सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द
मराठीप्रेमाचे नुसतेच तुणतुणे वाजवून आपली मराठी मोठी होणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे ओळखले होते. म्हणूनच त्यांनी इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषासमृद्धीचे व्रत घेतले होते. त्यातील अनेक शब्द आज पूर्णपणे मराठमोळे झाले आहेत. सावरकरांच्या या भाषाकर्तृत्त्वाचा घेतलेला वेध...
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ॥
असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. 'यू नो', 'यू सी ' हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. अशा परिस्थितीत, काही राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठीप्रेम जागवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवाय !
संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन, म्हणजेच भाषा का ? तर, नाही. भाषा ही संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते. संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. पण अनेक शतकं मराठी भाषेवर आक्रमणं होत होती. त्या काळात अनेक परकीय शब्द मराठी भाषेत समाविष्ट झाले. हवा, जमीन, वकील, गरीब, सराफ, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, अत्तर, तवा, हे शब्द मराठी नाहीत, ते अरबी आणि फारशी भाषेतून आलेत हे आज सांगितल्याशिवाय अनेकांना कळणारही नाही. या संकरामुळे मराठी भाषा समृद्ध झाली, असं अनेकांना वाटतं. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली, असंच भाषातज्ज्ञही म्हणतात.
पण, सावरकरांना हे मत मान्य नव्हतं. १९२४ मध्ये केसरीतून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. ' परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?', असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, 'ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत.' सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?
आपण बहुधा हयगय करून कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून आपल्या बोलण्यात लिहिण्यात परकीय शब्द वापरतो. ते जितके अधिक वापरले जातात, तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात. पुढे पुढे तर त्या शब्दांवाचून तो अर्थ व्यक् तच होत नाही, असे वाटू लागते. ते परशब्द आपलेच झाले, असे खुळे ममत्व वाटू लागते आणि पर-शब्द आपल्या भाषेच्या हाडीमाशी रुतून बसतात', असं विश्लेषण सावरकरांनी केलंय.
स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं, हे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे, तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे, म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे क हाती घेण्यासारखे नाही का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि अनेक पर -शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते.
आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.
दिनांक (तारीख) क्रमांक (नंबर) बोलपट (टॉकी), नेपथ्य वेशभूषा ● (कॉश्युम), दिग्दर्शक (डायरेक्टर ), चित्रपट (सिनेमा), मध्यंतर (इन्टर्व्हल), उपस्थित (हजर )
प्रतिवृत्त (रिपोर्ट), नगरपालिका (म्युन्सिपाल्टी), महापालिका (कॉर्पोरेशन), महापौर (मेयर), पर्यवेक्षक (सुपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी), त्वर्य / त्वरित (अर्जंट), गणसंख्या (कोरम), स्तंभ (कॉलम), मूल्य (किंमत), शुल्क (फी), हुतात्मा (शहीद), निर्बंध (कायदा), शिरगणती (खानेसुमारी) विशेषांक (खास अंक), सार्वमत (प्लेबिसाइट), झरणी (फाऊन्टनपेन), नभोवाणी (रेडिओ), दूरदर्शन (टेलिव्हिजन), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर), विधिमंडळ (असेम्ब्ली), अर्थसंकल्प (बजेट), क्रीडांगण (ग्राउंड), प्राचार्य (प्रिन्सिपॉल), मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल) प्राध्यापक (प्रोफेसर) परीक्षक (एक्झामिनर), शस्त्रसंधी (सिसफायर), टपाल (पोस्ट) तारण (मॉर्गेज) , संचलन (परेड), गतिमान नेतृत्व (लिडरशीप), सेवानिवृत्त (रिटायर) वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.
लेखक : अमेय गोगटे
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक