पर्वतारोहण करण्याचा तुम्हाला अनुभव असेल, तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीची कल्पना असेल. ते विशिष्ट बूट, दोरखंड, जाड मजबूत असे कपडे, खिळे-हातोडा. एक ना दोन. एवढ्या वस्तू जवळ बाळगून पर्वतावर कसे काय चढता येते, हाच प्रश्न पडावा. कमी उंचीच्या पर्वतावर चढताना एवढी तयारी पुरेशी होते. जर हिमालयासारख्या पर्वतावर जायचे असेल, तर खूप तयारी करावी लागते.
जसजसे वर जावे तसे हवेची घनता कमी होत जाते. प्राणवायूचे प्रमाणही कमी होत जाते. २५,००० फुटांच्या वर गेलात, तर प्राणवायूच्या सिलेंडरशिवाय श्वासोच्छ्वास घेणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडून येतात. श्वसनाचा दर वाढतो, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते व हृदयामार्फत जास्त रक्ताचे शरीरात वहन केले जाते. या सर्व बदलांचा उद्देश एकच असतो व तो म्हणजे हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले असले, तरी शरीराला लागणारा प्राणवायू मिळवणे.
सवय नसलेली व्यक्ती जर एकदम खूप उंचावर गेली तर तिच्यात डोकेदुखी, निद्रानाश, दम लागणे, मळमळ व स्पष्ट न दिसणे अशी लक्षणे दिसतात. काही वेळा १२,००० फुटांहून जास्त उंच गेल्यास काही व्यक्तींच्या फुफ्फुसात पाणी गोळा होऊन सूज येते. यावर उपाय म्हणजे व्यक्तीला पर्वताच्या पायथ्याशी घेऊन जाणे.
खूप उंचावर राहण्याची सवय व्हावी यासाठी पर्वताच्या मध्यावर (जेथून पुढे खूप चढ असतो) सरा शिबिरे स्थापन केली जातात. येथे सात-आठ दिवस राहिल्यावर शरीर त्या परिस्थितीशी जुळवून घेते व त्यामुळे नंतर पर्वतारोहण करणे सोपे जाते.
डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन