आजकाल पाहुणे घरी येणार म्हटलं की कपाळावर आठ्या पडतात. चौकोनी वा त्रिकोणी कुटुंब, पती-पत्नी कामावर, लहान जागा आणि मुलं टीव्ही, कम्प्युटरच्या जाळ्यात. पण अशा परिस्थितीतही दरवर्षी एक पाहुणा मात्र न चुकता घरी येतो. त्याचं नाव म्हणजे गणपतीबाप्पा. हा पाहुणा कधी अवचित येत नाही. सांगून सवरून येतो. समारंभपूर्वक येतो अन् मखरात जाऊन बसतो. त्याच्या तोलामोलाचा दुसरा पाहुणा नाही. दरवर्षी येऊनही त्याचा कंटाळा येत नाही आणि कपाळावर साधी आठीही पडत नाही.
तो आल्याने घर भरल्यासारखं वाटतं. त्याच्या पाहुणचारासाठी घरातले आबालवृद्ध सज्ज होतात. स्वागत, सजावट, आरास, पूजाअर्चा, आरत्या, मंत्र-पुष्पांजली, गोडधोड, धूप-दीपाचा सुगंध, अगत्य आदी व्यवहारांनी सर्व वातावरण भारल्यागत होतं. गणपतीबाप्पाची षोडशोपचार पूजा करण्याची पद्धत रूढ आहे. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचार पूजा.
नैवेद्य वा प्रसाद हा षोडशोपचार पूजेमधला एक महत्त्वाचा विधी म्हणावा लागेल. सामान्यत: नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करतात. नैवेद्य वा प्रसाद याची व्याख्या करायची झाली तर खाण्यापूर्वी देवाला दाखवण्यात येणारा घन किंवा द्रव पदार्थ अशी करावी लागेल. नैवेद्य दाखवणं म्हणजे तो देवाला अर्पण करणं होय. देव नैवेद्य प्रत्यक्ष कधी सेवन करत नाही. पण त्यातला काही भाग गंध, रस आणि सत्व या रूपाने आस्वाद घेऊन देव तृप्त होतो अशी लोकांची श्रद्धा आहे. नैवेद्यासाठी तयार केलेले पदार्थ षडरसांनी युक्त असावेत असं सांगण्यात येतं. दूध, साखर ते गूळ-खोबऱ्यापासून पेढे, मोदक, फळं, ड्रायफ्रूट आदी आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.
गणपतीला उकडीचे मोदक जास्त प्रिय आहेत. मोद म्हणजे आनंद, मोद देणारा तो मोदक होय. तळलेले मोदक, लाडू यांचाही नैवेद्य दाखवण्यात येतो. खिरापतीचा नैवेद्य पूर्वी सर्रास दाखवला जात असे. आजही दाखवला जातो. ‘खिरापती’मध्ये ‘ख’च्या बाराखडीतले सर्व पदार्थ असतात. खोबरं, खडीसाखर, खसखस, खारीक आणि खिसमिस. त्यामुळेच त्याला खिरापत म्हटलं जात असावं. आजकाल पुरस्कार खिरापतीसारखे देण्यात येतात, या वाक्यात ध्वनीत होणारा ‘खिरापती’चा अर्थ सर्वांना माहीत आहे. पण प्रसाद म्हणून वाटण्यात येणाऱ्या खिरापतीचा खरा अर्थ मुबलक प्रमाणात खाण्याजोगी किंवा वाटण्याजोगी वस्तू असा असावा.
अन्नपदार्थांचा नैवेद्यही बाप्पांना दाखवण्यात येतो. गणेशचतुर्थीच्या दिवशी तर सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य पूजेनंतर दाखवण्याची पूर्वापार पद्धत आहे. एका ताटात किंवा केळीच्या पानात त्या दिवशी केलेले सर्व अन्नपदार्थ वाढून त्यांचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो. सर्वप्रकारच्या अन्नपदार्थांनी युक्त अशा नैवेद्याला ‘महानैवेद्य’ म्हणतात. देवाला दाखवून झाल्यावर जो नैवेद्य खाल्ला जातो त्याला ‘प्रसाद’ अशी संज्ञा आहे. शिवाय देवता, गुरू, संत, ऋषी, महाराज इत्यादींनी संतुष्ट होऊन कोणत्याही व्यक्तीला दिलेला विशिष्ट पदार्थ म्हणजेही प्रसाद होय. प्रसाद सर्व आप्तेष्टांना वाटावा, तो डाव्या हाताने घेऊ नये, अशा समजुती रूढ आहेत.
काही व्रतांमध्ये देवतेला विशेष प्रकारचे नैवेद्य सांगितले आहेत. गणपतीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक माणूस सहसा रिकाम्या हाताने येत नाही. प्रसाद म्हणून बाप्पांसमोर ठेवायला काही ना काही आणतो. मोदक, पेढे, बर्फी, सुकामेवा, सफरचंद, केळी, डाळिंब, मेवा-मिठाई असे आपल्या आवडीचे पदार्थ आणून बाप्पांसमोर ठेवले जातात. आजकाल लोक पर्यावरणाप्रती सजग बनले आहेत. त्यामुळे लवकर खराब न होणारे इको-फ्रेण्डली पदार्थच बाप्पासमोर मोठ्या प्रमाणात ठेवले
बाप्पांच्या पूजेसाठी फुलं, पत्री, दुर्वा, गंध, अक्षता, अगरबत्ती अशा अनेक गोष्टी लागतात. पण त्यामध्ये नैवेद्य हा अगदी हवाच! गोडाप्रमाणेच तिखटमीठाच्या पदार्थांचाही नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मुद्दाम असे पदार्थ बनवले जातात.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/