सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम...!!
मुजरा माझा राजमाता जिजाऊंना
दिधले स्वराज्याला शिवछत्रपती
कैक वर्षांच्या पाशवी अत्याचाराला
माँसाहेब तुम्हीच दिधली मूठमाती !
गर्भावस्थेतच ज्या माऊलीने घोड्यावर स्वार होवून सह्याद्रीच्या कडेकपारीत घोंघावणारा सुसाट वारा सोसण्याचे संस्कार आपल्या गर्भावर केले, अन या स्वराज्याला स्वराज्याचे पहिले छत्रपती दिले, त्या जगवंदनीय माऊली म्हणजेच राजमाता जिजाबाई शहाजी भोसले अर्थातच आऊसाहेब...!!
साक्षात भवानी मातेचे दुसरे रूप म्हणजे... जिजाऊ !!
शिवरायांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पाडणाऱ्या राजमाता म्हणजे... जिजाऊ !!
स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या आऊसाहेब म्हणजेच... जिजाऊ !!
जिजाऊंच्या प्रेरक व स्फूर्तीदायक स्मृतींना त्रिवार मनाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी श्री. / सौ. .............................. मनपूर्वक स्वागत करतो / करते.
!! अध्यक्षीय निवड !!
ज्यांची उपस्थिती वाढविते
आजच्या कार्यक्रमाची शान
स्विकारुनी आमुची विनंती
आपण भुषवावे अध्यक्षस्थान
विद्यार्थी मित्रांनो योजीलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेले / असलेल्या व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या श्री. / सौ. ............................ यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
( सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे )
!! दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन !!
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.
सुमंगल ह्या वातावरणात
समईच्या उजळल्या वाती
मान्यवरांनी शुभहस्ते
प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती
( राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करतांना खालील कोट्स वापरू शकतात... )
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभू छावा ।
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा |
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे ।
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे ।।
!! मान्यवर परिचय व स्वागत !!
( व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा. )
अध्यक्ष श्री / सौ. .................................................
प्रमुख पाहुणे : श्री. / सौ. .............................................
अतिथींच्या आगमनाने
झाले वातावरण प्रसन्न उल्हासित
करुनी उपकृत आम्हा
स्विकारावे आमुचे स्वागत...
(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे.)
!! प्रास्ताविक !!
सुख दुःखाच्या छायेतून कळते
जसे सार अवघ्या जीवनाचे
आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते
महत्व हे प्रास्ताविकाचे
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेचे श्री. / सौ. .................................... करतील.
व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो..... स्वराज्याला खऱ्या अर्थाने राजासारखे मन व रयतेच्या मनासारखा राजा प्रदान करणाऱ्या राजमाता म्हणजेच जिजाऊ भोसले..!!
सिंदखेडकर राजे लखुजी जाधवराव यांचे कुळात महाळसा राणी साहेब यांच्या पोटी जन्मलेले हे कन्यारत्न म्हणजे जिजाऊ साहेब, सन १६०५ मध्ये फर्जंद शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला. जो पर्यंत जिजाऊ सिंदखेडला होत्या तोपर्यंत उंबरठ्याच्या आतच त्यांचे जग लग्न झाल्यावर त्या दौलताबादला आल्या तेव्हा त्यांना चौफेर माजलेली बादशाही मनमानी समजली, सुलतानशाही चा हैदोस त्यांना समजला.
कत्तली, आगीचे प्रलय, देवळांचे पतन या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले त्यातच फर्जद शहाजी राजांनी आदिलशाही विरुद्ध बंड करून स्वराज्याचा मार्ग धरला आणि जिजाऊंच्या मनात स्वराज्यच बहरू लागले. त्यावेळी शिवबा राजे आऊसाहेबांच्या पोटात होते आणि जणू स्वराज्याचेच गर्भ संस्कार त्यांवर झाले. घोड्यावरून दौड करावी, तलवार कमरेला लटकवावी. गडाचा गार वारा खूप प्यावा कड्यावर उभे राहून खालची माळवद डोळे भरून पहावीत असे डोहाळे आई साहेबांना होते आणि ते नियतीने पुरविले देखील.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.
मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहनाची मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजामाता स्वराज्याची स्फुर्ती होत्या महाशक्ती होत्या, मातृशक्ती होत्या. गरजवंत रयतेला सदैव मदतीसाठी तत्पर असत. तो काळ विचारात घेतला तर जिजाऊ या प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्यागांजल्याच्या पालनकर्त्या राजमाता होत्या. हिंदवी स्वराज्याचे दोन छत्रपती याच मातेने घडविले अशा या राजमातेला व त्यांच्या प्रेरक स्मृतींना मातेस कोटी कोटी प्रणाम !!
!! विद्यार्थी व शिक्षक भाषणे !!
( प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत.)
!! अध्यक्षीय / मान्यवर भाषणे !!
तेज तुमचे आहे, सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या शब्दातच आहे, जीवनाचे संपूर्ण शास्त्र
ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे, अध्यक्षीय मार्गदर्शनाचा...
विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. ............................ यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यासमोर मांडावेत धन्यवाद !!
!! आभार प्रदर्शन !!
माझे सहकारी शिक्षक / शिक्षिका श्री. / सौ. आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते. यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
ज्ञानकुंभ रिता करुनी, अनमोल प्रेरक ज्ञान दिले
बोधामृत पाजूनी ज्ञानाचे, आम्हा उपकृत केले
तुम्ही पाठीराखे आमुचे सदा तुमचाच आधार
मार्गदर्शन असू द्यावे नित्य, स्विकारुनी हे आभार
आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.
तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.
थेंबाथेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार
!! समारोप !!
जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव स्वामी ॥१॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥२॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥३॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी॥४॥
जय जय जिजाऊ, जय जिजाऊ !!
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता समारोपाची वेळ आली
आजच्या कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदना / वंदे मातरम / राष्ट्रगीताने होईल.
सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता होतेय असे मी जाहीर करतो / करते.
!! जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र !!
शब्दांकन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक