गुरु दक्षिणा .
फार
पूर्वी ‘भागवनगर’ नावाचे एक छोटे खेडे होते. या खेड्यात एक झोपडीत एक गरीब विधवा
आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर राहात असे. पतीचे छत्र गेल्याने गरीबीत कसा-बसा
संसार रेटत असे. कुणाचे कपडे शिवुन दे. कुणाला घरकामात मदत करे, असे करुन ती
चरितार्थ चालवत असे. तिचा मुलगा ‘कृष्णा’ खूप हुशार आणि चुणचूणीत होता.
त्याला
खूप शिकवावे अशी तिची इच्छा होती; पण त्या काळी गुरुकुल पध्दतीचे शिक्षण होते.
मुलांना गुरुगृही रहावे लागे. छोटा कृष्णा आपल्याला सोडून कसा राहाणार ? म्हणून
तिने पलीकडच्या गावातल्या एका आश्रमात त्याला पाठवायचे ठरवले. कृष्णा लहान, त्याला
जाताना जंगलातून जावे लागे. पहाटे लवकर निघताना अंधार असे आणि परतताना संध्याकाळ
होई.
छोट्या
कृष्णाला खूप भीती वाटे. पण हातातली कामे सोडून रोज पोहोचवायला जाणे आईला शक्य
नव्हते. कधी गोड बोलून कधी रागावून ती त्याला एकट्याला पाठवत असे. नाईलाजाने
‘कृष्णा’ जाई. मात्र ते गुरुजी श्रीमंत मुलांना जवळ बसवत कृष्णाला लांब बसायला
लावत. त्याचे फाटके कपडे पाहून मित्र त्याला चिडवत, याचे त्याला वाईट वाटे.
त्याची
आई त्याला गुरुशिष्यांच्या गोष्टी सांगे. त्या ऐकून आपले गुरु असे भेदभाव का करतात
असा प्रश्न त्याला पडे. एके दिवशी संध्याकाळी परतताना विचारांच्या नादात कृष्णा
वाट चुकला. वाघाची डरकाळी ऐकून भीतीने गाळणच उडाली. इकडे आई काळजीत पडली. दोन-चार
शेजार्यांना मदतीला घेऊन त्याला शोधायला निघाली. वाटेत एका झाडाखाली भीतीने
मुटकुळे करुन बसलेला कृष्णा दिसताच तिला रडू आवरेना. कृष्णाने आईला मिठी मारुन
रडायलाच सुरूवात केली. दोघेही घरी आले. आईचे ह्रदय कळवळले; पण तिला कर्तव्याचीही
जाणीव होती. तिने मन कठोर केले आणि कृष्णाला शाळेत पाठवायला निघाली. कृष्णा एकटा
जाईना. तेव्हा तिने त्याला भगवान कृष्णाचा फोटो दाखवला आणि सांगितले, ‘‘हा बघ
कन्हैया दादा आहे तुझा. तो रोज तुझ्याबराबर येईल हो ! जंगलापाशी गेलास की, त्याला
फक्त हाक मार मनापासून.’’
छोट्या
कृष्णाला खरे वाटले. पाठीवर दप्तर अडकवून मोठमोठ्याने स्तोस्त्र म्हणत जंगलापाशी
आला. त्याने इकडे-तिकडे पाहिले. कोणीच नव्हते. त्याचे डोळे भरुन आले. ह्रदयापाशी
हात नेऊन त्याने आर्त हाक मारली, ‘‘कन्हैयादादाल ये ना रे माझ्यासोबत. मला भीती
वाटते रे !’’
तोच काय
आश्चर्य एक देखणा गुराखी गाई-वासरू घेऊन आला. नि त्याला म्हणाला, ‘‘का रं.. का
रडतूयास… म्या हाय नव्ह ! चल तुला नेऊन सोडतो !’’
त्याने छोट्या कृष्णाला गाईच्या
पाठीवर बसवलं नि आश्रमापर्यंत सोडलं. वाटेत तो पावा वाजवी, कधी सुंदर भजन म्हणे.
कृष्णाला वृक्षवेली, पशुपक्षांची माहिती सांगे. कृष्णा खूश होई. तो पावा वाजवायला
शिकला. पशू पक्ष्यांचा आवाज ओळखायला शिकला. त्याला आश्रमात गुरुपेक्षा कन्हैयाच
अधिक आवडू लागला. त्याला कौतुकाने ‘होय गुरुजी’ असे म्हणू लागला. दोघांची चांगलीच
गट्टी जमली. कृष्णाची तब्येतही सुधारली. आईला याचे रहस्य कळेना. तिने विचारताच
छोट्या कृष्णाने सार्या गंमती-जंमती, नि त्याच्या कन्हैयादादा च्या बद्दल
सांगितले. आईचा विश्वास बसेना. तिने सारे हसण्यावारी नेले. हा हा म्हणता वर्ष
उलटले.
आश्रमातल्या
गुरुजींनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले आणि सांगितले, ‘‘बाळांनो, आज तुमचे शिक्षण
संपले. पुढील शिक्षण सुट्टीनंतर सुरु होईल. तेव्हा आज पर्यंतच्या शिक्षणा बद्दल
आपण आपल्या पालकांना सांगून इच्छेनुसार गुरुदक्षिणा द्यावी.’’ सारी मुले सुट्टी
मिळणार म्हणून खूश झाली. गुरुदक्षिणा काय द्यायची याची चर्चा करु लागली. कृष्णाला
मात्र हे संकट वाटले. तो घरी गेला. त्याचा कोमेजलेला चेहरा पाहून आईने विचारले; पण
तो काहीच बोलेना. आईने जवळ घेताच स्फुंदून रडू लागला. आईला गुरुदक्षिणे बद्दल
सांगितले. ती बिचारी गंभीर झाली. आधीच घरात खायला नाही प्यायला नाही काय द्यावे.
तिने देवघरात असलेली कृष्णाची मुद्रा असलेली घराण्याची मोहोर उचलली आणि देण्यास
सांगितले. पण कृष्णा ती नेईना. तेव्हा रागाने म्हणाली, ‘‘मग जा.. तुझ्या कन्हैया
दादालाच माग जा…!’’
अश्रूभरल्या
डोळ्यांनी कृष्णा निघाला. त्याने कन्हैयाला हाक मारली. कन्हैयाने रडण्याचे कारण
विचारताच त्याने रडतच सारी हकीकत सांगितली. कन्हैया हसला. त्याने एक छोटेसे बोळके
घेतले. त्यात एका गायीचे दूध भरले नि म्हटले, ‘‘ही दे गुरुदक्षिणा.’’ एवढेच बोळके
त्यात एवढेच दूध. गुरुजी काय म्हणतील ? मुलं हसली तर ? कृष्णा विचाराच्या नादात आश्रमात
पोहोचला. तिथे सर्व शिष्य पालकांसह आले होते. एक-एक करत प्रत्येकजण गुरुदक्षिणा
देत होता. कुणी गाय-वासरु, कुणी दुधा-तुपाचे हांडे, कुणी द्रव्य, कुणी सोने-चांदी.
गुरुजी खुश होत होते. शिष्याला तोंडभरुन आशिर्वाद देत होते. इकडे कृष्णा हे सारे
पाहात कोपर्यात उभा होता. हातात बोळके घेऊन अश्रूभरल्या डोळ्यांनी.
गुरुजींचे
लक्ष त्याच्याकडे जाताच त्यांनी त्याला बोलावले, ‘‘अरे कृष्णा, ये ये काय आणलीस
गुरुदक्षिणा ? अरे बापरे, एवढं मोठ्ठ बोळक…नि एवढं दूध पचणार का मला ?’’ हे ऐकून
सारे शिष्य खो खो हसू लागले. कृष्णाला हुंदका आवरेना. आपल्या गरीबीची अशी थट्टा
करावी हे त्याला सहन झाले नाही. त्याने आश्रमाबाहेर उभ्या असलेल्या कन्हैयादादाकडे
पाहिले. त्याने हसतच त्याला पुढे जाण्याची खूण केली. तो भीतभीतच पुढे गेला.
गुरुजींच्या हातात ते बोळके ठेवले. इतर शिष्यांना मजा करावी वाटली. त्यांनी मोठे
पातेले आणून ठेवले, ‘‘गुरुजी ओता यात !’’ म्हणून ते हसू लागले. कृष्णा लाजला.
गुरुजींनी दूध ओतले. पाहतात तो
बोळके पुन्हा भरलेले. दूध संपेनाच. ओतून गुरुजी थकले. एक का दहा पातेली भरली, हंडे
भरले तरी दूध संपेना. सर्व शिष्य थक्क झाले. हा चमत्कार पाहून त्यांना भुताटकी
आठवली. ते घाबरुन गेले. गुरुजींना कृष्णाला हे बोळके कुणी दिले असे विचारले,
कृष्णाने कन्हैयाचे नाव सांगताच, ते त्याला भेटव म्हणाले, भांबावलेल्या कृष्णा
त्याला बोलवायला पळाला, पाहतो तो कन्हैयादादा गायब. त्याने खूप हाका मारल्या; पण
कन्हैया येईना. मित्र त्याला खोटारडा म्हणू लागले. कृष्णा रडू लागला. रडतच दादाला
हाका मारु लागला, ‘‘ए कन्हैयादादा… ये ना रे.. या सर्वांना तुला बघायचंय. तू नाही
आलास, तर मी खोटा ठरेन.’’
तरी
कन्हैया येईना. सारे मित्र त्याला हसत निघून गेले. शेवटी कृष्णा नि गुरुजी राहिले.
गुरुजी अविश्वासाने पाहात उठणार एवढ्यात आकाशात वीज कडाडली. पाऊस पडू लागला नि
आकाशवाणी झाली, ‘‘बेटा कृष्णा.. तू निष्पाप आहेस म्हणून तुला मी दिसतो; पण हे
गुरुजी अजून लोभातच गुंतले आहेत. ते अजून अज्ञानी आहेत. त्यांना कसा मी दिसणार ?’’
हे ऐकताच
गुरुजींचे डोळे खाडकर उघडले. कृष्णासमोर लोटांगण घेत ते साश्रु नयनांनी म्हणाले,
‘‘बाळ मला माफ कर. मी चुकलो. मी करंटा आहे. या नश्वर धनासाठी मी तुझ्या सारख्या
ईश्वराच्या सान्निध्यात राहाणार्या निष्पाप जीवाला दुखावले. मला क्षमा कर.
कृृष्णदर्शन घडव. आयुष्याचं सार्थक कर.’’
कृष्णाने
हसत हसत कन्हैया दादाला पुढे आणले. ‘‘हे बघा गुरुजी, माझा लबाड कन्हैयादादा इथेच
लपला होता. गंमत केली त्याने. होय की नाही रे कन्हैयादादा !’’ म्हणता तो त्याच्या
कडेवरसुध्दा चढून बसला. त्याच्या डोक्यावरचे मोरपीस काढून आपल्या डोक्यात खोचत
त्याने कन्हैयादादाला मिठी मारली. ‘‘पुन्हा असं करायचं नाही हं दादा, नाहीतर आम्ही
तुमच्याकडे पावा शिकायला येणार नाही मुळी. आणि गोड पप्पीची गुरुदक्षिणाही देणार
नाही ?’’
कन्हैयाने
त्याला कवटाळत त्याच्या गालाची पप्पी घेऊन, ‘‘हे बघ मी घेतली सुध्दा
गुरुदक्षिणा’’. असे म्हणत गिरकी घेतली.
गुरुजी मात्र अवाक् होऊन भारावल्या ह्रदयाने हा गुरुशिष्याच्या मिलनाचा सोहळा डोळे भरुन पहात होते. डोळ्यातून अश्रु गाळात पुन: पुन्हा हात जोडत पुटपुटत होते, ‘‘कृष्णा तुच खरी गुरुदक्षिणा दिलीस.’’
गुरुभक्त संदीपक ....
गोदावरी नदीच्या
काठी महात्मा वेदधर्म यांचा आश्रम होता. त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून वेदाध्ययन करण्यासाठी
विद्यार्थी येत. त्यांच्या या शिष्यांमध्ये ‘संदीपक’ हा खूप बुध्दिमान होता. तो गुरुभक्तही
होता. गुरुंची त्याच्यावर असलेली मर्जी बघून इतर शिष्य त्याचा मत्सर करत. ज्ञानार्जनाचे
काम संपत आल्यावर वेदधर्मांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हटले, ‘‘माझ्या प्रिय
शिष्यांनो, तुम्ही सारे गुरुभक्त आहात यात संशय नाही. माझ्याकडून शक्य होते तेवढे ज्ञानदानाचे
काम मी केले आहे, तथापि माझ्या पुर्वजन्मीच्या प्रारब्धामुळे आता मला कोड फुटेल, अंधत्व
येईल, माझ्या शरीराला दुर्गंधी येईल. मी हा आश्रम सोडून निघून जाईन आणि हा व्याधीग्रस्त
काळ काशीला राहून व्यतीत करीन. जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही, तोपर्यंत माझ्या सेवेसाठी
तुमच्यापैकी कोण कोण काशीला यायला तयार आहे.’’
त्यांचे
ते बोलणे ऐकून सर्व शिष्यात शांतता पसरली. एवढ्यात संदीपक म्हणाला, ‘‘आचार्य, मी
प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत राहून आपली सेवा करायला तयार
आहे.’’
गुरुजी
म्हणाले, ‘‘बघ, शरीराला कोड होईल, वास येईल, मी आंधळा होईन. तुला माझा खूप त्रास
सोसावा लागेल. विचार करुन सांग.’’
संदीपक म्हणाला, ‘‘गुरुदेव, माझी
तयारी आहे. आपण बरोबर येण्याची अनुमती द्यावी एवढेच ?’’
दुसर्या
दिवशी वेदधर्म संदीपकासह काशीला निघाले. काशीत मणिककर्णिक घाटाच्या उत्तरेस
कंवलेश्वर, येथे राहू लागले. अल्पावधीत त्यांना कोड झाले. त्यांची दृष्टी गेली.
त्यांचा स्वभाव रागीट आणि विचित्र झाला. संदीपक अहोरात्र त्यांची सेवा करत होता.
त्यांना आंघोळ घालणे, जखमा धुणे, औषध लावणे, कपडे धुणे, जेवू घालणे, सेवा करता
करता त्याच्या सर्व इच्छावासना जळून गेल्या. त्याच्या बुध्दीत प्रकाश प्रगटला.
‘‘घर विच आनंद रह्या भरपूर । मनमुख स्वाद न पाया ॥’’ जय मनमुख होऊन साधना कराल तर
हाती काही लागणार नाही. गुरुने सांगीतलेल्या मार्गाने आचरण कराल तर भटकणार नाही.
गुरुजींच्या
सेवेत अनेक वर्षे लोटली. त्याची गुरुसेवा पाहून प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या
पुढे प्रगटले आणि म्हणाले, ‘‘संदीपका, लोक काशीविश्वनाथाच्या दर्शनाला येतात; पण
मी तुझ्याकडे, न बोलावता आलो आहे; कारण ज्यांच्या ह्रदयात मी सोहं स्वरुपात
प्रगटलो अशा सद्गुरुची तू सेवा करतोस, त्यांची शारीरिक स्थिती व्याधीग्रस्त असली,
तरी त्यांच्यात चिन्मय तत्व जाणून तू सेवा करतोस. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू
जे हवे आहे ते माग ?’’
संदीपक
संकोचला, ‘‘हे प्रभू आपली प्रसन्नता मला पुरे आहे.’’ असे म्हणाला. मात्र भगवान
शंकर ऐकेनात. काहीतरी मागच म्हणून हट्ट धरला.
संदीपकाने सांगितले. ‘‘हे महादेवा
तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे माझे भाग्य आहे. पण वर मागायला मी पराधीन आहे.
माझ्या गुरुच्या आज्ञेशिवाय मी तुमच्याकडे काही मागू शकत नाही.’’
शंकरांनी
गुरुला विचारुन येण्यास सांगितले. संदीपक गुरुकडे आला आणि विचारले, ‘‘आचार्य,
आपल्या कृपेने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होऊन वर देऊ इच्छित आहेत.आपली आज्ञा
असेल, तर आपले कोड आणि अंधत्व बरे होण्याचा वर मागू ? ’’
हे ऐकताच वेदधर्म संतापले आणि
म्हणाले, ‘‘नालायका ! सेवा टाळू बघतोस काय ? दुष्टा माझी सेवा करुन थकला आहेस
म्हणून भीक मागतोस ? शंकर देऊन देऊन काय देतील ? शरीरासाठीचा ना ? प्रारब्ध चुकेल
का त्याने ? जा चालता हो इथून. नको म्हणताना बरोबर आलासच का ?’’
संदीपक
धावतच भगवान शंकराकडे गेला व काही नको म्हणून सांगितले. हे पाहून शंकर प्रसन्न
झाले व सुचकपणे म्हणाले, ‘‘काय गुरु आहेत ? एवढी सेवा करणार्या शिष्यावरही
रागावतात ?’’
संदीपकाला
गुरुला नावे ठेवलेली आवडली नाहीत. ‘‘गुरुकृपा ही केवलं…’’ असे सांगून तो निघून
गेला. शंकरांनी ही हकीगत विष्णूंना सांगितली. त्याची सेवावृत्ती, गुरुनिष्ठा यांचे
कौतुक केले. ‘‘गुरुद्वारी झाडलोट करणे, भिक्षा मागणे, त्याला आंघोळ घालणे, जेवु
घालणे हीच त्याची पूजा आहे’’ असे सांगितले. त्यांचे ऐकून विष्णूनेही त्याची
परीक्षा पाहिली. त्यानेही संदीपकाला वर मागण्यास सांगितले. हट्टच धरला. तेव्हा
संदीपकाने विष्णूचे पाय धरले आणि म्हणाला, ‘‘हे त्रिभुवनपती, गुरुकृपेनेच मा आपले
दर्शन झाले आहे. मला एवढाच वर द्या की गुरुचरणी माझी अढळ श्रद्धा कायम राहो.
त्यांची निरंतर सेवा घडो !’’
विष्णूने
प्रसन्न होऊन त्याला वर दिला. वेदधर्मांना ही हकीगत कळताच ते आनंदित झाले त्याला
ह्रदयाशी कवटाळीत आशीर्वाद देत म्हणाले, ‘‘बाळा, तू सर्वश्रेष्ठ शिष्य आहेस. तुला
सर्व सिध्दी प्राप्त होतील. तुझ्या चित्तात ऋध्दी-सिध्दी राहतील.’’ संदीपक
म्हणाला, ‘‘गुरुवर ! माझ्या ऋध्दि-सिध्दी आपल्या चरणापाशीच आहेत. या नश्वराच्या
मोहात न टाकता आपल्या चरणसेवेचा शाश्वत आनंद मला मिळावा एवढेच द्या.’’
त्याचक्षणी वेदधर्माचे कोड नाहीसे झाले. त्यांचे शरीर कांतीमान झाले. हा शिष्य सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झाला म्हणून वेदधर्मांनी ब्रम्हविद्येचा विशाल खजिना त्याला समर्पित केला. धन्य आहे संदीपकाची गुरुभक्ती.
समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य कल्याण .
समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही
तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण !
गुरूंचे आज्ञापालन
केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली,त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी. त्यांचे मूळचे
नाव अंबाजी. एकदा समर्थरामदासस्वामींनी अंबाजी ला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी
तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने
गुरुआज्ञा प्रमाण मानून कुर्हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात मग्न
झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत पडला. सर्व जण घाबरले. समर्थांना
हेकळताच ते तेथे आले. त्यांनी विहिरीत डोकावून विचारले, ‘‘अंबाजी, कल्याण आहे ना
?’’
‘‘हो, कल्याण आहे स्वामी !’’ विहिरीतून
उत्तर आले.
‘‘चल ये तर मग वरती.’’ समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्याने सांगितले. त्या दिवसापासून समर्थांसहित सर्व जण त्याला ‘कल्याण’ या नावाने हाक मारू लागले.
संकलन : गिरीष दारुंटे , मनमाड-नाशिक
--------------------------------
--------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻