बाबासाहेबांचे अनमोल विचार | भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषणे | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती | 14 एप्रिल भाषणे | Dr. Babasaheb Ambedkar Bhashane | Dr. Babasaheb Ambedkar Mahiti

बाबासाहेबांचे अनमोल विचार १

बाबासाहेबांचे अनमोल विचार २


"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिणार, तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही." 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
"शिक्षणाची भीमगर्जना" करतांना शिक्षणाचं महत्व बाबासाहेबांनी अतिशय उत्तम रित्या सांगीतलं आहे. खडतर जीवन जगत असताना त्यांना आलेल्या अनुभवातूनच शिक्षणाला किती महत्व आहे हे त्यांना समजत गेलं असेल. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, माणसाचे विचार समृद्ध होतात. शिक्षण हे समाजात बदल घडविण्याचे एक प्रभावी शस्त्र बनू शकते. शिक्षण माणसाला कर्तव्य आणि हक्कांची जाणीव करून देते. उच्चशिक्षित व्यक्ती बुद्धीने सशक्त होत जातो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. इतरांप्रती आदर, विनयभाव आणि क्षमाभाव हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे. शाळेत जाणा-या मुलांना नुसती बाराखडी शिकवून उपयोग नाही तर बाराखडी सोबत मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय झाली पाहिजेत आणि समाजाच्या हितासाठी या शिक्षण समृद्ध मुलांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. शाळा म्हणजे उत्तम आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याची जाणीव देखील या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या शिक्षकांनी मनात घ्यावे. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारे हेच खरे शिक्षण आहे असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते.
आज शिक्षण क्षेत्रात इतके प्रभावी प्रयत्नशील आणि गुणवत्तायुक्त शिक्षक आहेत की असं वाटत प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचं बाबासाहेबांच स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहाणार नाही. आज आपल्या सभोवताली अनेक शाळेत प्रभावी शिक्षक आहेत. अनेक शिक्षक बांधवांनी त्याची शाळा इतकी सुंदर बनविली आहे आणि सुंदर शाळेसोबत तिथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता इतकी वाढली आहे की प्रत्येक विद्यार्थी प्रभाव पाडून जातो. या देशाचं भवितव्य असणारी पीढी हे शिक्षक प्राथमिक शाळेत तयार होताना दिसत आहे. बाबासाहेबांच्या विचारानुसार शिक्षण हे जर वाघिणीच दूध असेल तर आज हे गुणवत्तायुक्त शिक्षक तळागाळातल्या मुलांपर्यंत हे वाघिणीच दूध पोहोचविण्याचं उत्कृष्ठ काम करत आहेत. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मूळमंत्र देताना सुद्धा बाबासाहेबांनी शिक्षणाला आधी महत्व दिलं आहे. शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण प्रक्रिया हे सर्वच घटक इतके सक्षम बनले पाहिजेत की स्पृश्य अस्पृश्य ही भावनाच दूर लोटून दैदीप्यमान समाजनिर्मिती झाली पाहिजे. हेच बाबासाहेबांच ध्येय होत आणि आहे.
पूर्वीच्या काळी जातीय विषमता हा आपल्या देशातील समाजव्यवस्थेचा आधार होता हे सर्वांनाच माहित आहे. पण आज शिक्षणामूळे जातीय विषमता नष्ट होताना दिसून येत आहे. आज प्रत्येक जाती-जमातीतील आपले बांधव व भगिनी IAS, IPS, IRS म्हणून आपले नाव समाजमनात कोरत आहेत. आज बारा बलुतेदार जाती प्रक्रिया नष्ट होऊन तुमच शिक्षण, तुमचा व्यवसाय, तुमच सामाजिक कामच तुमची जात व ओळख बनत चालली आहे ही सर्व भारतीयांसाठी चांगली गोष्ट आहे. पण हा बदल फक्त आणि फक्त सर्वांना दिलेल्या समानशिक्षणाच्या हक्कामूळेच घडतोय आणि याची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या अनेक महान नेत्यांनी केलीय हे देखील विसरून चालणार नाही. या महान नेत्यांनी दिलेली प्रेरणाशक्ती आज कोणालाच शिक्षणापासून वंचित ठेवत नाही. परिणामी आता जातीय समाजव्यवस्था बदलून शिक्षणावर आधारित अशी सामाजिक व्यवस्था बनत चालली आहे. आणि याचा परिणाम आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगल्भ ज्ञानसाधनेकडे पाहता हे लक्षात येते की त्यामुळेच ते स्वत: उत्कृष्ट शिक्षक व पुढे व्यापक अर्थाने समाजशिक्षक होऊ शकले. त्यांच्या विचारांची आणि मूल्यांची आठवण प्रकर्षाने होते. परंतु त्यांना अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन अजूनही ख-या अर्थाने झालेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळाप्रवेश दिनानिमित्ताने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक परिवर्तनाद्वारे समतेचा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त व्हायला हवा. अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी आहेत. त्यांच्या प्रभावी विचारांचा उपयोग जर आज शैक्षणिक समाजनिर्मितीत झाला तर नक्कीच समाजपरिवर्तन घडून येईल. यासाठी सर्वांनी ही
" शिक्षणाची भीमगर्जना " लक्षात ठेवली पाहिजे.
"शिका ! संघटीत व्हा! संघर्ष करा!"
"शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.”
"शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे."
"सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे."
"अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही."
"काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
"मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते."
"जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतो, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो."
"जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो."
"माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची."
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------------

🇪🇺 इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

أحدث أقدم