साने गुरुजींच्या गाजलेल्या कविता...
साने गुरूजी नावाने प्रसिद्ध, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.
साने गुरुजी केवळ मानवतेचेच पुजारी नव्हते, तर शब्दांचेही पूजक होते. ज्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता गाजल्या होत्या, त्याच काळात साने गुरुजींच्या कविताही तरुण मनाचा ठाव घेत होत्या. गुरुजींच्या महत्त्वाच्या कवितेतल्या या तीन कविता आजही अनेकांच्या मुखातून ऐकायला मिळतात. आज गुरुजींचे स्मरण म्हणून या तीन कविता...
!! आता उठवू सारे रान !!
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतक-यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण..
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेऊनि पेटवतील सारे रान..
कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील
अडवणूक त्या करणा-यांची उडवू दाणादाण..
शेतक-यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान..
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण..
!! खरा तो एकची धर्म !!
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती, सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
नाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
!! बलसागर भारत होवो !!
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो..
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया होवो...
विश्वात शोभुनी राहो..
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला होवो..
विश्वात शोभुनी राहो...
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य कराया होवो...
विश्वात शोभुनी राहो...
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो...
विश्वात शोभुनी राहो...
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो..
विश्वात शोभुनी राहो..
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो..
विश्वात शोभुनी राहो...
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/