भारतीय संविधान दिन मराठी माहिती | संविधान दिन माहिती | Sanvidhan Din Information | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad


संविधान मूलभूत कर्तव्ये
हक्क व प्रतिष्ठेसाठी आग्रह करताना आपल्या कर्तव्यांचाही आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे. जे संविधानात नाही, त्या गोष्टीपासून स्वतःच परावृत्त केले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्य हे व्यक्तिस्वार्थात परावर्तित करणे धोकादायक आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गुणधर्म आहे. नागरिकांनी या तत्त्वाचा सन्मान करून आचरण केले तर धर्मांधतेची वर्तणूक होणार नाही.
संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. आचरण म्हणजे निस्वार्थीपणे कर्तव्ये व जबाबदारी पार पाडावी लागणार. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशाच्या नागरिकांनी हक्क व अधिकाराबाबत जागरूक व आग्रह असताना कर्तव्यपालनाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
लोकशाही व्यवस्थेत, प्रत्येक नागरिकांचे कर्तव्यपरायण आणि जबाबदारी यावर लोकशाहीचे यश अवलंबून असते तेव्हा नागरिकांना हक्काबरोबर कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी मूलभूत कर्तव्याचा समावेश १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला. संविधान निर्मात्यांनी संविधानात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या समावेश केलेला नव्हता. तो नंतर करण्यात आला, परंतु आजही ही कर्तव्ये दुर्लक्षित आहेत. बहुसंख्य लोकांना संविधानच म नसल्यामुळे हक्क व कर्तव्ये याबाबत ते अनभिज्ञ व उदासीन आहेत. संविधानाच्या जागृती अभियानामुळे हळूहळू जाणीव होऊ लागेल. संविधान दिनी, व्यक्तीच्या हक्कांसोबतच कर्तव्याची चर्चा होणे फार महत्त्वाचे व आवश्यक आहे. भारतीय संविधानाच्या भाग-३ मध्ये मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. भाग-४ मध्ये राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे नीतीनिर्देश हे आपल्या संविधानाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य संपूर्णतः भारतीय असून या देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे हे संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायाची हमी दिली आहे. मूलभूत हक्क म्हणून सहा प्रकारचे हक्क संविधानाच्या अनुच्छेद १२ ते ३५ मध्ये आहेत. १. समतेचा हक्क २. स्वातंत्र्याचा हक्क ३. पिळवणुकीविरुद्धचा हक्क ४. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क ५. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि ६. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. अर्थातच या हक्क-अधिकारांवर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतीमत्ता व आरोग्य यासाठी काही निर्बंध व मर्यादा घातल्या आहेत.
मूलभूत हक्कासोबतच कर्तव्ये आहेत आणि असायलाच पाहिजे. ही नागरिकांची कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाल्यास त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. भारताची सार्वभौमकता, एकता व एकात्मता उन्नत राखणे, त्यांचे संरक्षण करणे. आवाहन केले जाईल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व भातृभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशांचे मोल जाणून तो जतन करणे. अरण्ये, सरोवर, नद्या व वन्यजीवसृष्टी यासुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल, अशाप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करणेसाठी झटणे. यासोबतच सहा ते चौदा वर्षेपर्यंतच्या बालकांचे आई-वडील किंवा पालक त्यांच्या बालकांना किंवा पाल्यांना जे लागू असेल त्याप्रमाणे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतील. अशी ही ११ मूलभूत कर्तव्ये बहुसंख्य नागरिकांना माहितच नाहीत.
मूळ संविधानात मूलभूत कर्तव्ये नसताना यांचा अंतर्भाव करण्याची काय गरज होती, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नागरिकांना कर्तव्यपालनाची जाणीव करून देऊन राष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा यामागील उद्देश आहे व तो योग्यच आहे. लोकांनी, लोकांचे व लोकांसाठी चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही म्हटले जाते. लोकांची कर्तव्ये निर्धारित करणे व कर्तव्याचे पालन करण्याचा आग्रह करणे हे देशहितासाठी व देश घडविण्यासाठीच आहे. नागरिकांनी देशाच्या कारभारात लक्ष द्यावे, सहभाग नोंदवावा हे अपेक्षित आहे. म्हणूनच ७३ व ७४ च्या घटनादुरुस्तीमुळे लोकांचा सहभाग गावपातळीपर्यंत वाढतो आहे. तरीही मूलभूत कर्तव्यांची जाणीव नागरिकांना करून देण्याचे अभियान राबविण्यात गरज आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे की, मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात झाला, परंतु या कर्तव्यपालनासाठी कोणतेही कायदेशीर पाठबळ दिले गेले नाही. मूलभूत कर्तव्यांचे स्वरूप राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जशी आहेत त्याप्रमाणेच आहे.
मार्गदर्शक तत्त्वाच्या परिपूर्तीसाठी न्यायालयात दाद मागण्याची तरतूद संविधानात नसली तरी उच्च व सर्वोच्च न्यायालये प्रसंगी सक्रिय होऊन जनहितासाठी व कल्याणकारी निर्देश सरकारला देत असतातच. मूलभूत कर्तव्ये ही नागरिकांसाठी असली तरी राज्य या कर्तव्यपूर्तीतून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. संविधानाच्या प्रास्ताविकेतील ध्येय व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सरकारला सगळ्याच आवश्यक उपाययोजना कराव्या लागतात. तरीपण नागरिकांनी आपली जबाबदारी राष्ट्रनिर्मितीसाठी निरपेक्षपणे पार पाडलीच पाहिजे.
संविधान सभेत समारोपाचे भाषण करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब म्हणाले होते की, " घटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या घटनेचे मातेरे होते. मात्र घटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती घटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले होते की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा- प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील." हे म्हणणे आजही प्रासंगिक आहे. यावर चिंतन होण्याची गरज आहे. 'लोक' या शब्दात नागरिक, सनदी अधिकारी, लोकप्रतिनिधी इत्यादी सर्वांचाच समावेश आहे. कर्तव्य व जबाबदारीची सतत प्रेरणादायी आठवण व्हावी म्हणून संविधानावर श्रद्धा व निष्ठा बाळगण्याची व संविधानानुसार कर्तव्ये पार पाडण्याची शपथ संविधानाच्या तरतुदीनुसार घेतली जाते. कर्मचारी- अधिकारीसुद्धा शासकीय सेवेत प्रवेश करताना संविधानाची शपथ घेतात. मात्र हे बहुसंख्य आपण घेतलेल्या शपथेशी इमान ठेवतात असे नाही. देशात म्हणून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 'नीतीमत्ता' हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आणि ही व्यवस्था यशस्वी होण्याची पायाभूत शर्त आहे. संविधान दिन साजरा करताना 'नीतीमत्ता' वृद्धिंगत होईल, असे कार्यक्रम राबविले पाहिजे.
हक्क व प्रतिष्ठेसाठी आग्रह करताना आपल्या कर्तव्यांचाही आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे. जे संविधानात नाही, त्या गोष्टीपासून स्वतःच परावृत्त केले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्य हे व्यक्तिस्वार्थात परावर्तित करणे धोकादायक आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गुणधर्म आहे. नागरिकांनी या तत्त्वाचा सन्मान करून आचरण केले तर धर्मांधतेची वर्तणूक होणार नाही. धर्मांधतेकडून दहशतवादाकडे तर आपली वाटचाल होत नाही ना याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. असहिष्णुतेमुळे व अतिरेकी स्वरूपाच्या अप्रिय वर्तनामुळे देशात अराजकता निर्माण झाली तर त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. स्वार्थ व वर्चस्वासाठी, सत्ता व संपत्तीसाठी संविधान विपरीत वर्तणूक निश्चितच धोकादायक आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ ला केलेल्या भाषणाचे पुन्हा स्मरण होणे गरजेचे आहे. बाबासाहेब म्हणतात, " भारत आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवील की पुन्हा गमावेल, हा विचार मला अस्वस्थ करतो. असे नाही की भारत हा यापूर्वी कधीही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की, त्याने आपले स्वातंत्र्य स्वकियांच्या फितुरीमुळेच गमावले आहे. देशफितुरीचा इतिहास मला सर्वाधिक बेचैन करतो. इतिहासाची पुनरावृत्ती होईल का ? या विचाराने मी चिंताग्रस्त आहे. जातींच्या व संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबतच, भिन्न व परस्परांची विचारप्रणाली असणाऱ्याच बऱ्याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देश मोठा मानतील ? मला माहीत नाही, परंतु एवढे मात्र निश्चित की, जर राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशाने मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धाराने लढलेच पाहिजे.” देश सर्वत्र व देशहितच सर्वोच्च मानून जबाबदारी पार पाडणे हीच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची नैतिकता आहे. संविधान दिनापासून पुन्हा दुसऱ्या वर्षी येणाऱ्या संविधान दिनापर्यंत दरवर्षी दररोज संविधानिक मूल्यानुसार आचरण करणे हा नागरिकांचा निर्धार म्हणजे संविधान दिवस होय. संविधान दिनाच्या सदिच्छा !!
लेखन : इ. झेड. खोब्रागडे
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

Previous Post Next Post