लघुग्रह
लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह. मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यानच्या रिकाम्या जागेत लघुग्रहांचा पट्टा आहे. ग्रहांच्या निर्मिती काळात ग्रह बनण्यात अपयशी ठरलेले लहान-लहान खडक म्हणजे लघुग्रह.
लघुग्रह म्हणजे एक ठराविक आकार नसलेले लहान मोठे दगड गोळे जे मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्यामध्ये सूर्याभोवती गोलाकार भ्रमण करतात. लाखोंच्या संख्येने सूर्याभोवती भ्रमण करणारे हे लघुग्रह सूर्यापासून साधारण २. ७ खगोलीय अंतरामध्ये भ्रमण करतात.
बोडचा नियम :
अठराच्या शतकामध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान बोड याने सूर्यापासून ग्रहांच्या अनुक्रमे अंतरावर एक समीकरण तयार केले, त्यालाच 'बोडचा नियम' असे म्हणतात. यामध्ये सूर्याजवळील सुरवातीचा ग्रह ( ० ) शून्य तर त्यानंतरचा ग्रह ३ व त्यानंतरची प्रत्येक संख्या आधीच्या संख्येच्या दुपटीने ७६८ पर्यंत वाढवत न्यायची, मग त्या संख्येमध्ये ४ ही संख्या मिळवायची व येणार्या संख्येला १० ने भाग द्यायचा व शेवटी जे उत्तर येईल ती संख्या त्या ग्रहाचे खगोलीय एककामध्ये सूर्यापासूनचे अंतर असेल.
बोडचा नियम जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा खगोलशास्त्रज्ञांना असे वाटले की नक्कीच या नियमानुसार मंगळ व गुरू यांच्यामध्ये एखादा ग्रह असावा.
१ जानेवारी १८०१ मध्ये ग्युसेप्पी पियाझ्झी ( Giuseppe Piazzi) या इटालियन खगोलशास्त्रज्ञाने सर्वप्रथम लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा 'सेरेस' ( Ceres) नावाचा लघुग्रह शोधला. या लघुग्रहाचा व्यास साधारण १००३ कि. मी. एवढा आहे. 'सेरेस' हाच मंगळ व गुरू या दोन ग्रहांमधील ग्रह आहे. असे त्यावेळेस समजण्यात आले, पण लगेचच पुढील वर्षी १८०२ मध्ये ६०८ कि. मी. व्यासाचा अजून एक लघुग्रह सापडला. त्याला 'पलास' ( Pallas) हे नाव देण्यात आले. त्यानंतर १८०७ मध्ये ५३८ कि. मी. व्यासाचा 'वेस्टा' ( Vesta) हा लघुग्रह शोधला गेला. त्यानंतर १८४५ पर्यंत अजून आणखी ५ लघुग्रह शोधण्यात आले. दरवर्षी जवळपास ५ या प्रमाणे १९१० पर्यंत लघुग्रहांची संख्या २५ वर गेली. नंतर हा शोधक्रम वाढत जाऊन आजपर्यंत आपण हजारो लघुग्रह शोधले आहेत.
लघुग्रहाचे महत्त्वाचे तीन भाग :
१) C-Carbonaceous २) S-Silicate ३) M-Type
१) C-Carbonaceous : हे लघुग्रह गडद काळ्या रंगाचे असून त्यावर पडलेली सूर्यकिरणे फार थोड्या प्रमाणात परावर्तित करतात. या लघुग्रहांना सूर्यमालेतील सर्वात वृद्ध लघुग्रह म्हटले जातात.
२) S-Silicate : ह्या प्रकारातील लघुग्रह पहिल्या प्रकाराएवढे गडद नसतात. याचा रंग थोडासा लालसर असून त्यावर पडलेल्या सूर्यकिरणांपैकी १/५ ( एक पंचमांश ) किरणे परावर्तित करतात. सिलिकेट प्रकाराच्या खडकाने बनलेल्या लघुग्रहांमध्ये लोह आणि दगडांचे प्रमाण जास्त आढळते.
३) M-Type : वरील दोन्ही प्रकारच्या मानाने ह्या प्रकारातील लघुग्रह प्रकाशकिरणे जास्त स्वरूपात परावर्तित करतात. (Nickel-Iron) प्रामुख्याने जस्त व लोह असणार्या मोठ्या लघुग्रहांच्या टकरीमध्ये त्यांच्या तुकड्यांपासून अशा प्रकारचे लघुग्रह निर्माण होतात. त्यांना नैसर्गिक रंग असतो तर त्यांच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आढळून येते.
लघुग्रहांच्या निर्मितीवर आतापर्यंत अनेक निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
काहींच्या मते सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळेस या लघुग्रहांची निर्मिती झाली असावी, कारण जरी सर्व लघुग्रहांना एकत्र केले तरी त्यांच्यापासून एखादा मध्यम आकाराचा ग्रह तयार होऊ शकत नाही.
तर काहींच्या मते धूमकेतूने त्याच्या मार्गामध्ये सोडलेल्या बर्फ आणि धूळ यामुळे हे लघुग्रह निर्माण झाले असावेत.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक