१०. प्राचीन भारत : सांस्कृतिक
१०.१ भाषा आणि साहित्य
१०.२ लोकजीवन
१०.३ विज्ञान
१०.४ शिक्षणाची केंद्र
१०.५ स्थापत्य आणि कला
१०.१ भाषा आणि साहित्य :
प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्यनिर्मिती झाली. त्यांमध्ये धार्मिक साहित्य, व्याकरणग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथासाहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे.
संघम साहित्य संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य 'संघम साहित्य' म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वांत प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील सिलप्पधिकरम' आणि 'मणीमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. संघम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते.
धार्मिक साहित्य : यामध्ये आगमग्रंथ, तिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.
'जैन आगमग्रंथ' अर्धमागधी, शौरसेनी आणि माहाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगमग्रंथांमध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने 'सम्मइसुत्त' हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमलसूरींनीं 'पउमचरिय' या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्रसूरींचा 'समराइच्चकहा' व उदयोतनसूरींचा 'कुवलयमालाकहा' हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत.
माहीत आहे का तुम्हांला ?
उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या असे मानले जाते. प्राकृत हा शब्द 'प्रकृत' या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिक, प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शौरसेनी, मागधी आणि माहाराष्ट्री अशा चार गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. माहाराष्ट्रीपासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले. त्यांना 'अपभ्रंश भाषा' असे म्हटले गेले. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या.
तिपिटकामध्ये तीन पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी या ठिकाणी त्याचा अर्थ 'विभाग' असा आहे. तिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहे. यात १. 'सुत्तपिटक' : यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. या वचनांना सूक्ते म्हणतात. २. विनयपिटक' येथे 'विनय' या शब्दाचा 'नियम' असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. ३. 'अभिधम्मपिटक' : यात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहे. तिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा 'अठ्ठकथा' (अर्थकथा) नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या 'थेरीगाथा' या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. त्या गाथा पाली भाषेत आहेत.
'भगवद्गीता' हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे, असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, असे त्यात सांगितले आहे.
इसवी सनाच्या आठव्या शतकात आय शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. 'उपनिषदे', 'ब्रह्मसूत्रे' आणि 'भगवद्गीता' या ग्रंथांवर भाष्ये लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या चार दिशांना बद्रिनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी चार मठांची स्थापना केली आहे.
अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासनव्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे.
व्याकरणग्रंथ 'पाणिनि' या व्याकरणकाराने लिहिलेला 'अष्टाध्यायी' हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाणग्रंथ मानला जातो. पतंजलीने 'महाभाष्य' ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या 'अष्टाध्यायी' या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे.
माहीत आहे का तुम्हांला ?
अर्थशास्त्र : अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे | प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची, दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासनविषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे.
आर्ष आणि अभिजात महाकाव्ये : 'रामायण' आणि 'महाभारत' ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्ये आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. 'रामायण' हे महाकाव्य 'वाल्मीकी' ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. 'महाभारत' हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते.
भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो, की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची 'रघुवंश' आणि 'कुमारसंभव' तसेच भारवीचे 'किरातार्जुनीय' आणि माघाचे 'शिशुपालवध' ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत.
नाटक गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा 'नाट्यशास्त्र' या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे 'स्वप्नवासवदत्त', कालिदासाचे 'अभिज्ञानशाकुंतल' यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत.
कथासाहित्य : प्राचीन काळी भारतामध्ये कथासाहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांचा 'पैशाची नावाच्या भाषेतील 'बृहत्कथा' हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णुशर्मा नावाच्या पंडिताने रचलेला 'पंचतंत्र' हा ग्रंथ कथासाहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातककथाही विख्यात आहेत.
करून पहा...
पंचतंत्रातील एखादी कथा मिळवून त्याचे नाट्यीकरण करा.
१०.२ लोकजीवन : प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना 'श्रेणी' असे म्हणत. सागरी आणि खुश्कीच्या मार्गांनी व्यापार चालत असे. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ, तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत. तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरात होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साड़ी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला.
१०.३ विज्ञान वैद्यकशास्त्र : भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद' असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. 'चरकसंहिता' ग्रंथात वैदयकीय या चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला. सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या 'सुश्रुतसंहिता' या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यांवरील उपाय यांची माहिती आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यांवरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव 'किताब-इ-सुसुद' असे होते. वाग्भटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यांतील 'अष्टांगसंग्रह' आणि 'अष्टांगहृदयसंहिता' हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या 'रसरत्नाकर' या ग्रंथात रसायने आणि धातू यांसंबंधीची माहिती आहे.
गणित आणि खगोलशास्त्र प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. १ ते ९ आणि '०' (शून्य) या संख्यांचा ९ वापर भारतीयांनी प्रथम केला. एकं, दहं अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट नावाच्या शास्त्रज्ञाने 'आर्यभटीय' हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने 'पंचसिद्धान्तिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धान्ताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतींमधील खगोलशास्त्रीय सिद्धान्तांचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणितज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले.
माहीत आहे का तुम्हांला ?
कणाद : कणादाने 'वैशेषिक दर्शन' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कणादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात, पण अणू मात्र अक्षय राहतात.
१०.४ शिक्षणाची केंद्रे : प्राचीन शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशांतूनही विदयार्थी येत असत.
तक्षशिला विद्यापीठ तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्याच्या आधारे ते इ.स.पू. सहाव्या शतकात वसवले गेले, असे दिसते. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैदय तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इ.स.पू. चौथ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैदय हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विदयार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चिनी बौद्ध भिक्खू फाहियान इ.स. ४००च्या सुमारास भारतात आला होता. त्या वेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई.
वाराणसी : वरणा आणि असी या गंगेच्या दोन उपनद्या आहेत. या दोन नदयांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती.
वलभी गुजरातमधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या पाचव्या ते आठव्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन श्वांग आणि इत्सिंग या चिनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती.
नालंदा विद्यापीठ : आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदारहस्ते देणग्या दिल होत्या. युआन श्वांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विदयार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विदयार्थ्यांना परीक्षा दयावी लागे.
विक्रमशीला विद्यापीठ विक्रमशीला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकात केली. तिथे सहा विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.
कांची पल्लव राजसत्तेच्या काळात (इ.स.) ६वे शतक) आजच्या तमिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई.
१०.५ स्थापत्य आणि कला :
मौर्य आणि गुप्तकाळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली, असे दिसते. गुप्तकाळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलिपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्यमूर्ती बनवण्यास सुरुवात झाली होती. दिल्लीजवळ मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते, ते समजते.
प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती, हे आपण पाहिले. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतींशी आलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम यांचा परिचय करून घेणार आहोत.