स्वा. सावरकर साहित्य व विचार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारे नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचे लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.
सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हे जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.
सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या, त्या जुलै २०१३ मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि वैशाली सामंत यांनी गायल्या आहेत.
सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट्र, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत. वि. दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
• सावरकरांचे ग्रंथ आणि पुस्तके :
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.
• सावरकरांचे विज्ञानवादी विचार :
सावरकरांचा विशेष गुण हा की ते केवळ विचार मांडून थांबले नाहीत तर त्यांनी ते विचार आयुष्यभर प्रत्यक्ष कृतीत उतरविले. या संदर्भात त्यांचे मृत्युपत्र फार वाचण्यासारखे आहे. ते लिहितात : ' माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत स्मशानात नेले जावे. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंडप्रदान, त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.'
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक