तंबाखूच्या झाडाच्या, निकोटीना टोबॅकमच्या पानांपासून तंबाखू मिळते. वाळलेल्या पानांचा सिगरेट व विडी यांमध्ये उपयोग करतात. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे विषारी द्रव्य असते. त्वचेवाटे, तोंडावाटे वा श्वासमार्गाने जास्त प्रमाणात निकोटीन शरीरात गेले तर विषबाधा होऊ शकते. ६० मि.ग्रॅ. निकोटीन शरीरात गेल्यास मृत्यू येऊ शकतो.
तंबाखूचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर होतो. लहान वयापासूनच अनेकांना तंबाखू खाण्याचे व धूम्रपान करण्याचे व्यसन लागते. मोठ्या व्यक्तींचे अनुकरण, कुतूहल, मित्रांचा दबाव अशी अनेक कारणे हे व्यसन लागण्यामध्ये महत्त्वाची ठरतात. एकदा व्यसन लागले की मग ते सोडणे अवघड होऊन जाते. आता धूम्रपानाचे दुष्परिणाम बघू. सिगारेटच्या धुरात १०० हून अधिक घटक असतात. यात टार व निकोटीन हे प्रामुख्याने असतात. निकोटीनमुळे सुरुवातीला मेंदूच्या पेशींना उत्तेजना मिळते; पण त्यानंतर या पेशींचे कार्य थंडावते, स्नायूदेखील लुळे पडतात. धूम्रपानाच्या सततच्या सवयीने घशात खवखवते व बारीक खोकला येतो. श्वासनलिका दाह होतो. फुफ्फुसात निकोटीन व धुरातील इतर घटक गेल्याने कर्करोग होण्याची शक्यता खूपच वाढते. धूम्रपानामुळे शरीरातील धमण्यांना लवकर काठीण्य येते व व्यक्ती हृदयविकाराला बळी पडते. एकूण म्हणजे धूम्रपानामुळे व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो. असे म्हणतात की, एक सिगरेट ओढली की व्यक्तीचे आयुष्य पाच मिनिटांनी कमी होते. दुसरे म्हणजे, सिगरेट ओढून ती व्यक्ती धूर हवेत सोडते. साहजिकच त्याच्या आसपासच्या लोकांनाही धूम्रपानाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये क्षयरोगही लवकर होऊ शकतो. असे हे जीवघेणे धूम्रपान मानवाखेरीज इतर कोणताही प्राणी धूम्रपान करत नाही. गाढव देखील गाढवपणा करत नाही, मग आपण का बरे करावा ?
डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन