सावित्रीचा वसा...
हा सावित्रीचा वसा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?.....॥धृ॥
सावित्री पोरीसारखी पोर होती,
सावित्री बाईसारखी बाई होती.
जेंव्हा रोग कळला,
रोगावरचा विलाज कळला,
तेंव्हा सावित्री दाई झाली,
तेंव्हा सावित्री आई झाली.
एकूणच सगळा प्रकार असा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?.... ॥१॥
चार भिंतीतला संसार
सावित्रीलाही करता आला असता.
‘ हम दो , हमारा एक ‘ चा हट्ट
सावित्रीलाही धरता आला असता.
सत्यवादी सावित्री सरळ असली तरी
कर्मठ आणि दांभिकांच्या
गळ्यातला फासा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?.....॥२॥
ना शिकता सवरताही
संसाराची गाडी धकली असती.
सासर नावाच्या आभाळाला
सावित्री कशाला मुकली असती ?
सावित्रीने केलेला विचार
आपण कशाला करू शकतो ?
कारण तुमच्या आमच्या डोक्यात
भरलेला भुसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?..... ॥३॥
घरात उभी गेलेली सावित्री
वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली.
ज्योतीबा नावाच्या योद्ध्याची
सावित्री वेळोवेळी ढाल झाली.
ती शिक्षणाचे दान देत राहिली,
ओढावून घेता येईल तेवढा दोष
ओढाऊन घेत राहिली.
आपला मात्र सदैवच
पसरलेला पसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?..... ॥४॥
दगडाला भ्याली नाही,
शिव्या-शापालाही भ्याली नाही.
सावित्री नावाचे वाघिण
शेळी कधीच झाली नाही.
तुम्ही आम्ही शेळपट
सावित्री मात्र वाघिण होती,
कारण ज्योतीबाच तसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?..... ॥५॥
सावित्रीलाही नटता आले असते,
सावित्रीलाही मुरडता आले असते.
अव्यवहारी नवरा म्हणून
ज्योतीबाला खरडता आले असते.
लष्कराच्या भाकर्या कशाला भाजता ?
असे ओरडता आले असते.
पण सावित्रीचा धर्म
सांगा कुठे तसा आहे ?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?..... ॥६॥
सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची
शिक्षण हीच चावी होती.
ज्योतीबांना सावित्री मिळाली,
त्यांना जशी हवी होती.
सावित्री उर्जेची जन्मदात्री होती,
सावित्री कवयित्री होती.
आपला जोडा आहे का?
सावित्री-ज्योतीबाचा जसा आहे ?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?..... ॥७॥
सावित्री ज्योतीबांच्या सत्यधर्माची
जित्ता-जागता आरसा होती.
सावित्री ज्योतींच्या सत्यधर्माचा
जित्ता-जागता वारसा होती.
सावित्रीने दिलेली ललकार
आपल्याला देता येईल ?
कारण सावित्रीचा तो कंठ,
आपला तो घसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?..... ॥८॥
तुमची आमची परीक्षा
सद्यस्थिती पाहते आहे.
ज्योतीबा आणि सावित्री
नसा-नसातून वाहते आहे.
ते हे बोलू शकत नाहीत
ते हे पेलू शकत नाहीत
ते संकटांना झेलू शकत नाहीत,
ज्यांच्या अंगोपांगी ससा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’ सत्यधर्म ’ कसा आहे ?..... ॥९॥
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय....
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल , मला काय माहित ?
मला कुठे पुढचे दिसले होते ?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप ,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय ?
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्या कानी
हे गार्हाणे घालतेय.
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
माय मावल्यांनो , लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की ,
पुरोगामी होता येते ,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मान नको , पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनून हे अंजन घालतेय...
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
तुम्हांला आज
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’ यशवंत ’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे ,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी सत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी. आर. निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.
ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो , तुम्हांला बोलतेय....
होय , मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...
सखे, सावित्री...(वात्रटिका)
आम्ही सावि्त्रीच्या लेकी,
पूजा वडाची करीतो.
गर्भातल्या लेकी आम्ही
गर्भातच मारीतो.
सखे , सावित्री... सांग,
तुझा असा कसा बाई वसा ?
आमच्या रक्तातला अंधार
सांग जात नाही कसा ?
आम्ही सावित्री होणार...
आम्ही जिजाऊ होणार....
आम्ही सावित्री होणार... आम्ही जिजाऊ होणार...
आमच्या आयुष्याला , आमच्या भविष्याला नवा
आकार देणार ।।धृ।।
हिरकणीची, झाशीच्या राणीची, आम्ही घोषणा
देणार
राणी अहिल्यादेवीची, आम्ही किर्ती गाणार ।।१।।
जगदंबेची, महदंबेची, आम्ही लिळा गाणार
मिरेच्या भक्तीची, राधेच्या शक्तीची आम्ही पूजा
बांधणार ।।२।।
मुक्ताईचा, श्यामच्या आईचा, आम्ही वसा घेणार
जनाबाईच्या अभंगाला नवा अर्थ देणार ।।३।।
आण रमाईची, जाण भिमाईची, पुढे पुढेच नेणार
तारा आईची, बहिणाबाईची आम्ही भाषा
बोलणार ।।४।।
नव्या आकाशाला, नव्या प्रकाशला आमची
' कल्पना ' येणार
मायेची पाखर, तोंडी साखर, ' मदर ' घालणार ।।५।।
हाती क्रांतीची, हाती शांतीची, आम्ही मशाल घेणार
स्त्रीमुक्तीचे , स्त्रीशक्तीचे आम्ही गाणे गाणार ।।६।।
* साभार *
कवी श्री. सुर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
रचनाकार हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कवी, वात्रटिकाकार व व्याख्याते आहेत.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉