भगतसिंगासारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचे लेनिन आणि रशियन क्रांती यांच्याशी जे वैचारिक-राजकीय नाते जुळले होते, ते आजही तितकेच दमदार आणि ता वाटण्यासारखे आहे. रशियात समाजवादी क्रांती झाली, तेव्हा भगतसिंग दहा वर्षांचा होता. लहानपणापासून काका सरदार अजितसिंह, लाला हरदयाळ आणि गदर चळवळ यांच्यामुळे क्रांतिकारक विचारांशी त्याचा संपर्क येत होता. भगतसिंगाने १७ व्या वर्षी लिहिलेल्या "विश्वप्रेम' या लेखात विश्वबंधुत्वाचा प्रसार करणाऱ्यामध्ये अमेरिकन-फ्रेंच राज्यक्रांती, मॅझिनी-गॅरिबाल्डी, म. गांधी यांच्याबरोबर तो लेनिनचा उल्लेख करतो. "लेनिन होता विश्वबंधुत्वाची बाजू उचलून धरणारा..." असे म्हणत तो स्पष्ट करतो, की "विश्वबंधुता ! याचा अर्थ मी जगामध्ये समानता ( साम्यवाद, World wide Equality in the true sense) याशिवाय दुसरे काही मानत नाही.'
भगतसिंगने स्वतःच म्हटल्याप्रमाणे पुढील काही वर्षे त्याने विविध क्रांती आणि विचारसरणींचा अभ्यास केला. त्यात लेनिनचेही वाचन केले. आधी "गांधीवादी राष्ट्रवादी, मग "स्वप्नाळू क्रांतिकारी', अल्पकाळ "अराज्यवादी साम्यवादी' असलेले आपण शेवटी "मार्क्सवादी शास्त्रीय समाजवादी' झालो असे तो स्पष्ट नमूद करतो. पुढे सामूहिक वैचारिक मंथनातून "हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या नावात १९२८ मध्ये "समाजवादी' हा शब्द घालण्यात आला. पुढे शेवटपर्यंत भगतसिंहाचा आणि संघटनेचा वैचारिक आधार समाजवाद तर राजकीय कार्याचा आदर्श रशियन क्रांती हा राहिला. लाला लाजपतराय यांनी मध्ये क्रांतिकारी तरुणांवर "हे तरुण खूपच धोकादायक आणि क्रांतीचे समर्थक आहेत, त्यांना लेनिनसारखा नेता हवा आहे. पण माझ्यात लेनिन बनण्याची ताकद नाही,' असे म्हणून या तरुणांना "काही परदेशी चिथावणीखोर घटकांनी भडकवले आहे,'
असा आरोप केला. तेव्हा भगतसिंगाने उत्तरादाखल लिहिलेल्या लेखात लालाजींना इटलीच्या मॅझिनीने (स्वातंत्र्यासाठी) रस्ता दाखवलेला चालतो; मग आमच्या देशातील समस्यांवर उत्तरे शोधताना रशियन क्रांती व लेनिनसारख्या विचारवंतांकडून नवे विचार घेण्यात काय चूक आहे ?' अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला होता.
१९३० मध्ये लाहोर कट खटल्यात कैदी असताना भगतसिंह-दत्त यांनी लेनिन दिनानिमित्त (जानेवारी) न्यायाधीशांमार्फत मास्कोला पाठवलेल्या तारेत म्हटले होते : "सोव्हिएत रशियात होत असलेला महान प्रयोग व साथी लेनिन यांचे यश याना पुढे घेऊन जाण्यासाठी मन:पूर्वक सदिच्छा पाठवत आहोत. आम्ही स्वतःला जागतिक क्रांतिकारी आंदोलनाचा भाग म्हणून जोडून घेऊ इच्छितो. "या काळात अगदी न्यायालयासह सर्व माध्यमांतून भगतसिंगांनी देशभर लोकप्रिय केलेल्या तीन घोषणा होत्या : "साम्राज्यवाद मुर्दाबाद', "सर्वहारा झिंदाबाद' आणि "इन्किलाब झिंदाबाद'. या तिन्ही घोषणांमागील प्रेरणा जशी रशियातील कष्टकरी जनतेने केलेली क्रांती होती तशीच लेनिन यांनी आधुनिक साम्राज्यवादाचे आणि क्रांतिकारी व्यूहरचनेचे केलेले मूलगामी विश्लेषण हेदेखील होते. भगतसिंगाच्या तुरुंगातील नोंदवहीत लेनिन यांच्या लिखाणातील याविषयीच्या नोंदी आढळतात. या वैचारिक-राजकीय स्पष्टतेमुळेच हा छोटा क्रांतिकारी गट ब्रिटिश साम्राज्यशाही सत्तेशी अत्यंत प्रखरपणे झुंज देऊन तिला राजकीय-नैतिकदृष्ट्या निष्प्रभ करू शकला.
फाशीच्या दोन दिवस आधी, कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांनी काही हवे का असे विचारले, तेव्हा भगतसिंहाने त्यांना एक पुस्तक आणून देण्याची विनंती केली. तसे त्यांनी ते दिले. फाशीची वेळ झाल्यावर तुरुंग कर्मचारी जेव्हा भगतसिंहाला न्यायला त्याच्या कोठडीजवळ आला तेव्हा भगतसिंह ते पुस्तक वाचत होता. त्याला उठवू लागताच भगतसिंह म्हणाला, "ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतिकारी के साथ मुलाकात हो रही है.' हातातील पान संपवल्यावर तो उठून म्हणाला, "चलो. ते पुस्तक लेनिनचे चरित्र होते.
PDF डाऊनलोड करा.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक
शहीद दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ शहीद-भगतसिंग-इंग्रजी-माहिती
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻