राम-श्याम, सीता और गीता असे बरेच जुळ्यांवरचे सिनेमे आपण बघतो. त्यात उडणारा गोंधळ प्रत्यक्षातही आपण अनुभवला असेल. जुळ्या बहिणी, भावांमधील फरक आपल्याला ओळखू आला नसेल किंवा असेही झाले असेल की जुळे तर आहेत, पण दिसायला एकदम वेग
ळे आहेत किंवा जुळ्यातील एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ही अशी जुळी का बरे होत असतील. एरवी एकच मूल जन्माला येत असते.
जुळ्यांचे आपण वर जे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याची भिन्नभिन्न कारणे आहेत. स्त्रीबीजाचे शुक्राणूकडून फलन झाल्यानंतर त्याचे दोन भाग, दोनाचे चार असे वाढून पेशींचा गोळा तयार होऊन एक गर्भ तयार होतो; परंतु काही वेळेस प्रथम फलन झाल्यावर स्त्रीबीजाचे जे दोन भाग होतात, ते वेगळे वेगळेच वाढायला लागून दोन गर्भ तयार होतात. असे जे जुळे असते ते दिसावयास अगदी सारखे असते आणि त्यांचे लिंगही एकच असते. म्हणजे दोन्ही मुली किंवा दोन्ही मुले. दुसऱ्या प्रकारात दोन वेगळे स्त्रीबीज दोन वेगवेगळ्या शुक्राणू फलित होऊन दोन गर्भ तयार होतात. हे जुळे मग समान लिंगाचे असू शकते किंवा भिन्न लिंगाचे. एक मुलगा व एक मुलगी अशा जोड्या तयार होतात. अशी जुळी दोन वेगळ्या स्त्रीबीजाकडून तयार झाल्याने दिसावयास सारखी नसतात. असे हे जुळ्यांचे दुखणे.
डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून,