क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहिले. घरची परिस्थिती चांगली असतानादेखील युवावस्थेपासून ते देशसेवेसाठी सक्रिय झाले. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी अनेक वेळा कारावास भोगला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरदेखील जनसेवेसाठी आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन, त्यांनी स्वतःचा संसार मांडला नाही; पण अनेकांचे संसार मार्गी लावून ते सुखी केले. क्रांतिवीर नाईकांचे जीवन धकाधकीचे, धावपळीचे गेले. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांनी दीन दुबळे, कामगार, मजूर आणि शेतकरी बांधवांसाठी अविश्रांत धडपड केली. समाजातील उपेक्षित व कामगारांच्या सुखासाठी व कल्याणासाठी त्यांचे संसार उभे करण्यासाठी आयुष्याची बाजी लावणाऱ्या क्रांतिवीरांनी स्वतःच्या सुखाचा कधी विचार केला नाही.
21 नोव्हेंबर १९१2 रोजी मनमाड येथे एका सुसंस्कृत व श्रीमंत कुटुंबात वसंतरावांचा जन्म झाला. मुळचे वेहेळगाव येथील रहिवासी असलेले वसंतरावांचे वडील नारायणराव नाईक हे एक नावाजलेले सावकार व जमीनदार होते. तर आई उमाबाई या मुंबईतील. त्यामुळे सुसंस्कृत विचार, स्वाभिमान आणि देशभक्तीचे बाळकडू त्यांना मिळाले. आईच्या शिकवणीमुळे वसंतरावांच्या मनात देशभक्तीची बीजे पेरली गेली. मुळातच हुशार असलेल्या वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण मनमाडमध्ये, माध्यमिक शिक्षण नाशिकला आणि पुढील शिक्षण मुंबईत झाले. पुढे ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. देशभक्त राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची मैत्री झाली. या तिन देशभक्तांना फाशी देण्यात आली, त्या घटनेचा वसंतरावांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यातून त्यांच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण झाला व त्यांनी स्वत:ला स्वतंत्र्य लढ्यात झोकून दिले. ३ फेब्रुवारी १९२७ला त्यांनी म. गांधींच्या नेतृत्त्वाखालील ‘सायमन परत जा’ आंदोलनात स्वतःला झोकून दिले. ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध आवाज उठवणारे व तुरुंगवासाची पर्वा न करणारे वसंतराव पुढे १९३०ला मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले. त्यावेळी त्यांना सहा महिने तुरुंगवास झाला. त्यानंतरही अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला, तरीही ते कधी खचले नाही.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही ते शांत बसले नाहीत. समाजातील दलित, पीडित, कामगार व शेतकऱ्यांसाठी त्यांनी जिवाचे रान केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सातत्याने वाढत होता. जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना असलेली तळमळ लक्षात घेऊन मनमाडकरांनी त्यांना नगराध्यक्ष बनविले. या पदाचा वापर त्यांनी विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी केला. पदापेक्षा त्यांनी नेहमीच जनसेवा महत्त्वाची मानली. मनमाडचे नगराध्यक्ष असतानाच बिहारमध्ये झालेल्या भूकंपावेळी वसंतरावांनी पदाचा राजीनामा देऊन थेट बिहार गाठले व तेथील लोकांना मदतीचा हात दिला. त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणा, मुझमपुर याठिकाणी जनतेची सेवा केली.शेतकरी कुटूंबात जन्मल्यामुळे त्यांना शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांची आणि दुःखाची जाणीव होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अखिल भारतीय किसान परिषदेच्या माध्यमातून पायी यात्रा काढली. शेतकऱ्यांच्या पिळवणूकीविरूद्ध आवाज उठवून शेतकरी संघटित करण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी सर्व कामगारांचे हित जोपासण्यासाठी महाराष्ट्र इंडियन नॅशनल, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार फेडरेशन आणि कामगार संघटना स्थापन केल्या. त्या माध्यामातून कष्टकरी व कामगारांचे प्रश्न तळमळीने सोडवले. नंतरच्या काळात ते मुंबई विधानसभेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले. त्यावेळीही त्यांनी सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणूनच काम केले. पुढे १९६२ व १९६७ मध्येही ते पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी खेड्या-पाड्यात शिक्षणाचा प्रसार, गाव तिथे एसटी बस सेवा यासारखी अनेक कामे केली. त्यामुळे एक सच्चा राष्ट्र भक्त, आदर्श समाजसेवक, वैचारिक नीतिमूल्य जोपासणारे, अत्यंत प्रेमळ, मनमिळावू व प्रचंड लोकसंग्रह असलेला हा नेता खऱ्या अर्थाने कर्मयोगी ठरला. १४ डिसेंबर १९६८ ला भुसावळ येथे वीज मंडळाच्या बैठकीसाठी जात असतानाच हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत मालवली. तेव्हापासून हा दिवस उभ्या महाराष्ट्रात स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक