इतिहासाची साधने
२.१ भौतिक साधने
२.२ लिखित साधने
२.३ मौखिक साधने
२.४ प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने
२.५ इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी
करून पहा :
तुमच्या घरात असलेल्या आजी-आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा.
तुमच्या परिसरातील / गावातील एखादया जुन्या वास्तूची माहिती गोळा करा.
आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना 'इतिहासाची साधने' म्हणतात.
इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत : भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने.
सांगा पाहू!
• किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना 'भौतिक साधने' म्हणतात. याशिवाय अजून कोणकोणत्या वास्तूंना भौतिक साध म्हणतात ?
२.१ भौतिक साधने :
दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्परसंबंधांची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यांवरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या तुमच्या घरात असलेल्या आजी-आजोबांच्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची 'भौतिक साधने' म्हणतात.
माहीत आहे का तुम्हांला ?
धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत. त्यांना कीड लागते. त्यांचा भुगा होतो.
प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते.
माहीत आहे का तुम्हांला ?
मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांत होतो.
२.२ लिखित साधने :
अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांतून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली.
माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यांपासून लिपीचा विका होण्यास हजारो वर्षे जावी लागली.
सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधना कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले, तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तान्त इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक-सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवासवर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची 'लिखित साधने' असे म्हणतात.
माहीत आहे का तुम्हांला ?
भूर्जपत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भूर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात.
करून पहा :
तुमच्या परिसरातील / गावातील वस्तु संग्रहालयाला भेट दया. तेथे कोणकोणत्या वस्तू आहेत, यावर निबंध लिहा.
• जात्यावरच्या गाण्यांचा संग्रह करा.
• विविध लोकगीते मिळवा. त्यांपैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा.
२.३ मौखिक साधने :
ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची 'मौखिक साधने' म्हणतात.
माहीत आहे का तुम्हांला ?
ओवी :
पांडुरंग पिता । रूक्मिण माझी बया ।।
आषाढ वारीयेला । पुंडलिक आला न्याया ।।
लोकगीत :
'महानगरी उजनी
लई पुण्यवान दानी
तेथे नांदत होता राजा
सुखी होती प्रजा
तिन्ही लोकी गाजावाजा
असा उजनीचा इक्राम राजा' (विक्रमादित्य)
माहीत आहे का तुम्हांला ?
प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने :
लिखित साधने :
हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य
मेसोपोटेमियातील इष्टिकालेख
महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या
जैन, बौद्ध साहित्य
ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन
चिनी प्रवाशांचे प्रवासवर्णन
व्याकरणग्रंथ, पुराणग्रंथ, कोरीव लेख
भौतिक साधने :
वास्तू
गुहा
घरे
स्तूप
लेणी
मंदिरे
मशिदी
स्तंभ
मौखिक साधने :
प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले, तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो, तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांत होतो.
२.४ प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने :
अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इ. स. पू. १५०० पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्त्वीय उत्खननांत सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो.
२.५ इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी :
इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे, म्हणून तो विश्वासार्ह असेलच, असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास - लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते.
काय कराल ?
तुम्हांला एक जुने नाणे सापडले.
स्वत:जवळ ठेवाल.
पालकांना दयाल.
वस्तुसंग्रहालयात जमा कराल.