अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया सण मांगल्याचा | Festival Of Akshayya Trutiya

अक्षय्य तृतीया सण मांगल्याचा

भारतीय संस्कृतीतील महत्वाचा दिवस, साडे-तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

ज्योतिषशास्त्र : अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे. असे दुर्(योग) यापूर्वी अनेक अक्षय्य तृतीयांना आले होते, त्यांपैकी हे काही प्रसंग :

शुक्रास्त असलेले दिवस : १ मे १९४९, ३ मे १९६५, ५ मे १९७३, ७ मे २००८, ९ मे २०१६.

अस्त झाल्याने आकाशात गुरू दिसत नसलेले दिवस : १६ मे १९५६, १ मे १९७६, २३ एप्रिल २०२३.

महत्त्व :

या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.

परशुराम अवतार :

वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.

कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.

या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.

जैन धर्मात :

राजा श्रेयांश वृषभदेव यांना उसाचा रस देताना भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते, व त्यानंतर ते एकदा ग्रहणा साठी निघाले परंतु लोकांना आहार दानाची योग्य विधी माहीत नसल्या कारणाने त्यांना अजुन पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्ष भर उपवास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाचा रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता.

सांस्कृतिक महत्व :

महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

आख्यायिका :

अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळालामहायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्यालाकल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजेयुगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.

शेतीसंबंधी प्रथा :

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)

महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते.

वृक्षारोपण :

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

धार्मिक आचार :

हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य' (न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे

हिंदू धार्मिक व सांस्कृतिक आचार :

या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान. ब्राह्मण भोजन घालणे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खाणे. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे.

सोन्याचे दागिने :

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.

भारताच्या विविध प्रांतांत व प्रदेशांत :

उत्तर भारत : या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे, असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात.

ओरिसा : या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.

दक्षिण भारत : महाविष्णु आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.

पश्चिम बंगाल : या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.

राजस्थान : राजस्थानातही हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात.. तेथे या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

أحدث أقدم