सावित्रीबाई फुले मराठी भाषण | सावित्रीबाई फुले मराठी माहिती | सावित्रीबाई फुले जीवन परिचय | सावित्रीबाई फुले कार्य | सावित्रीबाई फुले मराठी निबंध | Savitribai Fule Marathi Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम...!!

उद्धारण्या भारतमातेच्या लेकी

माय दिली तू सुखाला आहुती 

तुझ्याचमुळे ग तेवत आहेत 

सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती

- गिरीश दारुंटे

ऐश्वर्यसंपन्न सुखी संसाराचा त्याग व जीवाचं रान करून, भारतातील प्रत्येक लेकीला विद्येचे दान देणारी नायगावच्या पाटलांची महान लेक म्हणजे सावित्रीमाय...

आपल्या परखड लेखणीतून अंधश्रद्धेवर कडाडून टिका करणारी माझी सावित्रीमाय... भारतीय स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत, आद्यशिक्षिका, ज्ञानाई, ज्ञानज्योती असे कित्येक बहुमान ज्यांच्या त्यागापुढे व कार्यापुढे तोटके पडावेत अशा क्रांतिसूर्य महात्मा फुलेच्या खांद्याला खांदा लावून समाजक्रांती घडवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्व मान्यवरांचे मी श्री. / सौ. ........ मनपूर्वक स्वागत करतो / करते.

अध्यक्षीय निवड :

ज्यांची उपस्थिती वाढविते 

आजच्या कार्यक्रमाची शान 

स्विकारुनी आमुची विनंती 

आपण भुषवावे अध्यक्षस्थान

- गिरीश दारुंटे

विद्यार्थी मित्रांनो योजीलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेले / असलेल्या व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या श्री. / सौ. ........ यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

[सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे.]

दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :

कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.

सुमंगल अशा या वातावरणात 

समईच्या उजळल्या वाती 

मान्यवरांनी त्यांच्या शुभहस्ते

प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती

- गिरीश दारुंटे

[सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करतांना खालील कोट्स वापरू शकतात...]

स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाईंनी आपल्या परखड लेखणीतून अंधश्रद्धेविरुद्ध देखील बंड पुकारले...

धोंडे मुले देती, नवसा पावती

लग्न का करती ? नारी नर

एवढेच नव्हे तर त्याकाळातील अमानुष प्रथांबद्दल देखील त्या लिहितात...

का हो बाबा, मी तुमची लाडकी

का करिता मला बोडकी ?

कृपया सर्व मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे... धन्यवाद !!

मान्यवर परिचयस्वागत :

[व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा.]

अध्यक्ष श्री / सौ. ............................................

प्रमुख पाहुणे : श्री. / सौ. ..............................

अतिथींच्या आगमनाने झाले

वातावरण प्रसन्न उल्हासित

करुनी उपकृत आम्हा

स्विकारावे आमुचे स्वागत

- गिरीश दारुंटे

[पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे.]

प्रास्ताविक :

सुख दुःखाच्या छायेतून कळते

जसे सार अवघ्या जीवनाचे

आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते

तसे हे महत्व प्रास्ताविकाचे

- गिरीश दारुंटे

आजच्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील श्री. / सौ. ..................... करतील.

व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो...

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही ज्योतिबाच्या लेकी

नका समजू आम्हाला दासी

आम्ही कर्तृत्वाच्या राशी

- कवयित्री मोरवणकर

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्व येथे एकत्रित झालो आहोत. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या खंबीर साथीने रोवली अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये साताऱ्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. तेव्हा बालविवाहाची प्रथा रूढ असल्यामुळे वयाच्या सातव्या वर्षापासूनच सावित्रीबाईंच्या आई-वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरु केले. १८४० साली नऊ वर्षाच्या असताना सावित्रीबाईंचा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. तेव्हा ज्योतीरावांचे वय अवघे तेरा वर्षाचे होते. सावित्रीबाई एका ख्रिश्चन मिशनर्यांनी दिलेले पुस्तक सासरी घेऊन आल्या. ज्योतीरावांना त्यांच्या मावस बहिण सगुणाऊमुळे आधीच शिक्षणाची ओढ होतीच पण त्यांनी आपल्या पत्नीला असलेली शिक्षणाची आवड ओळखून त्यांनाही शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

सावित्रीबाई फुले या भारताच्या आद्यशिक्षिका होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मुल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते स्त्रियांवर बंधने टाकली होती व . समाजव्यवस्थेने ही बंधने बिनदिक्कत स्वीकारले होते, त्याकाळात सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून समाजक्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या. आपले कार्य तडीस नेण्यासाठी त्यांनी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला. मुलीना शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु आपल्या कार्यापासून त्या तसूभरही मागे सरल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेंना जाते.

सावित्रीबाईच्या समकालीन व्यक्तींनी त्यांची चारित्र्यशीलता, गुणसंपन्नता व त्यांच्या करारीपनाची अनेक ठिकाणी नोंद केली आहे. गोविंद गणपत काळे हे ज्योतिबा व सावित्रीबाईस ओळखत होते.

गोविंद काळे भारताच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी लिहितात...... महात्मा ज्योतीराव जे एवढ्या मोठ्या योग्यतेस चढले त्याचे बरेच मोठे श्रेय त्यांच्या सुपत्नीस (सावित्रीबाईस) जाते. राग म्हणून काय चीज आहे ते सावित्रीबाईच्या गावीच नव्हते. ती नेहमी हसतमुख असे. तिचे हसू गालावर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला मोठा आनंद वाटत असे व त्यांच्या करिता ती मोठ्या आवडीने गोड जेवण तयार करीत असे. ती फार ममताळू व दयाळू होती. तिने जन्मास आल्यावर विद्यादानाचे काम तर केलेच परंतु तितकेच अन्नदानही केले. तात्यांना म्हणजे ज्योतीबाना भेटण्यास आलेल्या मंडळीस आग्रहाने जेवावयास लावणे हे जणू तिचे मुख्य काम होते. "

ज्योतीराव सावित्रीबाईस मान देत असत. ते बोलताना सावित्रीबाईस 'आहो व काहो' या बहुमानार्थी शब्दांनी हाक मारीत असत. तर सावित्रीबाई ज्योतीबाना शेटजी या. नावाने हाक मारीत असत.

सावित्रीबाईस प्रसिद्धीचा मुळीच हव्यास नव्हता. लक्ष्मणराव देवराव ठोसर लिहितात..... ज्योतिबा हे कंत्राटदार होते. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळत असत. परंतु ते सर्व पैसे समाजकार्यासाठी खर्च करीत असत. सावित्रीबाई स्वभावाने प्रेमळ व गोड होत्या. त्यांनी ज्योतीबांच्या मृत्युनंतर अत्यंत हलाकीत दिवस काढले. त्याही परिस्थितीत त्यांनी यशवंत या दत्तक पुत्रास डॉक्टर बनविले होते. त्या यशवंतवर फार प्रेम करीत असत. यशवंतरावाचे लग्न त्यांनी सत्यशोधकी मताप्रमाणे लावले होते. या लग्नाचा समाजावर खूप चांगला परिणाम झाला होता. लक्षमण कराडी जाया लिहितात, ज्योतीरावानी त्यांच्या घरी बोर्डिंग काढल्यानंतर आम्ही तिथे शिकावयास गेलो तेव्हा सावित्रीबाई आम्हास मोठ्या प्रेमाने वागवीत. त्यांच्यासारखी प्रेमळ बाई मी अजून सुध्दा कोठे पहिली नाही. मला वाटते, माझ्या आईपेक्षा सुध्दा जास्त प्रेम ती माझ्यावर करीत असे. ती आपल्या आईपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करतात हे बोर्डिंग मधल्या सर्व मुलांना वाटत असे. पुण्यात प्लेगची साथ आली होती. माणसे पटापट मरायची. सावित्रीबाई प्लेगची लागण झालेल्याची सेवा करायला लागली. परंतु त्याच प्लेग मुळे त्या आजारी पडल्या. ज्योतीबा व सावित्रीबाई यांचे दत्तकपुत्र यशवंत फुले हे डॉक्टर होते. प्लेगच्या साथीमध्ये रुग्णाची सेवा करताना त्यालाही प्लेगची लागण झाली. या साथीतच सावित्रीबाई व यशवंताला मृत्यू आला.

सावित्रीबाईचे चारित्र्यसंपन्न व करारीपनाचे जीवन हे आजच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादाई आहे. घरातला कर्ता पुरुष समाजकार्यात गुंतला असताना त्यांच्या खांद्यास खांदा लावून स्वत:लाही समाजकार्यास झोकून देण्याची प्रेरणा भारताच्या या प्रथम शिक्षिकेकडूनच मिळेल यात शंकाच नाही. परंतु त्यासाठी गरज आहे ती सावित्रीबाईचे चारित्र्य वाचण्याची व ते समजून घेण्याची. सावित्रीबाईचे गुण बहुजन व भारतीय स्त्रीमध्ये उतरल्यास नव्या समाजव्यवस्थेची पायाभरणी होण्यास फार वेळ लागणार नाही. सावित्रीबाई ज्या करारीपनामुळे संकटांना सामोरे गेल्या व नव्या युगाची व विचाराची पायाभरणी केली त्या कर्तुत्वामुळेच सावित्रीबाईना बहुजन समाजाच्या मनाच्या कप्प्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

भारतात तत्कालीन काळात म्हणजेच दिडशे वर्षापूर्वी महिलांना शिक्षित करणे किंवा त्यांना ज्ञान देण्यावर बंदी होती. परंतु व्यवस्थेच्या विरुध्द बंड पुकारण्याचे पवित्र कार्य राष्ट्रपिता जोतीराव आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका व समाजसेविका झाल्या. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व साहीत्यीक योगदान खूप मोठे आहे. फुले दांपत्यांनी पुण्यात सुरू केलेली पहिली शाळा ही भारतातील पहिली शाळा म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल.

जेव्हा फुलेनी शाळा सुरू केली त्यावेळेस त्याकाळातील वर्ण व जातभेदी समाजव्यवस्थेला ही शाळा शुद्रांनी सुरू केली असे समजले त्यावेळी त्यांनी सावित्रीबाईला शाळेत जातांना त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकणे, अचरट भाषेचा प्रयोग करणे, निंदानालस्ती करणे असे षडयंत्रकारी प्रकार सुरू केले. परंतु सावित्रिबाईंनी न डगमगता त्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्ये पुढे अविरत चालूच ठेवले.

सावित्री माईंनी थोडेच परंतु अत्यंत परखड लेखन केले आहे. अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करताना सावित्रीमाई लिहितात...

धोंडे मुले देती ! नवसा पावती !!

लग्न का करती । नारी नर !!

केशवपन किती हृदयद्रावक असते त्याचे वर्णन करताना त्या लिहितात...

का हो बाबा, मी तुमची लाडकी ! 

का करिता मला बोडकी ?

अशा या माऊलीने 10 मार्च 1897 आपल्या बहुजन समाजाला आपल्या छत्रछायेपासून पोरके केले. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो.

बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अविरत झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

इतके बोलून मी माझ्या प्रस्ताविकास पूर्णविराम देतो / देते.

विद्यार्थीशिक्षक भाषणे :

[प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत.]

अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :

तेज तुमचे आहे, सूर्य-चंद्राहूनही जास्त

तुमच्या बोलण्यातच आहे, जीवनाचे संपूर्ण शास्त्र

ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून,

कळस गाठू प्रगतीचा

त्यासाठी मान आहे, अध्यक्षीय मार्गदर्शनाचा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. ........ यांनी करून त्यांच्या अनुभावाच्या / ज्ञानाच्या कुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यासमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी व भरभराटीसाठी मार्गदर्शक ठरतील.

मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत... धन्यवाद !!

आभार प्रदर्शन :

माझे सहकारी शिक्षक / शिक्षिका श्री. / सौ. ........ यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन, विद्यार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी ........... विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

ज्ञानकुंभ रिता करुनी

अनमोल प्रेरक ज्ञान दिले 

बोधामृत पाजूनी ज्ञानाचे

आम्हा उपकृत केले

तुम्ही पाठीराखे आमुचे

सदा तुमचाच आधार

मार्गदर्शन असू द्यावे नित्य 

स्विकारुनी हे आभार !!

- गिरीश दारुंटे, मनमाड

आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.

तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो 

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत...

या कार्यक्रमाचे शिल्पकार

तेंव्हा मानलेच पाहिजेत,

त्यांचेही मनपूर्वक आभार

समारोप :

आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेंना जाते. त्यांचे कार्य व त्यांनी घालून दिलेली जीवनतत्वे आपण प्राणपणाने जपुयात हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

कार्यक्रम झाला बहारदार 

भाषणेही झाली जोरदार 

गुरुजनांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

आतिथींच्या येण्याने

कार्यक्रमाला शोभा आली 

आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला 

नवी दिशा मिळाली, शेवटी आता

समारोपाची वेळ आली !!

आजच्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम / राष्ट्रगीताने होईल. सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता होतेय असे मी जाहीर करतो / करते.

!! जय हिंद, जय महाराष्ट्र !!

(कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)

शब्दांकन / निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
सावित्रीबाई फुले भाषणे व्हिडिओ
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

أحدث أقدم