दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी 800 ते 1000 वर्षांचा कालावधी लागतो.
मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश त्यामागं आहे.
दरवर्षी मृदा दिवस साजरा करताना एक वेगळी थीम तयार केली जाते आणि वर्षभर त्या आधारे मृदा संवर्धनासाठी जागरुकता केली जाते. या वर्षीच्या मृदा दिवसाची थीम आहे “Keep soil alive, protect soil biodiversity” म्हणजे मृदेला जिवंत ठेवा, मृदेच्या जैवविविधतेचे संरक्षण करा.
रासायनिक खते आणि किटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे, मातीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम जगातील अनेक देशांच्या अन्नसुरक्षेवर झाल्याचं दिसून आलंय.
भारतातही मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी भारत सरकारतर्फे 2015 साली सॉइल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मृदेचे स्वास्थ्य टिकवणे, शेतीच्या शाश्वत विकास करणे आणि त्याद्वारे अन्नसुरक्षा करणे हा उद्देश आहे.
मृदेचं महत्व : मृदेचं संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांचं संरक्षण असाच अर्थ होतोय. जगातील 95 टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येतं. तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी 25 टक्के सजीव आसरा घेतात. फळे, भाज्या आणि अन्नधान्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरुन ठरते. सध्या या मृदेच्या संवर्धनासमोर वातावरण बदलाचं मोठं आव्हान उभं आहे.
मृदा प्रदूषण टाळायचं असेल तर काय करावं? :
अलिकडे मोठ्या प्रमाणावर मृदेचं प्रदूषण होताना दिसतंय. ते टाळायचं असेल तर काही पाऊलं उचलली पाहिजेत. प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे. त्या ठिकाणी पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करायला हवा. आपल्या वाया जाणाऱ्या खाद्य पदार्थांचं रुपांतर कंपोस्ट खतात करायला हवं.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/