संपूर्ण गणेशोत्सव | गणेशोत्सव माहिती | Sampurn Ganeshotsav | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

DOWNLOAD PDF HERE

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांच़ा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या लोकजागृती करून घेण्यासाठी या उत्सवाचा प्रभावीपणे अवलंब करण्यात आला महाराष्ट्रात या सार्वजनिक गणेशोत्सवाला खूप मोठी लोकप्रियता लाभली. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांच़े आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच़े आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साज़रा करण्यात येतो.

गणपतीची जन्मकथा :

एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकर्‍याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्‍याचे शिरच उडवले. पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकर्‍याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात.

गाणपत्य संप्रदायाचे व्रत :

गणेशोत्सवाचे मूळ हे गाणपत्य संप्रदायाच्या व्रतामध्ये आहे. या व्रतामध्ये श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या काळात उपासकाने रोज सकाळी नदीवर जावे. स्नान-संध्या करून नदीच्या काठावरील माती घेऊन आपल्या तळहातावर त्या मातीची गणेशाची आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मूर्ती तयार करावी.त्या मूर्तीचे सोळा उपचारांनी पूजन करावे आणि लगेच ती मूर्ती नदीत विसर्जन करावी असे हे व्रत आहे. महिनाभर हे व्रत करणे शक्य नसल्याने कालांतराने व्रताच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला हे व्रत केले जाते. या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा महासिद्धीविनायकी चतुर्थी असे म्हटले जाते.

गणपतीची मूर्ती :

पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात असत. कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरीस पासून मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे आणि त्यांना लावलेल्या रंगामुळे अशा मूर्तींच्या विसर्जनानंतर होणारे जलाशयांचे प्रदूषण लक्षात घेता अनेक जलाशयांमध्ये मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गणपतीची मूर्ती दान करण्याचे अभियान राबवण्यात येते. अलिकडच्या काळात पर्यावरण स्नेही शाडूच्या मूर्ती बनवण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक शाळांमध्ये आणि अनेक संस्थातर्फे शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात.

समर्थ रामदास आणि गणेश :

सुखकर्ता दुःखहर्ता...... ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हटली जाते.ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे. प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

समर्थे सुंदरमठी गणपती केला !

दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!

सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !

भाद्रपद माघ पर्यंत समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले. दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे ही बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी ही वार्ता त्यांच्या कानावर टाकली. त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुती करून ही प्रार्थना केली. तीच ही गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.

वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे. याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो. त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो. तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु.४ ते माघ शु.५ गणेश जयंती पर्यंत पाच महिने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली. त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो...

समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी

भिक्षा मागो धाडिली !

शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!

आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !

हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया !!

घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना :

११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महिने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना खालील ओळींत केलेली आहे…. 

दास रामाचा वाट पाहे सदना !

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!

शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे महाराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होईपर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्याकरीता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.

लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव :

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे की स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नांसाठी लोकांनी एकत्र यायला हवे. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला आणि त्यातून करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का ? " त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा.

१८९३ च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. गणेश चतुर्थी ला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व काळात जनजागृती, लोक संघटन, लोकसंग्रह या कारणांसाठी होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे स्वरूप बदलले आहे. लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, ते पुणे शहरातून. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले. टिळक यांनी दैनिक केसरीमध्ये पहिल्या गणेशोत्सवानंतर लिहिलेल्या अग्रलेखात त्या काळच्या वातावरणाचा उल्लेख केला आहे.

महत्व नैवेद्याचे - मोदकाचे

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीतील उत्साही तरुणांनी १८९२ साली मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव व समाजप्रबोधनाचे कार्य तिथे होऊ लागले. केशव नाईकांच्या चाळींचा आदर्श ठेवून मुंबईतील त्या काळातील अनेक चाळींनी, वाड्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली.देवघरातील गणपती सार्वजनिक गणेशोत्सव स्वरूपात घराबाहेर आणला हे एक क्रांतिकारी पाऊल होते असे तज्ञांचे मत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक प्रकारे साजरा केला जातो.

व्याख्यानमाला आयोजित करून तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळवून देणे

पौराणिक देखावे बनवून जनतेला संदेश देणे

जिवंत देखावे दाखवून जनतेला संदेश देणे

विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून जनतेचे मनोरंजन करणे

समाजविधायक कामे करणे

अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्‍न चालू केले. ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला, अशा शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना एक आदर्श व्यक्ती दिसली. याचा फायदा करून घेऊन टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीजयंतीची सुरुवात तर केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशभरात, विशेषतः बंगालमध्ये शिवाजीजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला.परंतु नंतरच्या काळात गणेश उत्सवाला वेगळेच रूप आले.

पुण्यातील गणेश विसर्जन उत्सवाचा इतिहास :

पेशवे काळात शनिवारवाड्यात गणेशोत्सव केला जात असे. त्याची मिरवणूक निघत असे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुण्यात लोकांची गर्दी होत असे. आजही विसर्जन मिरवणुकीचा उत्साह कमी झालेला नाही. सन १८९३ पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. पुण्यातील या गणपती विसर्जन मिरवणुकांचा इतिहास मंदार लवाटे यांनी ‘पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षांचा’ हा पुस्तकात दिला आहे. विसर्जन मिरवणुकीसंबंधीची दुर्मीळ छायाचित्रे आणि मिरवणुकीसंदर्भात घडलेल्या विविध घटनांची माहिती पुस्तकात आहे. पुण्याखेरीज महाराष्ट्रातही तसेच मुंबई इ. शहरातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

أحدث أقدم