एकदा रमाई वंचित मुलांच्या वसतिगृहात गेल्या असता तिला समजले वसतिगृहात मुलांना अन्नच नाही, तेंव्हा तिने स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या व तिथल्या शिक्षकांना मुलांसाठी अन्न आणण्यास सांगितले.
रमाई तिचे नावं...
अशी माझी रमाई माता
जरी गरिबीचा पाठी घाव
तरी प्रेमळ तिचा स्वभाव
दिन दलितांची आई होती
रमाई तिचे नावं !!
खंबीरपणे उभी होती
बाबासाहेबांच्या पाठी
बाबाच्या शिक्षणासाठी
राहिली उपाशीपोटी !
ती नसती तर नसते दिसले
आम्हां भीमरावं
दीन दलितांची आई अशी
रमाई तिचे नावं !!
सोसल्या कित्येक कळा
लागल्या गरीबीच्या झळा
लावीला दीन दुबळ्यांना लळा
फुलला नव कोटीचा मळा !
बाबाही धन्य झाले
बघून तिचा स्वभावं
दिन दलितांची आई होती
रमाई तिचे नावं !!
भिकु धुत्रेची लेक
होती दिसाया सुरेख
रामजीची सुन नेक
होती रमाई लाखात एक !
तिच्याच आशीर्वादाने मिळाला
जगी आम्हां वावं
दिन दलितांची आई होती
रमाई तिचे नावं !!
कवी - संजय बनसोडे
माता रमाई...
माझ्या भिमाची सावली
दिन दलितांची आई
अशी भाग्यशाली त्यागमुर्ती
माझी आई माता रमाई...
कष्ट सोशिले अपार
भिमाची बनून सावली
सदा हसत मुखाने राहली
माझी माता रमाई माऊली
कवी - अविनाश पवार
दीक्षाभूमी...
पत्नी रामूची, इच्छा मनात
घेण्या विठोबाचे, दर्शन पंढरपुरात
दूर करण्या देवधर्म, हिंदू अंधश्रद्धा खुळचट
बाबांनी जाऊन, सरणं तथागतास
दुसरी पंढरी, वसविली नागपुरात
पाहून लाखो लोक या दीक्षा भूमीत
मान झुकवी, ताजमहाल ही आग्र्यात
लेकरू अरविंद, खंत सांगतो जनास
पाहण्या हा सोहळा,माझी माता रमाई
ना राहिली जगात...
कवी - अरविंद बनसोडे, पुणे
त्यागमुर्ति माता रमाई...
सावली माता रमाईची, रामजीची होती सून
किती गाऊ तिचे गुण, पती सेवेसाठी बघा
राबली ती कसून, घर खर्च केला होता तिने गोवऱ्या थापून,
मात्र चूल पेटविली लाकूडफाटा आणून,
कधी दिवस काढीले तिने उपाशीच राहून,
दुखःश्रुंचे घोट गिळले तिने सदा रडून रडून,
ना तक्रार केली कधी नाही बसली ती रुसून,
संसार सुखासाठी सुद्धा मागणी पतीला हटून,
नव्हती तिची मागणी ठेवा दागिन्यांनी मढवून,
सौभाग्याचे कुंकू रहावे तेवढा दागिना टिकून,
त्याच पती साठी जगली माता रमाई सावली बनून,
ज्या महाज्ञानी पतीने टाकले साऱ्या जगाला दिपवून,
बहुजनांची आई ठरली आहे त्यागमुर्ति माता रमाई...
अरविंद सांगतो जगाला ठासून -
कवी - अरविंद बनसोडे, पुणे
निळ्या पाखरांची माय...
तळमळते आज रडते,
निळ्या पाखरांची माय...
दिनरात जागुनिया,
विसरे तहान भूख
जुलमी युगास जाळून,
मिळवून दिल सुख...
अशी लाखामधी एक,
आली उजळुनी सकाय
पाखरांची ही माय...
निळ्या पाखरांची माय.
माय तुला विनम्र अभिवादन...
कवी - डॉ. मिलिन्द जीवने
रमाईची आठवण झाली...
आसवांच्या पुष्पांना माझ्या रमाईची आठवण झाली
आम्हा बाबांचा आसरा बनून देशा तु सहारा झाली
थापुन थापुन गोवरी माते त्याला चेतना गं दिली
तुझयाचं भीमाच्या गं जिवनाची त्याला एक सार केली
जंबुद्विप इतिहासाला तेव्हा कुठे तरी नाद झाली
माते तुझया त्यागाची आता शब्द सुमनाला याद आली
भुलणा-या समाजाला त्याची ना गं कधीचं जाण झाली
महा शब्दांचे मनोरे बांधून आता कुठे कात केली
आम्हा मिळणा-या पुंजीतून कधी ना त्रणफेड केली
माते आम्हा माफ कर अशी आमची बेईमानी झाली
बाबांच्या प्रियरत्नाची जेव्हा शेवटची घटका आली
कफनाला ही पैसा नव्हता अशी तुमची गत झाली
स्वयंचे लुगडे फाडून कफनाची तु पुर्तता केली
तुझया स्मरणातुनच माते आता आमची लाज झाली
माझी माता रमाई...
या देशाची आई, या मातीची कमाई
तुमच्या आमच्या सर्वांची पुण्याई
माझी माता रमाई... माझी माता रमाई
बाबांची सावली माता रमाई
शेणा-मातीच्या कमाईने
बाबासाहेबांची विद्वत्ता पाहिली
दुःख सोसून जगली, कष्ट करूनही कधी ना थकली
अशी माझी माता रमाई... माझी माता रमाई
भुकेल्या पोटी लेकरांची भूक बनली
सुखलेल्या ओठांची तहान बनली
फाटक्या कपड्यात अशी थाटात जगली
झोपलेल्या समाजाला जागविणाऱ्या
बाबासाहेबांची रामू बनली
अशी माझी माता रमाई... माझी माता रमाई
रमाईची ख्याती...
माय रमाई रमाई, काय सांगू तिची ख्याती
भीम बाबाच्या हृदयाची, तिच होती दिप वाती
माय रमाईचा भांग, जणू रस्ता सन्मार्गाचा
वात दावी मला मार्ग, बुद्ध भीमाच्या धम्माचा
माय रमाई चं कुंकू, त्याचा अभिमान मोठा
बुद्ध पौर्णिमेचा चांद, उगवला तिच्या ललाटा
माय रमाई चे डोळे, जणू करुणा कारुण्य नाही
माय जागा मध्ये, तिच्या शिवाय मोठी कोण
माय रमाई चे ओठ, किती दिसती बंद घट्ट
किती सोसलं सोसलं, तरी शब्द नाही फुट
माय रमाई चे कंठी, असे एकच दागिना
म्हणे मौल्यवान कोण? भिमाहून ते दावाना
माय रमाई च्या हातात, बुद्ध भगवानाचे हात
देई आशीर्वाद सारयांना, मोठे व्हारे लेकी पूतं
माय रमाई बसली, भीम बाबांच्या बाजूला
थोडी कलली बाजूला, समाजाचं भान तिला
माय रमाई चे पाय, बघा टेकले धरणीला
म्हणे धरणी धन्य झाले, चुंबे पाय तिचे मला
माय रमाई जणू आहे, संस्कारांची खाण
केला भीमबानां मोठा, उभी पाठीशी राहून
कवी : विलास ग. कापसे
विराट रमा...
नटलीच ना कधी ना केला थाट रमानं
संसार थाटीयला काटोकाट रमानं
लग्नाचा तो नवरा मॅट्रीकला भिवा
कुळवंत नवरी नऊ वर्षाची रमा
जिवनात दिली साथ पाठोपाठ रमानं
पतीचा नगीना काळे मणी गळाभर
कपाळीच कुंकू सदा डोईवर पदर
मिळवीला जगी मान वाटोबाट रमानं
गरीबी ही पाठी सदा हालकीनती
शिळ्या भाकरीची रमा मालकीन ती
करून मन हे धिट अन विराट रमानं
तुझ्या परी आथांग सावली बनून
सूर्याला आव्हान करणारी नव्हती कोणी
पंडिताचा पंडित घडवलास, तू तरी गर्व नव्हता कधी
मुक्त झालो आम्ही, स्वतः उपाशी राहून
गोवऱ्या शेणाच्या थापताना, संसाराची खरी चूल झालीस
तू प्रज्ञासुर्य भिमरायाची, आर्धागिनी ती रमाई
कोटि पिलांना सोन्याचा घास भरवनारी
तूझ्या परी आई नव्हती कोणी
जगात तुझ्या परी सौभाग्यवती नाही कुणी
कवी - योगेश प्रकाश मोहिते
माझी रमाई...
उना तानात तापुन, रे दादा गवरया थापुन
संसार मांडीला रे, माझ्या भिमाला जपुन
अशी होती रमा माऊली, जशी भिमाची सावली
होती गोड मधुर वाणीची, तशी रमा होती बाणीची
मात्र लुगड कधी मिळेना, तरी भिमापुढे तिरसेना
अशी रमाई आहे का सांगा, तुमच्यात बसुन?
होता संसार बाभुळवन, केल रमाने नंदनवन
फिरली भिमासाठी वनवन, लय मोठ रमाच मन
शिळी भाकरी खाऊनी केला संसार हसुन, भिमाला जपुन
त्यागमूर्ती माता रमाई...
त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेबांना म्हणतात...
सोन्याहून आहे सोनं माझ्या कुंकवाचं लेणं
रमा बोले साहेबाला मला नको ते दागिनं ||धृ||
हट्ट दागिन्यासाठी केला होता मी जरी
पुरवुनी तुम्ही तो दिली जाणीव खरी
पती हाच दागिना मी दुजा ना मागिनं ||१||
कुंकवाच्या नात्यानं तुम्ही सांगितलं हे
पती हाच पत्नीचा खरा दागिना आहे
मरपातुर मी तुमच्या या शब्दाला जागीनं || २ ||
काळजीने तुमच्या जीव माझा झुरावा
बाळ राजनंदाच देईल हा पुरावा
यशासाठी तुमच्या मी माझं मीपणं त्यागीनं ||३||
गीतकार - राजानंद