होळीचे महत्त्व व विविध रूपे | होळी पौर्णिमा | शिमगा सणाची माहिती | होळी सणाची माहिती | Holi Festival Information

होळीचे महत्त्व विविध रूपे

होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला " होळी पौर्णिमा " असेही संबोधले जाते. होलिकोत्सव धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो. ह्या उत्सवाला " होलिकादहन " किंवा " होळी, " शिमगा", "हुताशनी महोत्सव", " दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो किंवा शिमगा म्हणतात.

फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच 'शिमगा' असा अपभ्रंश तयार झाला असावा.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

होळीचे महत्त्व : होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला ' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी - श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

आख्यायिका : लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. ( एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूनेधाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होत की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला व प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले ) "मदनदहना" च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.

विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक / सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.

आजच्या लोकोत्सवात "होलिकोत्सव" (होळी), "धूलिकोत्सव" धूळवड आणि "रंगोत्सव" रंगपंचमी हे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने "शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.

कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव : फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जून पर्यंत (रोहिणी नक्षत्र ) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात विशेष आनंदात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो याला 'भद्रेचा होम' असे म्हणतात. फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पालख्या पुढचे काही दिवस गावात फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला 'होम' लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फीरत राहतात अशी प्रथा दिसते. पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावले जाते. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेवून त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाते पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी प्रज्वलित केली जाते. होल्टा होम कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या आदल्या दिवशी नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशातच हे खेळ खेळला जातो. मुख्य होळीच्या होमाच्या आदल्या दिवशी मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.

किना-यावरील बंदरांवर होणारा शिमगा : कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुस-या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात.

मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुस-या दिवशी मात्र होडीवर जाण्याचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेवून पारंपरिक वेषात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.

केला पालखी व मुख्य विधी : छोट्या गावचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटा-यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यात फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल ताशाच्या गजरात सहाणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. काही गावांमध्ये देवतेच्या मूर्ती या मानक-याच्या घरात एका पेटीत ठेवलेल्या असतात. शिमगा उत्सवाच्या काळातच या मूर्ती बाहेर काढून उत्सवात पूजन केल्या जातात. गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेवून फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवली जातात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली दिसते. महाप्रसादाचे आयोजन केले जाते. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला 'सान' असे म्हणतात. या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला 'भंग' असे म्हणतात. पालखीतून येणा-या स्त्री देवतांची 'ओटी भरणे' हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.

नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासूर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर केले जातात. ढोल-ताशाचे युवा पथक हे ही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही केली जाते. पारंपरिक वेशभूषा करून हे नृत्य सादर केले जाते. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते. हे काम जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते.

प्रसंगी सुमारे ५० ते ७० फूट उंचीचे, अंदाजे १५ वर्षे वयाचे, आणि सुमारे १२०० ते १५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर पालखीसमोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाट होते. मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट ज्या खड्ड्यात शिल्लक असतो, तोच खड्डा मोठा खणून त्यात होळीसाठी आणलेले झाड उभे करतात व त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते, आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात. हे झाड वाजत-गाजत होमाच्या जागी आणले जाते. त्यापुढेही वेगवेगळ्या लोकनृत्याचे सादरीकरण, वाद्यवादन असा सोहळा साजरा होतो. गावातील युवक या माडाच्या झाडावर चढून मल्लखांब खेळल्यासारखा प्रकारही करतात. होळीच्या ठिकाणी हे झाड आणल्यावर त्याची पूजा होते, होलिकेचे पूजन होते आणि मगच होम पेटविला जातो.

गाऱ्हाणे, खुणा काढणे : कोकणात 'सहाण' नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथ-यासारख्या कौलारु जागेत ठेवल्या जातात. ही सहाण देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत. दुसऱ्या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. तिथे होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून गाऱ्हाणे नावाचा कार्यक्रम होतो, ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक (गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो. तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम पाहण्यासाठीही गर्दी होते.

विविध गावातील प्रथा : रत्नागिरीतील ओठी-नवेठ गावात शिमग्यात 'होलदेव' साजरा होतो. नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो वजनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरूण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात अशी प्रथा आहे. देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडक-यांची होळी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकरींची तिथे वस्ती होती. स्वराज्यातील मावले जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात खेळल्या जातात. होळीच्या दिवसात 'जती' च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलीवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही जोपासली जाते.

समारोप : त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

PDF डाऊनलोड करा.

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

 शहीद दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️ 23-मार्च-शहीद-दिन-भाषण

🎙️ क्रांतिकारक-भगतसिंग-परिचय

🎙️ हुतात्मा-सरदार-भगतसिंग

🎙️ सरदार-भगतसिंग-विचार

🎙️सरदार -भगतसिंग-व-लेनिन

🎙️ सरदार -भगतसिंग-व-गांधीजी

🎙️ शहीद-भगतसिंग-हिंदी-माहिती

🎙️ शहीद-भगतसिंग-इंग्रजी-माहिती

🎙️क्रांतिकारक-सुखदेव-माहिती

🎙️क्रांतिकारक-राजगुरू-माहिती

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم