शाळाप्रवेश सूत्रसंचालन | शाळा प्रवेशोत्सव पूर्वतयारी | शाळा पूर्वतयारी  | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

DOWNLOAD PDF HERE

नमस्कार मी... उपस्थित मान्यवर व सर्व विद्यार्थ्यांचे उल्हासाने व उत्साहाने भरलेल्या या नवीन शैक्षणिक वर्षात तसेच आपल्या या ज्ञानमंदिरात सस्नेहपुर्वक स्वागत करतो / करते व सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करतो / करते.

सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम...!!

चिमुकल्या पावलांनी

ज्ञानमंदिर हे गजबजले

ज्ञान घेऊनी ज्ञानी होवुया

जणू स्वप्न मनी हे रुजले

                             - आस

कोणी म्हणतसे शाळा

कोणी म्हणतसे स्कुल

किलबिलाटात बालकांच्या

शाळाही भासते गोकुळ

                                       - गिरीश दारुंटे

विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो. शाळा हि विद्यार्थीमनाच्या आवाजाचा कानोसा आपल्या सर्वांच्याही नकळत घेत असते, एवढेच नव्हे तर हीच शाळा त्यांच्या स्पर्शासाठी आतुरलेली व आसुसलेली असते. आज शाळेचा पहिला दिवस अन हाच तो क्षण की ज्या क्षणाला शाळेतील प्रत्येक वर्गदेखील तुमच्या स्वागतासाठी उत्सुकलेला आहे.

ज्ञानमंदिर हे ज्ञानाचे आज 

किलबिलाटाने नटले

निर्जीव भिंतींना या जणू

त्यांचे श्वास येऊन भेटले

                                    - गिरीश दारुंटे

आजच्या शालेय प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आपणा सर्वांना सुपरिचित असलेले / असलेल्या श्री. / सौ. .... यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते. 

(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे.)

◆ सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन :

सुमंगल वातावरणात

समईच्या उजळणार वाती

मान्यवरांनी शुभहस्ते

प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती

                                               - गिरीश दारुंटे

उपस्थित सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे.

तद्नंतर सर्व मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे... धन्यवाद !

सुख दुःखाच्या छायेतून कळते 

जसे सार अवघ्या जीवनाचे 

आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते

तसे हे महत्व प्रास्ताविकाचे

                                             - गिरीश दारूंटे

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेचे मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका श्री. / सौ. ........ यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

प्रास्ताविकानंतर व्यासपिठावरील मान्यवरांचा परिचय तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत आपल्या शाळेतील श्री. / सौ. .... हे करतील.

(आपल्या स्तरावर स्वागत नियोजन करून ठेवावे.)

आज शाळेचा पहिला दिवस आनंद व उत्साहाने तुमची सर्वांची मने ओथंबून वाहत आहेत. नवे मित्र, नव्या मैत्रिणी, नवी पुस्तके, नवे वर्गशिक्षक या सर्वच नवख्या अनुभवास सामोरे जाण्यास व नव्या जुन्या - मित्र मैत्रिणींच्या भेटीसाठी आपण आतुरलेले आहात. यावर्षीच्या नवीन संकल्पपूर्तीच्या शुभेच्छा मान्यवरांकडून स्विकारण्याआधी मी मान्यवरांना विनंती करतो / करते की त्यांनी गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करावे.

पगपग चल काँटोपर

तु तेरे पैर रखकर

फुल अपने आप बरसेगें

तेरी लगन देखकर

                              - आस

शाळाप्रवेशाच्या दिनी

अशा टाळ्या कडाडल्या

निष्प्राण भिंतीही शाळेच्या

जणू आज सचेतन झाल्या

कधी हसविते रडविते

लावी आई बाबापरी लळा

देई अनमोल संस्कारांचे धडे

प्रिय आम्हा आमुची शाळा

पाऊल शाळेत टाकण्या

भासे मन तुमचे अधीर

स्वागत तुमचे करण्या

उभे ठाकले ज्ञानमंदिर

                                     - गिरीश दारूंटे

नवीन शैक्षणिक वर्षात आपण सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं संकल्प व त्याचबरोबर तुमची साधली जाणारी प्रगती, सर्वांगीण विकास व यशप्राप्तीसाठी तुम्हाला यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. .................. यांनी करून त्यांच्या अनुभावाच्या / ज्ञानाच्या कुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी व भरभराटीसाठी मार्गदर्शक ठरतील.

मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत, धन्यवाद !

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .

आपण केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.

रंगीबेरंगी मनामनांनी

अशी शाळा ही भरली

जणू शब्दररुपी फुलपाखरे

ही चोहीकडे विखुरली

शब्द, शब्द कविता झाल्या

अंक, अंक झाले पाढे

गुरुजनांच्या मायेने

हृदय ज्ञानमंदिर झाले

                                     - आस

◆ आभार :

ज्ञानकुंभ रिता करुनी

संस्कारांचे ज्ञान दिले

बोधामृत पाजून ज्ञानाचे

आम्हा उपकृत केले

तुम्ही पाठीराखे आमुचे

सदा तुमचाच आधार

आशिष असू द्यावे शिरी

स्विकारूनी हे आभार

                                                 - गिरीश दारुंटे

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ आमच्या चिमुकल्यांच्या / विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी देऊन अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी ........ विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल...

सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता होतेय असे मी जाहीर करतो/ करते.

!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!

(कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)

शब्दांकन : गिरीष दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

---------------------------------
इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

--------------------------------

प्रार्थना व गीते डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

--------------------------------

📲 ऑनलाइन वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीबाबत📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

Previous Post Next Post