही;  पवित्र आणि अरिष्ट निवारकही  समजले जाते. म्हणून त्याची पट्टी चौकटीच्या तळाला वापरली  जाई.  उंबराच्या लाकडाची पट्टी म्हणून तिला उंबरा.... उंबरठा प्रत्येक घराला अशी चौकट आणि उंबरा असेच म्हणून मग गावाची ओळखही तशाच शब्दांत सांगितली जाऊ लागली.... शंभर  उंबऱ्यांचं गाव.

उर्दू…

संस्कृती ब्राह्मणांची तर उर्दू ही मुसलमानांची भाषा हा आपला एक गोड गैरसमज. खरं तर या दोन्ही भारतीय भाषा. उर्दू या तुर्की शब्दांचा अर्थ… 

तार्तारखानच्या  सैन्याची छावणी. कालांतराने हा अर्थ छावणी पुरताच मर्यादित झाला आणि बरोबर बाबराबरोबर हिंदुस्थानात आला. छावणीत इराणी हिंदी आणि तुर्की सैन्य असे. त्यांच्या आपापसांतील संभाषण एक नवीनच भाषा जन्माला आली. त्या भाषेला सैन्यांची किंवा छावणीची भाषा म्हणून उर्दू भाषा हे नाव मिळाले. खडी बोली म्हणजे सैन्यांची बोली हेच तिचंच दुसरं नाव. उर्दूसारखी मृदू भाषा दुसरी नाही कारण तिच्यात एकही कठोर वर्ण नाही.

चारशेवीस

एखाद्या लुच्च्या, लफंग्या किंवा दुसऱ्याची फसवणूक करणाऱ्या माणसाला आपण म्हणतो 420. हा चारशेवीस शब्द आला तरी कुठून असा प्रश्न पडतो. याचे उत्तर भारतीय दंड संहितेच्या 45 व्या भागात यातल्या 420 क्रमांकाच्या कलमात लांडीलबाडी ,आर्थिक फसवणूक असे गुन्हे करणाऱ्याला या कलमान्वये दंडित केले जाते. सन 1860 मध्ये इंग्रजांनी तयार केलेले हे कलम आजही लागू आहे. या कलमाच्या क्रमांकावरून असे गुन्हे करणाऱ्या माणसाला आपण म्हणू लागलो 420.

झबले

अंगडं, टोपडं आणि झबलं हे खास ग्रामीण भागात वापरले जाणारे शब्द. यातलं झबलं म्हणजे लहान मुलांच्या अंगातलं अंगडेचं. पण आपल्याकडे मात्र हे शब्द खास लहान मुलींच्या कपड्यांसाठी वापरला जातो. हा शब्द मात्र मराठीतला नाही बरं का!तो आलाय चक्क अरबीफारसीमधून. अरबी मधल्या ज्युब्बह आणि फारसीमधला ज्युबा हे त्याचे उगमस्थान. मराठीत येताना या शब्दांवर आपण खास मराठमोळ्या झगा चढवला आणि त्याचं झबलं करून टाकलं!

डँम्बीस

इंग्रजांची चाकरी करण्यात आपली हयात गेली. त्यावेळी गोरा साहेब म्हणजे आपला परमेश्वर. तो आपल्याकडे वाकून बघत म्हणायचा- 'यू डॅम्ड बीस्ट'. आपल्याला यातलं काहीही कळायचं नाही. पण  तरी इंग्रजी बोलण्याची हौस दांडगी.

मग आपण तो शब्द वापरायचा ठरवलं.जणू काही ते कौतुकाचे बोल आहेत  असा आपला समज होता. पण आपल्याला म्हणायला कुठे येते...... मग आपण म्हणू लागलो - 'डॅम्बीस्ट'. पुढे त्याचं झालं डॅम्बीस. पण अर्थ माहित आहे का ? साहेबांच्या त्या 'यू डॅम्ड बीस्ट' चा अर्थ आहे - 'ए क्रूर जनावरा, दुष्ट माणसा'  -  म्हणजे चतुष्पाद प्राणी. आजही केवढया प्रेमाने आपण घातला डांबिस म्हणतो.

पदर

पदर या शब्दाचा मूळ अर्थ आहे पालव हा शब्द तर  ज्ञानदेवांनी वापरलेला. समईच्या वाती शांत करण्यासाठी पदरानं वारा घातला जाई.

हे सांगताना माऊली म्हणतात, 'म्हणोणी दिवा पालवे.....  सवेचि तेल मालवे.... का रावीबिंबासावें प्रकाशु जाय....' हात पुसण्यासाठी ते वारा घालण्यापर्यंत पदराचे अनेक उपयोग. त्याचे अर्थ ही अनेक स्नेहभाव पाखर,ऋणानुबंध, असे.

भाकरी...दामटा...चपाती...पोळी

ज्वारीचे पीठ मळून,थापून आणि भाजून केली गेलेली गोलाकृती ही भास्करासारखी पांढरीशुभ्र दिसायची म्हणून लोकांनी तिला नाव दिलं भास्करी. तिचीच झाली भाकरी तर त्या मानाने आकाराने लहान भाकरी पाहिली की चंद्राची आठवण यायची म्हणून ती झाली चांदकी. ग्रामीण बोलीत तिलाच म्हणतात दामटा.तर संस्कृतातल्या चर्पट शब्दाचं मराठी रूप म्हणजे आपली चपाती. कणकेचा गोळा असाच लाटून लाटला असंच चापटून लाटला की त्याची होते चपाती.पोळी मात्र आली ती द्रविड कुळातून तमिळ भाषेमध्ये असलेल्या पुरणपोळीगे  शब्दांन मराठीत रूप घेतलं पुरणपोळी.पण काही ठिकाणी चपातीला पोळी म्हटलं जातं.तर रोडगा म्हणजे जोगवा मागून आणलेली सर्व धान्यांची भाकरी.

रदियम, यडतांग, राजीनामा रिकामटेकडा अजून कितीतरी शब्द आहेत की त्यांची कहाणी. एकाच लेखात पूर्ण होऊ शकत नाही. तरी ही काही शब्दांची कहाणी सांगण्याचा मी तुम्हांला इथे नक्कीच प्रयत्न केला आहे.

सूक्ष्म बदल असणारे बोलताना एकसारखे वाटणारे मराठी भाषेत अनेक शब्द आहेत, परंतु या दोन शब्दांचे अर्थ मात्र परस्पर भिन्न असतात.अंतरिक्षम्हणजे आकाश, तरआंतरिक्ष म्हणजे आकाशासबंधी.

अमदानी म्हणजे राजवटकिंवा कारकीर्द, तर आमदानी म्हणजे प्राप्ती किंवा मिळकत.

भरित म्हणजे पुष्ट किंवा भरलेला, तर भरीत म्हणजे खाण्याचा पदार्थ.

शिला म्हणजे दगड, तर शीला म्हणजे सच्चरित्र.

            मराठी भाषेचे रुपडं किती सुंदर आहे. प्रत्येक शब्दाची कहाणी निराळी आहे. त्यात एक वेगळ्या प्रकारची गोडी आहे. मराठी भाषा मधाळ आहे. 'भाऊ गर्दी आणि सतराशेसाठ' ही पानिपतची देणगी; तर 'इश्श' आणि 'आय्या' ही तामिळची देणगी. 'दिलखुला फारसीमधली तर 'इसान' चक्क संस्कृतमधलली.  मराठीचा शब्दांचा प्रवास सांगणारी ही शब्दांची कहाणी इतकी सुंदर आहे, ते आपणाला इतर अनेक शब्दांचे अर्थ किंवा कहाणी शोधण्यास असपणांस नक्कीच प्रवृत्त करेल. मराठीच्या 50 वर बोलीभाषा आणि त्यांतील गमतीदार म्हणी, वाक्यप्रचार यांचबरोबर त्या बोलीभाषा बोलणाऱ्या आदिवासींच्या चालीरीती आणि शब्दांचा योग्य वापर न केल्याने आपण घालत असलेले गोंधळ अशी ही 'कहाणी शब्दांची'.

शब्दसंपत्ती भरपूर असलेल्या आपल्या मातृभाषेत आज अनेक परकीय शब्द शिरले आहेत. यू नो, यू सी, सॉरी, प्लीज यासारखे असंख्य इंग्रजी शब्द मराठी बोलताना सर्रास वापरले जातात. इंग्रजी माध्यमाचा शाळेत घातलेला आपला पाल्य, घरात मराठी बोलत नाही, असे कौतुकाने सांगताना माता-पित्याचा कंठ दाटून येतो. त्यावेळी दहावीच्या गुणवत्ता यादीत पहिली येणारी मुले नेहमी मातृभाषा माध्यमातलीच का असतात, याचा विचार सुद्धा केला जात नाही.

आपली मराठी भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी, फारसी इत्यादी परकीय भाषांमधून शब्द घेणे, म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून चिनी मातीचे कप हाती घेणे नव्हे का? हे सावरकरांचे अचूक विश्लेषण आहे. एका सर्वेक्षणानुसार जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा चिनी ( मांडारीन ) आहे. दुसऱ्या क्रमांकावर हिंदी आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्रजी आहे. कारण भारताची संपूर्ण लोकसंख्या त्यात धरली आहे. ती वजा केली तर इंग्रजीचा क्रमांक कुठल्या कुठे फेकला जाईल! मराठी बोलणारे पंधराव्या क्रमांकावर तर बंगाली बोलणारे तेराव्या क्रमांकावर आहेत. इंग्रजी ही विश्वभाषा आहे हा गैरसमज आहे.आज सर्वच भारतीय भाषांची दयनीय परिस्थिती आहे. अशावेळी सावरकरांनी भाषाशुद्धीचे महत्व अधोरेखित होते.

भाषा ही संस्कृतीची वाहक असते. संस्कारातूनच संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होतात. कॉनव्हेंट आणि इंग्रजी माध्यमांचा शाळांतून शिकणाऱ्या किती मुलांवर आपल्या देव-देश व धर्माचे संस्कार होतात, याचा विचार करायला हवा. रामायण, महाभारत, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंह, श्री शिवराय, शंभूराजे आणि देशकार्यार्थ झुंजलेले क्रांतिवीर यापैकी काहीही माहित नसणे यालाच आधुनिक संस्कार म्हणतात काय? जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर घ्यायचे असते.

बोलीभाषेचं अस्तित्व त्या प्रवाहातील मुख्य भाषा जीवित असल्याचं प्रमाण मानलं जातं. त्यामुळे न्यूनगंड न बाळगता आपली भाषा जास्तीत जास्त बोलणे आवश्यक आहे.  शाळा, महाविद्यालये व घरात मुलांना दर्जेदार मराठी शिकवण्याकडे कटाक्षानं लक्ष देणंही तितकेच महत्त्वाचे आहे. संगणकापासून स्मार्टफोनपर्यंत विविध तांत्रिक बाबींमध्ये मराठीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होणे आवश्यक आहे. मराठीत जितके दर्जेदार साहित्य निर्माण होईल तितकी ती समृद्ध होत जाईल. त्यासाठी वाचन चळवळ आणि साजेसे असे वाङ्मयीन वातावरण निर्माण करणे ही जबाबदारी आपणासर्वांची आहे. मराठी साहित्यातील साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे. ते आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवे. आपल्या महाराष्ट्राला बऱ्याच थोर संतांचा ठेवा लाभला आहे. संत ज्ञ्यानेश्वर ह्यांनी “ज्ञानेश्वरी” सारखा ग्रंथ लिहिला आहे. “पसायदान”  , संत रामदासस्वामी ह्यांनी “मनाचे श्लोक” लिहिले आहे. ह्या दर्जेदार लिखाणाला न विसरता ह्याचे अध्ययन, पठन, चिंतन करायला हवे.

मराठी हि एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे.

बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,

मराठीच्या उद्धारासाठी, कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.

 आस...

Previous Post Next Post