भरपेट जेवण झाल्यानंतर तुम्हाला ढेकर येत असेल. "पोट भरल्याची पावती म्हणजे ढेकर" असे माझे आजोबा म्हणायचे. जेवताना आपण अन्नपदार्थाबरोबरच पाणी पितो. तसेच कळत न कळत हवाही गिळतो. विशेषत: गप्पा मारत, हास्यविनोद करत जेवण चालू असेल तर जास्तच हवा गिळली जाते. पर्यायाने जठरात अन्न-हवा-अन्न-हवा-अन्न असे थर जमा होतात. हवा अन्नपदार्थ व पाणी यापेक्षा हलकी असल्याने ती वर येण्याचा प्रयत्न करते. जठराच्या स्नायुच्या आकुंचन प्रसरणामुळेही अन्नपदार्थाच्या दोन थरांमधील हवेवर दाव येतो व ती जोरात जठराबाहेर पडते. यालाच आपण ढेकर असे म्हणतो. हवा दाबाखाली आल्यामुळे बाहेर पडताना विशिष्ट असा आवाज येतो. जेवण झाल्यानंतर एक-दोन ढेकरा येणे हे नैसर्गिक आहे. काही व्यक्तींना मात्र सारखेच ढेकर येत राहतात. जेवणाच्या वेळा नियमित नसणे, तेलकट-तुपकट पदार्थाचे अतिसेवन, अपचन, आम्लपित्त, जागरण अशा अनेक कारणांमुळे ढेकर येतात. खूप बडबड करणार्या लोकांना हवा सारखी गिळल्यानेही ढेकर येतात. याचसोबत या लोकांना वारा सरण्याचाही त्रास होतो. सूक्ष्मजंतूच्या क्रियेमुळेही मोठ्या आतड्यात वायू तयार होतो. अपचन झाल्यास करपट ढेकर येतात.
हरभऱ्याची डाळ व बटाटा, रताळी, साबुदाणा असे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. जेवणाच्या वेळा नियमित राखणे, तेलकट-तुपकट पदार्थ मर्यादित खाणे, याबरोबरच लवणभास्कर चूर्ण वा हिंग्वाष्टक चूर्ण यांचा वापर केल्यास वायुचा हा त्रास कमी होतो. वायू शरीराबाहेर पडण्यासाठी पाठीवर झोपून आधी एकेक व नंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पोटाजवळ न्यावे.
साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...