भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (Srinivasa Ramanujan) यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी २२ डिसेंबर हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. २०१२ साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस 'राष्ट्रीय गणित दिवस' (National Mathematics Day) म्हणून जाहीर केला.
    श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी कोइम्बतूरच्या इरोड गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमलताम्मल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगार होते. त्याच्या जन्मानंतर, संपूर्ण कुटुंब कुंभकोणममध्ये गेले, जेथे त्यांचे वडील श्रीनिवास यांनी एका कपड्याच्या दुकानात काम करण्यास सुरवात केली.
    सुरुवातीला रामानुजन अगदी सामान्य मुलासारखेच होते. त्यांना वयाच्या तीन वर्षांपर्यंत होईपर्यंत बोलताही येत नव्हते. शाळेत शिकवण्याची पद्धत त्यांना बिल्कुल आवडायची नाही. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने प्राथमिक परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी 'ए सिनोप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्योर अँड एप्लाइड मॅथेमॅटिक्स' नावाचे एक खूप जुने पुस्तक अक्षरश: कोळून प्यायले. या पुस्तकात हजारो प्रमेये होती. पुढे त्यांच्या कौशल्यांसाठी त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली.
    रामानुजन यांचे मन फक्त गणितात रमायचे. त्यांनी इतर विषयांकडे लक्ष दिले नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना प्रथम शासकीय महाविद्यालय व नंतर मद्रास विद्यापीठाची शिष्यवृत्ती गमवावी लागली. हे सर्व असूनही त्यांचे मॅथ्सशी असलेले आकर्षण अजिबात कमी झाले नाही. १९११ मध्ये त्यांचा जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीमध्ये १७ पानांचा एक पेपर प्रकाशित झाला. १९१२ मध्ये रामानुजन यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली, पण तोपर्यंत त्यांना एक हुशार गणितज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती.
    त्याचवेळी रामानुजन यांना त्या काळातील जगप्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ जी.एच. हार्डी यांच्या कार्याविषयी माहिती मिळू लागली. १९१३ मध्ये रामानुजन यांनी आपली काही कामे हार्डी यांना पत्राद्वारे पाठविली. हार्डी यांनी सुरुवातीला ही पत्रे गांभीर्याने घेतली नाहीत, परंतु लवकरच त्यांना त्यांची प्रतिभा लक्षात आली. हार्डी यांनी रामानुजन यांना प्रथम मद्रास विद्यापीठात आणि नंतर केंब्रिजमध्ये शिष्यवृत्ती मिळण्यास मदत केली. त्यांनी रामानुजन यांना केंब्रिजला बोलावले. हार्डी यांच्या मार्गदर्शनात रामानुजन यांनी स्वत: चे २० संशोधन पेपर्स प्रकाशित केले. १९१६ मध्ये रामानुजन यांनी केंब्रिज येथून विज्ञान पदवी प्राप्त केली आणि १९१८ मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.
    भारतावर त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. अशा वेळी रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळवणे कोणत्याही भारतीयासाठी मोठी गोष्ट होती. रॉयल सोसायटीच्या संपूर्ण इतिहासामध्ये, रामानुजन यांच्या वयाचा सदस्य आतापर्यंत झालेला नाही. रॉयल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे पहिले भारतीयही ठरले.
    रामानुजन कष्ट करत होते. ब्रिटनचे थंड व ओलसर हवामान त्याला अनुकूल नव्हते. १९१७ मध्ये त्यांना टीबी झाला होता. त्यातच त्यांची प्रकृती खालावली आणि ते भारतात परतले. २६ एप्रिल १९२० रोजी ३२ वर्षी त्यांचे निधन झाले. आजारपणातही त्यांनी गणिताशी नातं तोडलं नाही. ते पलंगावर पडल्या पडल्या प्रमेय लिहायचे. विचारल्यावर ते म्हणायचे की प्रमेय स्वप्नात आले आहे.
    रामानुजन यांनी बनवलेले असे बरेच प्रमेय आहेत जे आजही एखाद्या न सुटलेल्या कोड्यासारखे आहेत. त्याचे अनेक जुने फार्म्युले असलेले एक जुने रजिस्टर १९७६ मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या लायब्ररीत सापडले होते. त्यात बरीच प्रमेये आणि सूत्रे होती. या रजिस्टरचे प्रमेय आजपर्यंत सोडलेले नाही. हे रजिस्टर 'रामानुजनचे नोटबुक' म्हणून ओळखले जाते.
स्त्रोत : आंतरजाल
संकलक : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
أحدث أقدم