महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या सर्वांगिण विकासाला गती आणि दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले म्हणूनच त्यांना आपण सर्वजण महाराष्ट्राचे शिल्पकार असे म्हणतो. शेती, सहकार, उद्योग, वीजनिर्मिती आणि शिक्षण आदी क्षेत्रांचा विकास त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणला. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व सुसंस्कृत आणि दूरदृष्टीचे होते. त्यांच्या कृतीशिल विचारातून आजचा महाराष्ट्र घडल्याचे आपणास दिसून येते. संबंध देशात एक प्रगतिशिल आणि चांगलं राज्य म्हणून महाराष्ट्राला जो नावलौकिक प्राप्त झाला त्यामध्ये यशवंतराव चव्हाणंचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात महागडे होत जाणारे शिक्षण. शिक्षणातून आपली जबाबदारी झटकणारे शासनाचे धोरण आणि वंचितांच्या शिक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न भविष्यात गंभीर स्वरूप धारण करेल. या पार्श्वभूमीवर, यशवंतरावांच्या शैक्षणिक भूमिकेची राज्याला आणि देशाला नितांत गरज आहे असे मला वाटते.
शिक्षणाच्या अनुषंगाने अनेकांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत, आपले विचार मांडले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या व्याख्येपासूनच आपण यशवंतराव चव्हाण यांचा शैक्षणिक दृष्टिकोन, भूमिका आणि धोरण समजावून घेण्याचा या ठिकाणी अल्पसा प्रयत्न करू या. शिक्षणाची व्याख्या करताना यशवंतराव म्हणतात, ‘शिक्षित व्यक्तीला स्वतःच्या भोवती घडणाऱ्या गोष्टी आणि जागामध्ये घडणाऱ्या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते, त्यांचा योग्य अर्थ समजावून घेता येतो. त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो, आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते त्याला मी शिक्षण मानत आलो आहे.’ शिक्षणाची अत्यंत साधी-सरळ आणि सोपी व्याख्या करणारे यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचे शैक्षणिक धोरण निश्चित करताना देशातील शिक्षणाचा इतिहास आणि परंपरा लक्षात घेतल्या होत्या, हे त्यांच्या शैक्षणिक विषयांवरील प्रतिपादनावरून लक्षात येते.
शिक्षणाचे माध्यम कोणते असावे आणि का? याबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे की, ‘आमच्या येथील बहुसंख्य समाज हजारों वर्षाँपासून शिक्षणापासून दूर आहे. लोकशाहीचा खरा अर्थ त्याना समजावून सांगावयाचा असेल आणि लोकशाही मजबूत करावयाची असेल, तर शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून, भाषेतूनच दिले पाहिजे. त्यातूनच आमची जनता शहाणी होईल आणि खऱ्या अर्थाने ती लोकशाहीचे रक्षण करेल. ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी आहे. ऋषीमुनींची आणि पंडितांची ज्ञानभाषा होती संस्कृत. कारण ती देवभाषा होती आणि जनसामान्यांची भाषा होती प्राकृत, हे फार पूर्वी पण नंतर ही तेच झाले. इंग्रज आले आणि या देशातील ज्ञानभाषा इंग्रजी बनली’
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाबाबत अतिशय गांभीर्याने मत व्यक्त करताना म्हटले होते, ‘तुम्हाला जर झाड मोठे आणि मजबूत करावयाचे असेल तर त्याच्या बुंध्याला पाणी घातले पाहिजे..’ १९८३ च्या कालावधीमध्ये आजच्या प्रगत अमेरिका राष्ट्राने सार्वजनिक शाळांतील गुणवत्तेतील उत्कृष्टतेचा शोध घेण्यासाठी आयोग नेमला होता. प्रारंभिक चौकशीमध्येच शालेय शिक्षणाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट असल्याचे लक्षात येताच आयोगाचे नाव ‘राष्ट्र धोक्यात ’(Nation at Risk) असे करावे, अशी विनंती नियुक्त आयोगाच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना केली होती आणि त्या आयोगाचा अहवाल Nation at Risk या नावानेच प्रसिद्ध आहे. यावरून प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे अधोरेखित होते.
शिक्षणाचे माध्यम, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षण यातील परस्पर संबंध एवढाच विचार करून यशवंतरावजी थांबत नाहीत, आपणास आपल्या राज्याचा सर्वांगिण विकास खऱ्या अर्थाने साधवयाचे असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय राज्याचा औद्योकि विकास घडू शकणार नाही, त्याच बरोबर भारत हा कृषीप्रधान दश असल्यामुळे शेतीच्या विकासावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे, आणि म्हणून अंधश्रद्धेला मूठमाती देत विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची आपण कास धरली पाहिजे, त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पावले टाकली पाहिजे, हा विचार घेऊनच ते सतत आग्रही राहिले.
शिक्षण हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. ते सर्वांना मिळाले पाहिजे, म्हणून आरक्षणाच्या परिघाबाहेर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, हे त्यांच्या १९६०च्या दरम्यान लक्षात आले आणि देशात प्रथमच महाराष्ट्रात त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद पणाला लावून प्रचंड विरोधाला सामोरे जात आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थांना विनाशुल्क शिक्षण देणारी ‘ईबीसी’ची योजना आणली. हा खऱ्या अर्थाने क्रांतीकारक निर्णय होता. परिणामी महाराष्ट्रातील अनेक पिढ्या या सवलतीचा लाभ घेत शिकल्या आणि समृद्ध झाल्या. याचे संपूर्ण श्रेय यशवंतरावांच्या दूरदृष्टी निर्णयाला जाते. याचवेळी धर्मांतरीत नवबौद्ध समाजाला शैक्षणिक सवलती मिळण्यात निर्माण झालेल्या अडचणीही त्यांनी सोडवल्या. याबरोबरच मराठवाड्यात पुरेशी महाविद्यालये नसतानाही त्यांनी औरंगाबाद येथे आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन या परिसरातील लक्षावधी विद्यार्थ्यांना आपल्याच परिसरात उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग खुला करून दिला.
एकीकडे शिक्षणाचा आग्रह दुसरीकडे शिक्षणाचा मार्ग आणि तिसरीकडे त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांची चिंता वाहणारा सखोल ज्ञानी शिक्षणतज्ज्ञ यशवंतरावजी म्हणतात. आज ज्या तऱ्हेचे शिक्षण आपल्या अवतीभोवती दिले जाते त्याचा ग्रामीण जीवनावर काय परिणम होतो? ‘खेडूत बाप आणि आई यांनी कष्ट करून शिक्षणासाठी बाहेर पाठविलेला मुलगा पदवी घेऊन जेव्हा शहाणा होतो, तेव्हा ते त्याचे शहाणपण खेड्यामध्ये राहून शेती करणाऱ्या किंवा दुसरा काही उद्योग करणाऱ्या त्याच्या मातापित्याचे आर्थिक जीवन सुधारण्यास उपयोगी पडत नाही.’ तो शहरात एखादी सोयीची, सुखाची नोकरी मिळवून आपले आई-बाप आणि त्याच्या मातृभूमीला मुकतो. हे फार मोठे करुण चित्र आहे. शिक्षणाच्या वाढीबरोबर अशा तऱ्हेचे प्रश्न जर घरोघरी निर्माण होणार असतील, तर आपणास या शिक्षणासंबंधाने विचार करावा लागेल.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻