स्त्री भ्रूण हत्या एक समस्या
स्त्रीभ्रूण हत्येचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचं एक कारण म्हणजे आमीर खानच्या बहुचर्चित "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात या सामाजिक विषयाला दिलेलं महत्व.. खरं तर काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला एवढचं...! कारण या विषयावर पूर्वीपासूनच जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम सुरुच आहे. लेक वाचवा अशी आंदोलनही झाली. पण आमीर खानच्या कार्यक्रमामुळे तो विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. तसच या विषयाचं गांभिर्य, स्त्री भ्रूण हत्या केली जात असताना होणारा मातेचा कोंडमारा आणि वैद्यकीय क्षेत्रातली अपप्रवृती यावरही प्रकाश टाकण्यात आल्यानं हा विषय चर्चेत आला.
स्त्री भ्रूण हत्या करणा-या अनेक डॉक्टरांनी त्यांची दुकानंच थाटलेली आहेत. अनेक शहरात हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुय. बीड जिल्ह्यातला परळी तर या प्रकारात बदनाम झालय. अनेक हॉस्पीटलमध्ये स्त्रीभ्रुण हत्या होत असल्याचं उघड झालं होतं. त्यांचा परवानाही रद्द करण्यात आला होता. पण पुन्हा तो धंदा राजरोसपणे सुरु होता. त्यातच मुलगी नको म्हणून गर्भपात करताना एका मातेचा मृत्यु झाला. त्यानंतर काही डॉक्टरांवर कारवाईसाठी हात उचलला गेला. काही डॉक्टर तर फरार देखील झाले. पण असे गोरखधंदे हॉस्पीटलमध्ये होत असतात हे सर्वांनाच माहित असताना कोणतीही यंत्रणा त्याकडे का जात नाही हे न समजण्यासारखे नाही. कारण याच प्रशासकीय यंत्रणा अशा डॉक्टरांना पाठीशी घालतात. हे सुद्धा त्यातलं एक प्रमुख कारण आहे. परळीतला डॉक्टर मुंडे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारचे डॉक्टर मुंडे जागोजागी आहेत आणि त्यांच्याकडे अशा स्त्री भ्रूण हत्या राजरोसपणे होत आहेत. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात गर्भपात करण्याचा हा धंदा राजरोसपणे सुरु आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या सोनोग्राफी सेंटरची संख्या आणि तिथं होत असलेले प्रकार याची व्याप्ती लक्षात येते.. मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या आतच तिला मारण्याचं पाप करण्याचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. त्याला जबाबदार असणा-यांनी विचार करायला हवा. हा प्रकार खेडेगावात, आदिवासी भागात जास्त प्रमाणात चालतो असा आतापर्यंत समज होता. पण मागच्या काही दिवसात प्रकाशात आलेल्या माहितीनुसार मोठ्या शहरातून तसच सुशिक्षीत लोकांकडूनही हा प्रकार होत असल्याचं पुढं आलय. म्हणूनच हा विषय आणखी गंभीर होत चाललाय. कारण मुलगी नको, मुलगाच हवा ही मानसिकता सगळीकडे घर करत चालल्याचं यावरुन दिसून येतय. त्यामुळे शहर असो की गाव, सुशिक्षित असो अडाणी, कमी शिकलेला या सर्व स्तरातून मुलगी नको हा विचार नष्ट होणं गरजेचं आहे.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी जिल्हातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना सायलंट ऑब्जर्व्हर हे यंत्र बसवण्याचा आदेश दिला होता. त्यातून कोणत्या सोनोग्राफी केंद्रात काय प्रकार चाललाय हे स्पष्ट होण्यास मदत होते. तसच सोनोग्राफी करताना त्या महिलेकडून एक अर्ज ऑनलाईन भरुन घेण्याचा आदेशही काढलाय. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. पण मुंबई हाय कोर्टानं तो अर्ज फेटाळून लावला. कोल्हापूरात मुलींचं प्रमाण हे दरहजारी ८३९ पर्यंत खाली घसरलंय. थोड्या फार फरकानं मुलींचं हे प्रमाण इतर जिल्ह्यातही असंच घसरत चाललय. त्यामुळे मुलगी वाचवणं ही काळाची गरज बनलय. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. तसच प्रसुतीपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदाही आहे. पण कायद्याच्या पळवाटा तसेच घरातूनच वंशाचा दिवा हवा म्हणून होणारा हट्ट यामुळे अनेक ठिकाणी स्त्री भ्रूण हत्या केली जाते. हे थांबवायचे असेल तर त्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. जोपर्यंत मुलगी नको फक्त मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणं शक्य नाही. फक्त डॉक्टरांनाही दोष देऊन काही उपयोग होणार नाही.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलींना जन्माला येण्यापूर्वीच त्यांना संपवण्याचा हा प्रकार थांबणं अवघड आहे. कारण सर्वांना मैत्रिण हवी आहे, बायको हवी आहे, आई हवी आहे, बहिण हवी आहे.. मग मुलगी का नको...? मुलीला जन्माला येऊ दिलं जात नसेल तर आई, बायको किंवा बहिण कुठून येणार याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच लेक वाचवा असं म्हणण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीय.
साभार : धनंजय कोष्टी
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
🔖 जागतिक महिला दिन उपयुक्त भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन
↪️ जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक
↪️ ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण
↪️ स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण
↪️ जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण
↪️ महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण
↪️ लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻