माणसाच्या शरीरात सुमारे ६३ टक्के पाणी व ५ टक्के मेदपदार्थ असतात. मेदपदार्थाची घनता पाण्याहून कमी असते. त्यामुळे सामान्यपणे पाण्यावर तरंगण्याकडे आपल्या शरीराचा कल असतो. पाण्यात पडल्यावर माणूस त्याच्या वजनाने बुडतो; पण नंतर परत पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. यात त्याच्या शरीराची तरंगण्याची प्रवृत्ती व हातापायांच्या हालचाली या दोहोंचा वाटा असतो. पृष्ठभागावर आलेला माणूस श्वास घेण्याचा प्रयत्न करतो व त्या प्रयत्नात नाका-तोंडात पाणी जाते. पोहता न येणारा माणूस या अवस्थेत फुफ्फुसात पाणी जावून, श्वास बंद होऊन मरतो.
मेल्यानंतर त्याच्या शरीरात (म्हणजे जठर, फुफ्फुस इत्यादी भागात) पाणी शिरते. पाण्यात राहिल्याने त्याच्या शरीरावर परिणाम होतो. कुजण्याची प्रक्रिया चालू होते. शरीरातील सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊ लागते. यात पाण्यातील मासे, इतर जीव, सूक्ष्म जीवजंतू यांचाही हातभार लागतो. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे बुडून मेलेल्या व्यक्तीचे प्रेत फुगलेले दिसते व शरीरात कुजण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या वायूंमुळे प्रेत पाण्यावर तरंगू लागते.
डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन